मुक्तपीठ टीम
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नुकतेच मुंबईत आले होते. अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान सुरक्षेत मोठी त्रुटी असल्याचे प्रकरण समोर आले आहे. याआधी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांच्या सुरक्षेतही अशाच त्रुटी असल्याचं उघड झाल्यानंतर तीन कमांडोंवर कारवाई झाली होती. अमित शाह यांच्या बंद दरवाजामागील बैठकीतील आक्रमक भाषणाची ऑडिओ क्लिप लिक झाल्यामुळे गाजलेल्या दौऱ्याच्यावेळीच ही घटना घडली आहे. या घुसखोराकडे गृहमंत्रालयाच्या रिबनसह ओळखपत्र असल्याने खळबळ माजली आहे.
देशाच्या गृहमंत्र्यांच्या दौऱ्याच्यावेळी सुरक्षेत त्रुटी
- मुंबईत एक संशयित माणूस तासनतास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याभोवती फिरत होता.
- या व्यक्तीचे नाव हेमंत पवार असे आहे.
- तो मूळचा धुळे जिल्ह्यातील तालुका शिंदेखेडा मु पो दाऊळचा राहणारा आहे.
- तो नेहमी राजकारण्यांभोवती वावरताना दिसतो.
- मुंबईतील मलबार हिल येथील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यात गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीदरम्यान तो संशयास्पदरीत्या फिरत होता.
- त्या व्यक्तीने स्वत:ला आंध्र प्रदेशातील एका खासदाराचा पीए असल्याचे सांगितले होते.
या प्रकरणी मुंबई पोलिसांनी या प्रकरणी हेमंतवर मलबार हिल पोलिस ठाण्यात कलम १७०, १७१ भादंवि अंतर्गत गुन्हा नोंदवून अटक केली. त्याच्याकडे गृह मंत्रालयाचे ओळखपत्र होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या निवासस्थानाबाहेरही ते दिसले. आरोपी हेमंत पवार याला पोलिसांनी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
गृहमंत्रालयाच्या रिबनसह ओळखपत्र आलं कुठून?
- हेमंत पवार गृहमंत्री अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षा वर्तुळाच्या जवळ फिरत होता.
- केंद्रीय गृह खात्याचा सुरक्षा अधिकारी असल्याचे त्याने भासवले.
- गळयामध्ये गृह मंत्रालय/ मिनिस्ट्री ऑफ होमअफेअर्स असे लिहिलेल्या निळया रंगाच्या रिबीनसह ओळखपत्र होते.
- त्यामुळे त्याने शासकीय अधिकारी असल्याची बतावणी केल्याचा आरोप आहे.
- त्याला हा बॅंड परिधान करण्याचा अधिकार नाही.
एनएसए अजित डोवाल यांच्या सुरक्षेतही त्रुटी
- या वर्षी फेब्रुवारीमध्ये एनएसए अजित डोवाल यांच्या निवासस्थानीही सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी आढळून आल्या होत्या.
- १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० च्या सुमारास बेंगळुरूच्या एका व्यक्तीने मध्य दिल्लीतील डोवाल यांच्या उच्च-सुरक्षा व्यवस्थेतील त्यांच्या कारमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला.
- सीआयएसएफने याप्रकरणी कडक कारवाई केली आहे. या घटनेनंतर सीआयएसएफचे तीन कमांडो गेल्या महिन्यात बडतर्फ करण्यात आले आहेत.
- एका डीआयजी आणि एका कमांडंट दर्जाच्या अधिकाऱ्याची बदली करण्यात आली आहे.