मुक्तपीठ टीम
रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने आज रेपो रेटमध्ये ३५ बेसिस पॉइंट्स किंवा ०.३५ टक्के वाढ केली आहे. आता आरबीआयचा रेपो रेट ५.४% वरून ६.२५% झाला आहे. रिझर्व्ह बॅंकेने सलग पाचव्यांदा त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या वाढीनंतर देशात गृहकर्ज, कर कर्ज, वैयक्तिक कर्ज आणि इतर सर्व कर्जांचे व्याजदर पुन्हा एकदा वाढलेले पाहायला मिळतील. आजच्या वाढीसह, गेल्या काही महिन्यांत व्याजदर २.२५ टक्क्यांनी वाढले आहेत, ज्याचा थेट परिणाम बँकांनी दिलेल्या कर्जावर दिसत आहे.
रेपो रेट वाढीची घोषणा रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर श्री शक्तीकांत दास यांनी केली. त्यांनी सांगितले की, पुढील चार महिन्यांत महागाई दर ४ टक्क्यांच्या वर राहण्याची शक्यता आहे. एमपीसीच्या सहापैकी पाच सदस्यांनी रेपो रेटमध्ये वाढ करण्याच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. ग्रामीण भागातील मागणीत सुधारणा दिसून येत आहे. ग्राहकांचा आत्मविश्वासही वाढला आहे. तसेच, आर्थिक वर्ष २०२३ मध्ये जीडीपी वाढ ६.८% असू शकते. तर, आर्थिक वर्ष २०२४च्या पहिल्या तिमाहीत सीपीआय ५% वर राहू शकेल. असेही ते म्हणाले.
२.२५ टक्के व्याजदरात वाढ…
- वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने रेपो रेटमध्ये वाढ करण्यास सुरुवात केली होती.
- मे महिन्यात ०.४० टक्के, जूनमध्ये ०.५० टक्के, ऑगस्टमध्ये ०.५० टक्के, सप्टेंबरमध्ये ०.५० टक्के आणि डिसेंबरमध्ये ०.३५ टक्के वाढ झाली आहे.
- अशा प्रकारे गेल्या वर्षभरात व्याजदरात २.२५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
- यामुळे रेपो रेट ४ टक्क्यांवरून आता ६.२५ टक्क्यांवर पोहोचला आहे.
गृहकर्जावरील ईएमआयमध्येही वाढ!
जर, एप्रिल २०२२मध्ये १५ वर्षांसाठी कोणत्याही बँकेकडून ७.०० टक्के व्याजाने २० लाख रुपयांचे गृहकर्ज घेतले. त्या काळातील ईएमआय १७ हजार ९७७ पर्यंत पोहोचला होता, परंतु व्याजदरात २.२५ टक्के वाढ केल्यास, त्याच कर्जासाठी ९.२५ टक्के दराने २० हजार ५८४ रुपये द्यावे लागतील.