मुक्तपीठ टीम
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारमधील पहिल्या मंत्र्याचा राजीनामा झाला आहे.
पूजा चव्हाण प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले वनमंत्री संजय राठोड यांना अखेर राजीनामा द्यावा लागला आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी राठोड यांनी राजीनामा दिला आहे. तरीही भाजपा आक्रमकच राहणार असून पूजा चव्हाणच्या मृत्यूचा तपास करुन राठोडांवर कारवाईसाठी आग्रह धरणार आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी जर राजीनामा स्वीकारला नाही तर आक्रमकता अधिकच वाढवली जाणार आहे.
विधिमंडळाचं अधिवेशन सोमवारपासून सुरु होत आहे. त्याचवेळी भाजपानं संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी करत आक्रमक भूमिका स्वीकारली होती. कारवाई झाली नाही तर अधिवेशनात कामकाज चालू न देण्याचा इशारा दिला होता.
तर उद्धव ठाकरे यांनीही राठोड यांना दोन दिवसांपूर्वीच निर्णय घेण्याचे आदेश दिले होते.
बीड जिल्ह्यातील पूजा चव्हाण या तरुणीच्या पुण्यात संशयास्पद मृत्यू झाला
तिने आत्महत्या केल्याचा दावा केला गेला.
या प्रकरणात आरोप झाल्यानंतर वनमंत्री संजय राठोड वादाच्या भोवऱ्यात सापडले
पूजा चव्हाणसोबतची त्यांची छायाचित्रं आणि या प्रकरणाशी संबंधित काही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर भाजपाने थेट संजय राठोडांवर आरोप केला.
संजय राठोड यांनी चौकशीतून सगळं समोर येईल, दावा केला. त्यांनी आपली बदनामी केली जात असल्याचा आरोप केला.
मात्र, अधिवेशन जवळ आल्यावर भाजपाने आक्रमकता वाढवली.
राठोडांनी पोहरादेवीला गर्दी जमवल्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्यावरील नाराजी अधिकच वाढली होती.