मुक्तपीठ टीम
कोकणातील आपत्ती आणि आपत्ती व्यवस्थापन या बाबतीत पाहणी आणि अभ्यास करण्यासाठी राष्ट्र सेवा दलाने कोकणाचा दौरा आयोजित केला होता. चिपळूणमध्ये राष्ट्र सेवा दलाच्यावतीने आपत्ती बचाव केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबईतील अनेक तज्ज्ञांसह पूरग्रस्त झालेल्या भागाचा दौरा आयोजित करण्यात आला होता.
कोकणातील आपत्ती आणि आपत्ती व्यवस्थापन या बाबतीत पाहणी आणि अभ्यास करण्यासाठी राष्ट्र सेवा दलाने आयोजित केलेल्या या दौऱ्यात महेश कांबळे, विजय नाईक, डॉ. विलास सावंत, युवराज मोहिते हे मान्यवर सहभागी झाले होते.
“प्रत्येक कुटुंब “आपत्ती सहाय्य संचा”सह सज्ज असायला हवे, आपत्ती व्यवस्थापन हा विषय शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करावा तसेच प्रत्येक कुटुंब “आपत्ती सहाय्य संचा”सह सज्ज असायला हवे,” असे मत आयआयटीचे प्रा.विजय नाईक आणि टाटा सामाजिक विज्ञान या संस्थेचे प्रा.महेश कांबळे यांनी चिपळूणचे प्रांत प्रवीण पवार यांना भेटून व्यक्त केले आहे.
राष्ट्र सेवा दल, मुंबईच्या वतीने चिपळूण तालुक्यात रेस्क्यु सेंटरची उभारणी करण्यात येणार आहे. त्या बाबत काही गावांना भेटी देवून तिथल्या ग्रामस्थांशी या मान्यवरांसह चर्चा करण्यात आली.
पोसरे गावातील दरडग्रस्त गावकऱ्यांची भेट घेवून त्यांच्या पुनर्वसना बाबतची चर्चा या दौऱ्यात करण्यात आली. दिवसभराच्या या दौऱ्यात मा. उपविभागीय अधिकारी यांच्या सोबत झालेल्या दीर्घ चर्चेत अनेक सूचना करण्यात आल्या. दीर्घकालीन आपत्ती व्यवस्थापनेच्या कामात आयआयटी आणि टाटा संस्थेतील मान्यवरही सहभागी होणार आहेत.
दिवसभराच्या पाहणी नंतर चिपळूण मधील पत्रकारांशी या मान्यवरांनी संवाद केला. यावेळी चिपळूण मधील व्यापाऱ्यांचे अध्यक्ष शिरीष काटकर उपस्थित होते. दैनिक सागरच्या संपादक शुभदा जोशी यांचीही मान्यवरांनी सदिच्छा भेट घेतली.
राष्ट्र सेवा दलाच्यावतीने महिलांच्या शिलाई मशीनची दुरुस्ती करून चिपळूण मधील महिलांचा रोजगार पुन्हा सुरू केला या बद्दल शुभदा जोशी यांनी राष्ट्र सेवा दलाच्या या कामाचे कौतुक केले.
या पाहणी दौऱ्यात राष्ट्र सेवा दलाचे मुंबईचे कार्याध्यक्ष शरद कदम, सेवा दलाचे ज्येष्ठ कार्यकर्ते राजन इंदुलकर, मुंबई चे निसार अली सय्यद, सेवा दल,रत्नागिरी जिल्ह्याचे कार्याध्यक्ष रमाकांत सकपाळ सहभागी झाले होते.
राष्ट्र सेवा दलाने चिपळूण मधील पूरग्रस्त भागात केलेल्या मदत कार्याचा अहवाल पाहून महाराष्ट्राचे उच्च शिक्षण मंत्री आणि कोकणचे नेते ना.उदय सामंत यांनी कौतुक केले आणि पुढील कामात राष्ट्र सेवा दला ने असेच सहकार्य करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
राष्ट्र सेवा दलाचे मुंबईचे कार्याध्यक्ष शरद कदम, पत्रकार युवराज मोहिते, चिपळूण मधील सेवा दलाचे ज्येष्ठ कार्यकर्ते राजन इंदुलकर,निसार अली सय्यद यावेळी उपस्थित होते.