मुक्तपीठ टीम
“मुंबईतील आझाद मैदानातील शेतकरी आंदोलनाला पब्लिसिटी स्टंट असं म्हणत रामदास आठवले यांनी शेतकऱ्यांचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी आठवलेंवर टीका केली आहे. एकीकडे केंद्रातील मोदी सरकार शेतकऱ्यांचा विरोध असूनही कायदे मागे घेण्यास तयार नाही, दुसरीकडे त्यांचे मंत्री अशी अपमानास्पद विधाने करतात, हे गैर असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
महेश तपासे यांनी रामदास आठवलेंना देशातील वातावरणाची आठवण करून दिली आहे. ते म्हणालेत, “संपूर्ण देशातल्या शेतकऱ्यांनी नवीन कृषी कायदा तातडीने रद्द व्हावा या दृष्टीने गेल्या साडे तीन महिन्यापासून आंदोलन सुरू केले आहे. हजारोंच्या संख्येने शेतकरी बांधव दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेले आहेत. भारत सरकार व शेतकरी नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेच्या सर्व फेऱ्या हे निष्फळ ठरल्या आणि मोदी सरकार हा कृषी कायदा मागे घेण्यास तयार नाही. यामुळे संतापाचे चित्र निर्माण झालेले असताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शेतकरी मोर्चाला पब्लिसिटी स्टंट म्हणत शेतकर्यांचा अपमान केलेला आहे.”
राष्ट्रवादी काँग्रेसने का केली आठवलेंच्या माफीची मागणी? पाहा हा व्हिडीओ :
काय म्हणाले सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले?
“केंद्र सरकार शेतकऱ्यांच्यासोबत आहे. कायदा सरकारने शेतकऱ्यांच्या फायद्यासाठीच केला आहे. मुंबईतील आंदोलन हा फक्त पब्लिसिटी स्टंट आहे. लोकशाहीत प्रत्येकाला आंदोलनाचा अधिकार आहे. पण मोदी काही शेतकरी विरोधी नाहीत. कायदा सरकारने केला आहे, मागे घेण्याचा प्रश्नच नाही. शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या ऐकून त्यानुसार काम देखील केलं गेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन थांबवायला हवं “, असं रामदास आठवले म्हणाले.