मुक्तपीठ टीम
फोन टॅपिंग आणि पोलीस बदल प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा पोलिसांनी नोंदवलेला जबाब तर दुसरीकडे मुंबई बँकेच्या बोगस मजुरप्रकरणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांविरोधात नोंदवलेला गुन्हा यामुळे भाजपा आक्रमक झाली आहे. सरकारच्या भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवत असल्याने राज्य सरकार विरोधकांचा आवाज दाबण्याचे काम करत आहे, असा आरोप भाजपाने केला आहे. याच पार्श्वभूमीवर आता भाजपाच्या मदतीला भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आले आहेत. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिणार असून लवकरच त्यांची भेट घेणार असल्याचंही आठवले यांनी सांगितलं.
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू व्हावी…
- मी अमित शाहांना एक पत्र लिहिणार आहे.
- त्यांना भेटणारही आहे.
- महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणार आहे.
- विरोधकांना सातत्याने त्रास दिला जाणार असेल तर हे सरकार बरखास्त केलं पाहिजे.
- सरकार बरखास्त करण्याची वेळ नक्की येईल.
- त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू व्हावी.
राष्ट्रपती राजवट म्हणजे काय?
- राज्य सरकारने घटनाबाह्य काम केलं, सरकारकडे बहुमत राहिलं नाही, राज्यातील कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती ढासळली, निवडणुकांच्या निकालात कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीला स्पष्ट बहुमत मिळालं नाही, सरकार स्थापनेसाठी कोणताही पक्ष पुढे आला नाही, एखाद्या गटाने बंड केलं किंवा सरकारमधील दोन पक्षांची आघाडी संपुष्टात येऊन सरकार अल्पमतात गेलं, तर राष्ट्रपती राजवट लागू होते.
- घटनेच्या ३५६ व्या कलमानुसार राष्ट्रपती राजवट लागू केली जाते.
- ही राष्ट्रपती राजवट २ महिन्यांच्या काळापुरती राहू शकते.
- या काळापुरती विधानसभा स्थगित होते.
- या कालावधीत राज्यपाल हे राज्याचे मुख्य सचिव आणि काही सनदी अधिकाऱ्यांच्या मदतीने राज्याचा कारभार पहातात.
- या कालावधीत निर्णय घेण्याचे अधिकार संसदेकडे जातात.