मुक्तपीठ टीम
मराठा समाजाला आरक्षण द्यावे त्याच प्रमाणे देशातील सर्व क्षत्रीय समाजातील गरिबांना १० टक्के आरक्षण द्यावे, भटक्या घुमन्तु समाजाला स्वतंत्र प्रवर्ग करून आरक्षण द्यावे, तसेच ओबीसी मध्ये कॅटेगरी करून आरक्षण द्यावे या मागण्यांबरोबरच जातीनिहाय जनगणना करावी आणि प्रमोशनमध्ये आरक्षणाचा कायदा संसदेत करावा या सह विविध मागण्या रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर आज झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सर्व पक्षीय बैठकीत मांडल्या.
नुकताच प्रजासत्ताक दिनी लालकिल्ल्यावर झालेल्या अनुचित प्रकाराचा निषेध करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी ना. रामदास आठवले यांनी केली.
नवीन शेतकरी कायद्याबाबत संसदेच्या अधिवेशनात पुन्हा चर्चा करावी व त्यात आवश्यक ती सुधारणा करावी अशी सूचना रामदास आठवले यांनी केली.
कोरोनाच्या काळात देशात लॉकडाऊन लावून लाखो लोकांचे जीव वाचविल्याबद्दल रामदास आठवले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले. देशातील सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तसेच कोरोना प्रतिबंधक लस निर्मिती करणाऱ्या देशातील प्रयोग शाळांना भेटी देऊन संशोधकांना पंतप्रधानांनी प्रोत्साहित केल्याबद्दल रामदास आठवलेंनी पंतप्रधानांचे अभिनंदन केले.
कोरोना वरील लस सर्व गरिबांना मोफत देण्यात यावी. त्यासाठीच्या खर्चात राज्यशासन, जिल्हा परिषद, महापालिका आदी स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपला वाटा उचलावा अशी सूचना या बैठकीत रामदास आठवले यांनी केली.
आदिवासी ( एस टी ) साठी देशात स्वतंत्र विद्यापीठ आहे. त्याच धर्तीवर एस सी अनुसूचित जाती साठी वेगळे केंद्रीय विद्यापीठ स्थापन करावे अशी मागणी रामदास आठवले यांनी केली. मागील १० वर्षांत विद्यार्थ्यांच्या
स्कॉलरशिपच्या रक्कमेत कोणतीही वाढ करण्यात आली नाही. त्यात वाढ करावी अशी सूचनाही यावेळी रामदास आठवले यांनी केली.
गरिबी, दारिद्र्यी कमी करण्यासाठी भूमिहीन गरिबांना शासनाने प्रत्येकी ५ एकर जमीन मोफत वाटप करावी आणि नोकरीमधील सर्व मागासवर्गीयांचा बॅकलॉग भरुन काढावा, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.