मुक्तपीठ टीम
मुंबई मराठी पत्रकार संघात आज,कोरोना देवदूत पुरस्कार मिळालेल्या माजी खासदार राम ठाकूर यांच्या सत्तराव्या वाढदिवसाच्या निमित्ताने,अन्नधान्याच्या मोफत किट्सचे वाटप केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी आठवले यांनी राम ठाकूर यांच्या सामाजिक कार्याचा मुक्त कंठाने गौरव केला आणि त्यांना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.या समारंभाच्या अध्यक्षस्थानी मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वि. वाबळे होते.
कोरोनाच्या संकटकाळात महाराष्ट्र शासनाने पत्रकारांना वाऱ्यावर सोडले असल्याची खंत वाबळे यांनी व्यक्त केली.रामदास आठवले यांनी पंतप्रधानांकडे पत्रकारांची बाजू मांडावी,असे आवाहन त्यांनी केले.
तो धागा पकडून आठवले म्हणाले की, कोरोना महामारीच्या काळात अनेक पत्रकारांची वेतन कपात झाली असून बऱ्याच पत्रकारांना नोकऱ्यांना मुकावे लागले आहे. ते पुढे म्हणाले की,कोरोनाच्या काळात पत्रकारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.इतर राज्यात पत्रकारांना सवलती दिल्या जात असताना राज्य सरकार पत्रकारांची दखल घेत नाही,अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
पत्रकारांना अशा आपत्कालीन परिस्थितीत सरकारने मदत करण्याची गरज असून त्यांना विशेष पॅकेज मिळावे,यासाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आग्रह धरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पत्रकार हे कोरोनाविरुद्ध लढणारे आघाडीचे सैनिक असून कोरोनाच्या भयावह काळात जीव धोक्यात घालून वृत्तसंकलनाचे काम करत आहेत.आघाडीवर राहून काम करणाऱ्या घटकांप्रमाणे सरकारने पत्रकारांना देखील आघाडीवर लढणाऱ्या सैनिकांचा दर्जा द्यावा, असे आठवले म्हणाले.
यावेळी आठवले यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात काही पत्रकार, कॅमेरामन व छायाचित्रकारांना अन्नधान्याच्या किट्सचे वाटप करण्यात आले.
हा कार्यक्रम संपता संपता,केंद्रीय समाजकल्याण व सबलीकरण राज्यमंत्री रामदास आठवले,यांच्या हस्ते डॉ.संजय भिडे यांनी वयाच्या अडुसष्टाव्या वर्षी पत्रकारितेत Ph.D. पूर्ण केल्याबद्दल संजय भिडे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे व त्यांचे पत्रकार संघाचे पदाधिकारी सुधाकर कश्यप,कार्यवाह श्री.विष्णु सोनावणे आणि संयुक्त कार्यवाह खलील गिरकर उपस्थित होते.