मुक्तपीठ टीम
कोरोनावर उत्तर प्रदेश सरकार अभूतपूर्व विजय मिळवत असल्याबद्दल उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशातील कोरोना योद्धे आणि उत्तर प्रदेशाची जनता यांचे अभिनंदन उत्तर प्रदेशाचे माजी राज्यपाल राम नाईक यांनी केले आहे. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडीच्या सरकारने उत्तर प्रदेशाचे अनुकरण करून महाराष्ट्रातील जनतेला कोरोनामुक्त करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहनही राम नाईक यांनी केले आहे.
“कोरोनाविरुद्धच्या लढ्यात महाराष्ट्र सरकारने विशेषतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशंसनीय कामगिरी केली असून त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले जात आहे” अशा प्रकारच्या बातम्या काही वृत्तपत्रातून येत असल्यामुळे जनतेला वस्तुस्थितीची माहिती राम नाईक यांनी दिली आहे.
भारत सरकारच्यावतीने देशातील सर्व राज्यांची कोरोनासंबंधीची माहिती रोज प्रसिद्ध करण्यात येते त्यानुसार १९ जुलै रोजी प्राप्त झालेल्या माहितीचे अध्ययन करून राम नाईक यांनी पुढील तुलनात्मक माहिती दिली आहे.
१. भारताची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेप्रमाणे १०२,८७,३७,४३६ असून महाराष्ट्राची लोकसंख्या ९,७०,००,००० (९.४३ टक्के) तर उत्तर प्रदेशाची लोकसंख्या १६,६०,००,००० (१६.१४ टक्के) आहे. म्हणजेच उत्तर प्रदेशाची लोकसंख्या महाराष्ट्रापेक्षा ६,९०,००,००० (६.७१ टक्के) जास्त आहे. या तुलनेच्या आधारे महत्वाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे.
२. देशात कोरोनाची लागण ३,११,७४,३२२ नागरिकांना झाली असून महाराष्ट्राची संख्या 62,20,207 (१९.९५ टक्के) आहे तर उत्तर प्रदेशाची संख्या १७,०७,८८४ (५.४८ टक्के) आहे. म्हणजेच महाराष्ट्राची संख्या उत्तर प्रदेशापेक्षा ४५,१२,३१३ (१४.४७ टक्के) जास्त आहे.
३. देशात कोरोना संक्रमणाची सक्रीय (अॅक्टिव) संख्या ४,६,१३० असून महाराष्ट्राची संख्या ९९,७०९ (२४.५५ टक्के) आहे तर उत्तर प्रदेशाची संख्या १,१८८ (०.२९ टक्के) आहे. म्हणजेच महाराष्ट्राची संख्या उत्तर प्रदेशापेक्षा ९८,५२१ (२४.२६ टक्के) जास्त आहे.
४. देशात कोरोनाची मृत्यू संख्या ४,१४,४८२ असून महाराष्ट्राची संख्या १,२७,०९७ (३०.६६ टक्के) आहे तर उत्तर प्रदेशाची संख्या २२,७२८ (५.४८ टक्के) आहे. म्हणजेच महाराष्ट्राची संख्या उत्तर प्रदेशापेक्षा १,०४,३६९ (२५.१८ टक्के) जास्त आहे.
५. देशात कोरोनाची लस टोचल्याची संख्या ४१,१८,४६,४०१ आहे तर महाराष्ट्राची संख्या ३,९९,१२,०८० (९.६९ टक्के) आहे तर उत्तर प्रदेशाची संख्या ४,१०,५१,७३४ (९.९७ टक्के) आहे. म्हणजेच महाराष्ट्राची संख्या उत्तर प्रदेशापेक्षा ११,३९,६५४ (०.२८ टक्के) कमी आहे.
६. उत्तर प्रदेशाचे जिल्हे ७५ आहेत, त्यापैकी सात जिल्हे कोरोना संक्रमणापासून मुक्त झाले आहेत. ४१ जिल्ह्यात कोरोना संक्रमणाची नवीन केस आलेली नाही तर ३४ जिल्ह्यात नवीन केस १० पेक्षा कमी आहेत. महाराष्ट्राची जिल्हावार संख्या उपलब्ध झाली नाही.
७. उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कोरोनावर जवळजवळ पूर्ण नियंत्रण आले असल्यामुळे नागरिकांच्या समस्या ऐकून घेण्याचा ‘जनता दर्शन’ कार्यक्रम १३ जुलैपासून प्रारंभ केला आहे. ते जेव्हा लखनौमध्ये असतात त्या दिवशी सकाळी ९ वाजता नागरिकांना मुख्यमंत्री निवासात भेटतात. असा नागरिकांना भेटण्याचा कार्यक्रम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करीत नाहीत.
८. उत्तर प्रदेश सरकारने सर्व ७५ जिल्ह्यात कमीत कमी एक मेडिकल कॉलेज काढण्याचा संकल्प केला आहे. त्याप्रमाणे ऑगस्ट महिन्यात उद्घाटनासाठी ९ मेडिकल कॉलेज तयार झाली असून पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या तारखेच्या सोयीप्रमाणे त्यांचे उद्घाटन करण्यात येईल. जिल्ह्यांची नांवे आहेत : १. देवरिया, २. एटा, ३. फतेहपुर, ४. प्रतापगढ, ५. सिद्धार्थनगर, ६. गाजीपुर, ७. मीरजापुर, ८. जौनपुर, ९. हरदोई. महाराष्ट्राची आकडेवारी उपलब्ध झाली नाही.
“वरील सर्व माहिती नागरिकांच्या प्रबोधनासाठी प्रसिद्ध केली असून सर्वांनी कोरोना विरोधाच्या संग्रामात सहभागी व्हावे” असेही आवाहन राम नाईक यांनी शेवटी केले आहे.