मुक्तपीठ टीम
कोबाड गांधी यांच्या ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ या इंग्रजी पुस्तकाच्या अनघा लेले यांनी केलेल्या मराठी अनुवादाला महाराष्ट्र शासनाने मराठीतील उत्कृष्ट अनुवादाकरिता घोषित केलेला पुरस्कार लगेच रद्द केल्याची उद्वेगजनक घटना घडली आहे. ही घटना म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच आहे, असं मत व्यक्त होत आहे. साहित्य आणि लेखक यांच्या विचारस्वातंत्र्यावर बंधने घालणे हे लोकशाहीच्या धोरणाशी विसंगत आहे. भारतीय राज्यघटनेचा तो अपमान आहे, असा आरोप होत असून त्याविरोधात पुण्यात निषेध सभेचे आयोजन करण्यात आलं आहे.
यासाठी प्रकाशित पत्रकानुसार, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर झालेला हा हल्ला परतवून लावण्याची जबाबदारी सर्व विवेकनिष्ठ व लोकशाहीवादी नागरिकांची, लेखक, कलावंत व पत्रकारांची आहे. ज्यांनी निषेध केला आहे, त्या लेखकांच्या पाठीशी राहण्याची जबाबदारी आहे असे आम्ही समजतो. म्हणून जाहीरपणे ही भूमिका मांडण्यासाठी आणि व्यक्त होण्यासाठी पुणे येथे एका सभेचे आयोजन करीत आहोत.
ता.: रविवार १८ डिसेंबर
वेळ : सायंकाळी ५.३०
स्थळ : लोकायत सभागृह, पुणे
आयोजक :
शंकर ब्रह्मे समाज विज्ञान ग्रंथालय.
आणि
संदेश भंडारे – दक्षिणायन