मुक्तपीठ टीम
कोरोनामुळे काहीशी मंदावलेली अर्थव्यवस्था, त्यातही विमानसेवांना अनेकदा लागणारी घरघर…तर दुसरीकडे चांगली बातमी नव्या भारतीय विमान कंपनीची. शेअर बाजारातील प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांची अकासा एअर ही नवीन खासगी एअरलाईन्स अवकाशात झेपावणार आहे. भारतीय नागरिकांनी जास्तीत जास्त विमान प्रवास करावा या हेतूने झुनझुनवाला लवकरच बजेट एअरलाईन्सचा शुभारंभ करत आहेत.
झुनझुनवालांची अकासा एअर
- झुनझुनवालांच्या नव्या विमान कंपनीचे नाव अकासा एअर असं असणार आहे.
- डेल्टा एअरलाइन्सचे माजी वरिष्ठ अधिकारीही नव्या विमान कंपनीत असतील.
- अकासा एअरच्या ताफ्यात ७० विमानं असणार आहेत.
- पुढच्या चार वर्षात या कंपनीच्या कामाला वेग मिळेल.
- या कंपनीत जवळपास २६० कोटींच्या गुंतवणूकीसह झुनझुनवालांचा ४० टक्के वाटा असणार आहे.
- पुढच्या १५ ते २० दिवसात एव्हिएशन मंत्रालयाकडून ना हरकत प्रमाणपत्राची (एनओसी) अकासा एअरला अपेक्षा आहे.
- झुनझुनवालांची जेट आणि स्पाइसजेट या दोन विमान कंपन्यांमध्ये एक-एक टक्का भागिदारी आहे.
अकासा एअरचा स्वस्त विमान प्रवास
- अकासाच्या एका विमानातून १८० जण प्रवास करतील.
- स्वस्त दरात विमान प्रवास उपलब्ध करून देण्याचा झुनझुनवाला यांचा प्रयत्न आहे.
- कोरोनामुळे देशातील विमान कंपन्यांची परिस्थिती वाईट आहे.
- राकेश झुनझुनवाला यांची अंदाजानुसार, येत्या काही दिवसांत विमान प्रवासाची मागणी वाढेल.
- त्यांच्या मते भारतीय बाजारात वाढ कायम राहील आणि लवकरच महागाईही नियंत्रणात येईल.
विमान सेवा कंपन्या आर्थिक अडचणीत
- कोरोनापूर्वीही विमान कंपन्यांची परिस्थिती वाईट होती.
- उदा. किंगफिशर एकदा देशातील दुसर्या क्रमांकाची विमान कंपनी होती, परंतु २०१२ मध्ये कंपनीला आपला व्यवसाय बंद करावा लागला.
- २०१९पासून जेट एअरवेजची उड्डाणं बंद आहेत, जी आता पुन्हा सुरु करण्याच्या तयारी सुरु आहे.
- टाटा ग्रुप आणि सिंगापूर एअरलाईन लिमिटेडची विस्तारा आणि इंडिगो देखील कोरोनामुळे अडचणीत आहेत.