मुक्तपीठ टीम
तंबाखू सेवनाच्या व्यसनांविरोधात लोकचळवळ उभी राहणे गरजेचे असून याबाबतच्या कोटपा कायद्याचीही प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी. या प्रक्रियेत जनतेने सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले.
सार्वजनिक आरोग्य विभाग, एनएचएम आणि टाटा मेमोरियल सेंटरच्यावतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी स्टेट लेव्हल यूथ टोबॅको सर्व्हेचे – महाराष्ट्र फॅक्ट शीटचे प्रकाशन राजेश टोपे यांच्या हस्ते करण्यात आले.
टाटा मेमोरियल सेंटर येथे झालेल्या या कार्यक्रमाला राजेश टोपे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. यावेळी आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास, सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे महासंचालक डॉ. एल. स्वस्तिचरण, डॉ. राजेश दीक्षित आदी उपस्थित होते.
सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले, शालेय विद्यार्थी तसेच महिला आणि मुलींमध्येही तंबाखू सेवनाचे प्रमाण वाढते आहे. ही अतिशय चिंताजनक बाब आहे. तंबाखू सेवन आरोग्याला हानिकारक आहे. याबाबत लोकांमध्ये जाणीव निर्माण करण्याची आवश्यकता आहे, कारण तंबाखू सेवन आरोग्याला धोकादायक आहे याची जाणीव असूनही तंबाखू सेवन केले जाते. तंबाखूजन्य उत्पादनाची मागणी कमी व्हावी यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग, पोलीस, अन्न व औषध प्रशासन आणि शालेय शिक्षण विभागाने एकत्रित येऊन काम करण्याची आवश्यकता असल्याचेही श्री.टोपे यांनी सांगितले.
आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास म्हणाले, तंबाखू सेवनाच्या दुष्परिणामाबाबत तरुणांमध्ये रंगपंचमीला धोकादायक रंगाचा वापर करु नये, ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी फटाके वापरु नये, याबाबत मुलांमध्ये जाणीव जागृती निर्माण केली गेली. त्यामुळे फटाके आणि रंगांचा वापर कमी झाला असल्याचे आढळून येते. त्याचप्रमाणे तंबाखूबाबत मुलांना शिक्षित करण्याची आवश्यकता आहे, असे त्यांनी सांगितले.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालक डॉ साधना तायडे, उपसंचालक डॉ.पद्मजा जोगेवार, टाटा मेमोरियल सेंटरचे राजेंद्र बडवे दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. डॉ. शर्मिला पिंपळे यांनी सूत्रसंचालन तर सहाय्यक संचालक डॉ. संजीवकुमार जाधव यांनी आभार मानले.