मुक्तपीठ टीम
राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर एक वेगळा भावनात्मक मार्ग निवडला आहे. त्यांनी थेट विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना बाहेरून येणाऱ्या पालकांनी हात पाय स्वच्छ धुतलेत का? शिवाय पालक कोरोनाचे नियम पाळत आहेत का? यावर लक्ष ठेवण्याचं आवाहन केलं आहे. या संदर्भातील पत्र त्यांनी ट्वीट केले आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं विद्यार्थ्यांना लिहिलेलं पत्र पुढीलप्रमाणे:
प्रिय विद्यार्थी मित्रानो,
शाळा, महाविद्यालये नुकतेच सुरू झाले आणि कोरोना नुकताच वाढतांना दिसतोय, कोरोना विरूद्ध लढाई गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. तुमच्या सर्वांच्या आणि महाराष्ट्रातील जनतेच्या मदतीने ही लढाई आपण नक्कीच जिंकणार यात शंका नाही. तुमचं खेळण्याचं, बागडण्याच हे वय क्रीडांगणावर घाम गाळण्याचं हे वय. पंरतु गेले वर्षभर तुम्हाला घरात बसावं. लागलं. कोरोनावर मात करण्यासाठी मला तुमची मदत हवी आहे. ती अशी की, प्रथम तुम्ही तुमचीच काळजी घ्या, त्याच बरोबर आपल्या आई-वडिलांची, भाऊ-बहिणीची व तसेच शेजार्यांचीही काळजी घ्या. आई-वडिलांना कामानिमित्त बाहेर जावे लागते, बाहेरून आल्यावर त्यांनी हात-पाय स्वच्छ धुतलेत की नाही ते पाहा, त्यांनी बाहेर जातांना मास्क लावला की नाही ते पाहा, जर कदाचित कोरोनाचे काही लक्षण दिसलेच तर लगेच सरकारी दवाखान्यात त्यांना न्या, त्यांची काळजी घेण्यासाठी सर्व आरोग्य यंत्रणा सज्ज आहे.
मित्रांनो, आजचा विद्यार्थी व तरूण देशाचा उद्याचा आधारस्तंभ आहे. तरूणाचे शरीर सुदृढ, मन सकारात्मक व बुद्धी सतेज पाहिजे. तरच त्याला योग्य वेळी, योग्य निर्णय घेता येतात. तेव्हांच तो जीवनात यशस्वी होतो. तर मग चला मला करणार ना मदत. मला तुमची खात्री आहे.
आपण ही लढाई नक्कीच जिंकणार!
जय हिंद,जय महाराष्ट्र