मुक्तपीठ टीम
उद्योग क्षेत्रात कामगारांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि मतदार यादीत नाव नोंदवून मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी उद्योग संस्थांनी प्रोत्साहित करावे, असे आवाहन भारताचे मुख्य निवडणूक राजीव कुमार यांनी केले.
मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील टेक महिंद्रा – फेज ३ येथे आयोजित कार्यक्रमात उद्योगांमधील मतदार जागृती मंचाच्या नोडल अधिकाऱ्यांशी संवाद कार्यक्रमाच्यावेळी ते बोलत होते. यावेळी निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे, निवडणुक आयोगाचे विशेष अधिकारी डॉ.रणबीर सिंग, निवडणूक उपायुक्त हिरदेश कुमार, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, निवडणुक आयोगाच्या माध्यम व संवाद महासंचालक शेफाली शरण, टेक महिंद्राचे उपाध्यक्ष सतीश पै, उद्योग समूहाचे प्रतिनिधी, औद्योगिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले, पुण्यामध्ये मतदानाची टक्केवारी ५० टक्केपेक्षा कमी आहे. मतदान प्रक्रियेत सहभागी होतांना मतदानाची टक्केवारी वाढणे गरजेचे आहे. उद्योग क्षेत्राच्या प्रतिनिधींनी मतदानाविषयी जनजागृती करुन पात्र कर्मचारी, कामगारांना मतदार नोंदणीसाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन त्यांनी केले. मतदार जागृती मंचाच्या प्रतिनिधींनी केलेल्या सूचनांबाबत भारत निवडणूक आयोग सकारात्मक विचार करेल, असेही ते म्हणाले.
निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे म्हणाले, मतदान प्रक्रिया सुरळीतपणे, शांततेत पार पाडण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग नेहमीच तत्पर असून निवडणूक प्रक्रियेत बाधा निर्माण करणाऱ्यांवर निवडणूक आयोगाकडून कारवाई करण्यात येते. लष्करी, केंद्रीय आणि राज्य सशस्त्र पोलिस दलातील जवान (सर्व्हिस वोटर्स) तसेच प्रशिक्षणासाठी किंवा शासकीय सेवेनिमित्त प्रतिनियुक्तीवर परदेशात असलेल्या भारतीय अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी अत्याधुनिक अशी इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलट सिस्टीम (इटीपीबीएस) सेवा भारत निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिली आहे असे त्यांनी सांगितले.
यावेळी विविध कंपन्यांमधून आलेल्या प्रतिनिधींच्या प्रश्नांना श्री. कुमार आणि अनुपचंद्र पांडे यांनी उत्तरे दिली. नवीन मतदार नोंदणी व मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रपत्र क्र. ६, ७ आणि ८ नागरिकांसाठी उपलब्ध करुन दिले आहे. तसेच मतदार प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुलभ, जलद गतीने होण्यासाठी ‘व्होटर हेल्पलाईन मोबाईल अॅप‘, ‘नॅशनल वोटर्स सर्व्हिस पोर्टल’ ( एनव्हीएसपी), मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांसाठी ‘गरुडा‘ मोबाईल अॅप उपलब्ध करुन देण्यात आले आहे. जवळच्या उपविभागीय अधिकारी कार्यालय किंवा मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे ऑफलाईनपद्धतीने मतदार नोंदणी करता येते, असे यावेळी त्यांनी सांगितले.
यावेळी उपस्थित उद्योग समूहाचे प्रतिनिधी, औद्योगिक संघटनेचे पदाधिकारी यांनी निवडणूक आयोगाशी संवाद साधला.