मुक्तपीठ टीम
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या ठाणे शहरात आणि ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली परिसरात रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे-मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे नागरिकांना आणि वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. आता या खड्ड्यांवरून शिवसेनेनेच नाही तर युतीमित्र भाजपाकडूनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केलं जात आहे.
सकाळी ६ वाजेपर्यंत काम करणाऱ्यां मुख्यमंत्र्यांना ठाण्यातील खड्डे दिसत नाही का? राजन विचारें
- ठाणे शहरात पडलेल्या खड्ड्यांमुळे ठाणेकर नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते.
- मुंबईतून ठाण्यात प्रवेश करताच वाहन चालकांना ठाण्यातील खड्ड्यांना आणि खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. त्यामुळे नागरिकांमध्ये आणि वाहनचालकांकडून नाराजीचे वातावरण आहे.
- आता मुख्यमंत्री हे ठाण्याचे आहेत. त्यासाठी मुख्यमंत्री नेहमीच आपल्या ठाण्यातील निवासस्थानी येत असतात.
- एकीकडे मुख्यमंत्री सकाळी ६ वाजेपर्यंत काम करतात, असं सांगितलं जातं.
- मग, सकाळी ६ वाजेपर्यंत काम करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना रस्त्यांवरील खड्डे दिसत नाही का? असा प्रश्न शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांनी विचारला आहे.
- ठाण्यातील कोपरी येथील पुलावर पडलेल्या खड्ड्यांची पाहणी करण्यासाठी खासदार राजन विचारे यांनी पाहणी दौऱ्याचे आयोजन केले होते.
- या दौऱ्यादरम्यान विचारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.
त्यावेळी केलेले पाप आता धुवून टाका, भाजपाच्या मंत्र्यांकडून थेट मुख्यमंत्र्यांवर टीका!
- राज्यात भाजपाची सत्ता असताना डोंबिवली शहरासाठी ४७२ कोटीचे रस्ते मंजूर करून घेत या रस्त्याचा डीपीआर तयार करत निविदा देखील काढल्या होत्या.
- मात्र त्यानंतर सरकार गेल्याने नंतरच्या सरकारमधल्या कोणाला तरी दुर्बुद्धी सुचली.
- कोणाला ते माहित आहे.
- पण वित्तीय मान्यता असलेला निधी रद्द करण्यात आला होता.
- ज्यांनी कोणी निधी रद्द केला होता आता हा निधी पुन्हा मंजूर करण्याची जबाबदारी त्यांचीच आहे.
- पहिल्यांदा खोडले ते पुन्हा मंजुरीसाठी सादर करण्याचे आदेश चव्हाण यांनी दिले आहेत.
- प्रस्ताव पुन्हा सादर करा, असं लिहिलं.
- पण त्यालाही एक महिना झालाय.
- यामुळेच त्यावेळी केलेले पाप आता धुवून टाका, असा टोला भाजपाचे आमदार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांनी नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.