राज जाधव
महाबली शहाजीराजे, महाबली शहाजीराजे हे मालोजीराजे भोसले यांचे पुत्र त्यांचा जन्म उमाबाईसाहेब यांच्या पोटी झाला. मालोजीराजे भोसले यांचा इंदापूरच्या लढाईत मृत्यू झाला. मालोजीराजे भोसले यांच्या मृत्यूनंतर त्यांची मनसब आणि जहागिरी निजामशाहने शहाजी महाराजांना दिऊन पुढे चालवली, शिवाय राजा हा किताब देखील बहाल केला.
शहाजीराजे यांचे चुलते विठोजीराजे भोसले यांनी शहाजी महाराजांची शिक्षण व्यवस्था केली, त्यांना कोणत्या प्रकारचे शिक्षण दिले गेले याविषयी इतिहासाचार्य वा.सी.बेंद्रे म्हणतात ” शहाजीच्या एकंदर नंतरच्या हालचालीवरून त्याला तत्कालीन रिवाजाप्रमाणे जसे क्षात्रवृत्तीचे शिक्षण दिले गेले, तसेच त्यास लेखन, वाचन, राज्यकारभारास आवश्यक असे सर्वसामान्य व्यवहारज्ञान देण्याची व्यवस्था झाली असली पाहिजे. जवळची उपाध्ये वैगरे मंडळीच सामान्यतः हे शिक्षण देत. ” शहाजीराजे सर्वप्रकारचे शिक्षण घेऊन मोठे झाले, तसेच लहानपणापासून त्यांचे दरबारात जाणे येणे असल्याने दरबारातील रीतिरिवाज, न्यायदान व युद्धतंत्र याविषयीचे ज्ञान त्यांनी आत्मसात केले..
१६२४ साली भातवडीच्या युद्धात महाबली शहाजी महाराजांनी आपल्या शौर्य आणि धाडसाच्या जोरावर मोगल व आदिलशाही सैन्याच्या विरोधात मोठा पराक्रम गाजवला, याचे सविस्तर वर्णन शिवभारत या साधनात आलेले आहे..
१६२३ मध्ये आदिलशाहने निजामशाहीचा वजीर मलिक अंबर विरुद्ध मोगलांना लष्करी मदत केली होती, सरलष्कर मुल्ला महमद यास ५००० निवडक स्वारानीशी बऱ्हाणपूर येथे मोगलांच्या मदतीस पाठवले होते. मलिक अंबर यामुळे संतापला आणि कुतुबशहाशी मैत्रीचा करार केला आणि आदिलशाहीवर आक्रमण करून बेदरचा प्रदेश जिंकून घेतला आणि विजापूरवर चालून गेला. मलिक अंबरने विजापूरास वेढा दिल्याचे समजतास आदिलशाही सरदार मुल्ला महमद व मोगल सरदार सरलष्कर खान विजापूरच्या दिशेने निघाले, ही बातमी समजतास मलिक अंबरने विजापूरचा वेढा उठवला व त्वरित आपल्या सैन्यानिशी अहमदनगरच्या दिशेने निघाला. त्याचवेळी मोगल-आदिलशाही या संयुक्त फौजेची आणि मलिक अंबरच्या सैन्याची गाठ भातवडी येथे पडली आणि युद्धास तोंड फुटले. या युद्धात महाबली शहाजी महाराज, शरीफजीराजे भोसले तसेच इतर मराठा सरदारांनी आपल्या पराक्रम आणि शौर्याच्या बळावर निजामशाहकडे विजयाश्री खेचून आणला..
भातवडीच्या युद्धात मोगल, आदिलशाही तसेच निजामशाहीच्या फौजेत कोणतेकोणते सरदार लढत होते त्यांची नावे तसेच युद्धाचे अतिशय अचूक आणि रसाळ वर्णन हे शिवभारत या समकालीन साधनात आलेले आहे. लेखनसीमे अभावी या युद्धात महाबली शहाजी महाराज आणि शरीफजीराजे भोसले यांनी गाजवलेल्या पराक्रम यांचे वर्णन अतिशय थोड्या शब्दात देणे योग्य राहील. शिवभारतकार नमूद करतात ” नंतर शहाजी व शरीफजी, महाबलवान खेळोजी, सिद्दी, त्याचप्रमाणे हंबीररावप्रभूति इतर पराक्रमी वीर यांनी हातात बाण, चक्रे, तरवारी, भाले, पट्टे, घेऊन मोगलांच्या अफाट सैन्याची खूप कत्तल उडवली. तेंव्हा ते भयभीत होऊन जीव वाचवण्यासाठी दाही दिशा पळू लागले. ती मोगलांची सेना पसार झालेली पाहून इब्राहिम आदिलशहाच्या सैन्यासही पळता भुई थोडी झाली. ”
ही धांदल सुरू असतानाच मनचेहर नावाचा मोगल सरदार त्या सैरावैरा पळणाऱ्या सैन्याच्या पिछाडीचे रक्षण करू लागला. मनचेहर यास पाहून महाबली शहाजी महाराज, शरीफजीराजे इत्यादी सर्व भोसल्यांनी पुन्हा शत्रूची कापाकापी सुरू केली. युद्धात शरीफजीराजे भोसले यांनी भाल्याच्या फेकीने हत्तीदळावर हल्ला चढवला होता, याप्रसंगी शत्रूच्या बाणाच्या हल्ल्याने शरीफजीराजे भोसले धारातीर्थी पडले. आपला धाकटा भाऊ शरीफजीराजे धारातीर्थी पडलेले पाहून महाबली शहाजी महाराज मनचेहर व त्याच्या सैन्यावर वेगाने चालून गेले. महाबली शहाजी महाराज यांच्या भीतीने मनचेहर हा मोगल हत्तीदळासह पळून जाऊ लागला, तेंव्हा शहाजीराजे यांनी पळणाऱ्या शत्रूंचा पाठलाग केला आणि मनचेहरसहित अनेक लोकांना कैद केले..
भातवडीच्या युद्धानंतर महाबली शहाजीराजे आणि मलिक अंबर यांच्यातील मतभेद तसेच निजामशाही दरबारातील अंतस्थ राजकारणामुळे शहाजीराजे हे १६२५ मध्ये आदिलशाहीमध्ये गेले होते. आदिलशाहीत महाबली शहाजीराजे यांना मानसन्मान देऊन सरलष्कर पद देण्यात आले. आदिलशाहीमध्ये देखील शहाजीराजांनी पराक्रम गाजवला, केरळ व कर्नाटक प्रांत जिंकून शहाजी महाराजांनी इब्राहिम आदिलशहाच्या खजिन्यात भर घातली. याविषयी कवी परमानंद म्हणतात ” त्या इब्राहिम आदिलशहाने संतुष्ट होऊन आपल्या शत्रूंचा विध्वंस करणाऱ्या शहाजीराजाला आपले अर्धपद दिले असे मला वाटते ”
१६२८-१६२९ मध्ये महाबली शहाजी महाराज हे निजामशाहीत आलेले दिसतात पण २५ जुलै १६२९ रोजी निजामशाहने कपटाने आपल्या दरबारात लखोजीराजे जाधव आणि त्यांच्या पुत्र व नातू यांची हत्या केल्यावर मात्र रागाने निजामशाहीस सहाय्य करण्याचे सोडून दिले. शहाजी महाराजांनी निजामशाहीतील काही भागांवर आक्रमण करून तो मुलुख देखील काबीज करत आपल्या स्वातंत्र्याची पहिली ठिगणी टाकली..
१६३३ साली शहाजीराजेंनी निजामशहाचा एक १० वर्षाचा वारसदार गादीवर बसवून दुसरा मुर्तुजा म्हणून त्याचा राज्यरोहण संस्कार केला. पेमगिरी या किल्ल्यावरुन या नामधारी निजामशाहाच्या नावे शहाजीराजे राज्यकारभार पाहू लागले. तेंव्हा मोगल आणि आदिलशाह यांनी शहाजीराजेंचा बंदोबस्त करण्यासाठी संयुक्त मोहीम काढली होती त्यासमयी शहाजीराजे यांनी तीन वर्ष लढा दिला होता. शहाजीराजेंनी जो लढा दिला होता त्याबद्दल शिवभारतकार कवी परमानंद लिहतात
” सूर्याप्रमाणे प्रतापी शहाजीने शाहजहान आणि आदिलशाह यांच्या सैन्याबरोबर तीन वर्षे युध्द केले. तेंव्हा शहाजीने आपला देश वगळून राहिलेल्या निजामशाहीच्या राज्यापैकी काही मुलुख दिल्लीच्या बादशाहास आणि काही मुलुख आदिलशाहिस दिला ”
दक्षिणेतील राजकारणात एका मोठ्या मराठा सरलष्कराने केलेले हे अभूतपूर्व धाडस होते त्याचा शेवट जरी चांगला नसला तरी मराठ्यांच्या दृष्टीने तो एक मैलाचा दगड होता. कवी परमानंद यांनी केलेले वर्णन हे अतिशय महत्वाचे आहे. शहाजीराजे आपल्या स्वतंत्र अस्तित्व आणि राज्यसाठी तीन वर्ष झुंजारपणे लढत होते. समोरील परिस्तिथितीचा शहाजीराजे यांनी विचार करून योग्य निर्णय घेण्यात वाकबगार असलेल्या शहाजीराजेंनी शत्रुपक्षाशी तह केला हे राजकीय मुत्सद्दीपणा आणि दूर दृष्टीकोणातुन योग्यच होते, यात शहाजी महाराजांचा प्रसंगावधानता आणि शत्रूच्या आंतरिक स्तिथीचा विचार करत योग्य निर्णय घेण्याचा एक पैलू दिसून येतो. तह झाल्यानंतर शहाजीराजे आदिलशाहीत गेले, शहाजीराजे यांच्यासारखे मातब्बर योद्धे पुणे प्रदेशात राहिले तर ते पुन्हा उपद्रव करतील याची मोगलांना भीती होती आणि ते संकट दूर करण्यासाठी शहाजी महाराजांना कर्नाटक प्रदेशात जहागीरी द्यावी असे आदिलशाह आणि मोगल यांच्यात करार झाला असावा ही शक्यता नकारता येत नाही यावरून शहाजीराजे यांचा तत्कालीन राजकीय आणि भौगोलिक परिस्थितीवर किती दबदबा आणि दरारा होता हे दिसून येतो …
१६३६ साली महाबली शहाजी महाराज हे आदिलशाहीतर्फे कर्नाटकात गेले, तेथून ते कारभार पाहू लागले. बाल शिवाजी, राजमाता जिजाऊ माँसाहेब व इतर मंडळी कर्नाटकात आल्यावर सर्वांना खूप आनंद झाला. थोड्याच दिवसात बाल शिवाजींचे शिक्षण सुरू झाले, त्यांच्या लेखन-वाचन याचा सराव सुरू झाला याविषयी शिवभारतात उल्लेख आला आहे. याविषयी कवी परमानंद म्हणतात –
” मग तो गुणवान मुलगा ( बाल शिवराय ) सात वर्षांचा झालेला पाहून तो मुळाक्षरे शिकण्यास योग्य झाला असे राजास ( शहाजी महाराज ) वाटले
प्रधानांच्या समवयस्क पुत्रांसह बुद्धीमान आणि स्पष्टोच्चार करणाऱ्या त्या पुत्राला गुरूच्या मांडीवर बसवले
गुरुजी जो पहिले अक्षर लिहिण्यास सांगतात तोच हा दुसरे अक्षर सुद्धा लिहून दाखवत असे
सकल विद्यांचे द्वारच अशी जी मुळाक्षरे ती सर्व गुरुजींने त्याला उत्तम रीतीने उत्तम रीतीने शिकवली
तेंव्हा स्वभावतःच बुद्धिमान, सुस्वभावी आणि अवर्णनीय प्रभावाच्या त्या राजबिंड्याला ( बाल शिवराय ) सर्व विद्यार्थ्यांमध्ये इतक्या लवकर मुळाक्षरे शिकलेला पाहून गुरूला मोठा अभिमान वाटला आणि हा काही विलक्षण मुलगा अशी त्याने खूणगाठ बांधली. ”
त्याच बरोबर युद्ध उपयोगी शिक्षणाचे दररोजचे सराव सत्र सुरू झाले. अश्व रोहण, दौड, तलवारबाजी, भालाफेक इत्यादी शिक्षण सुरू झाले. बाल शिवराय हे कर्नाटकमध्ये महाबली शहाजी महाराज यांच्या बरोबर दरबारात जात असत सहाजिकच बाल शिवराय हे दरबाराचा कारभार पहात असत असे उल्लेख आढळतो त्यांना आपल्या वडिलांच्या लष्करी, प्रशासकीय, राजकीय कारभाराचा अनुभव घेता आला. हे सर्व शिक्षण सुरू होते ते महाबली शहाजी महाराज आणि जिजाऊ माँसाहेब यांच्या देखरेखीखाली, साधारणता आपल्या आईवडिलांच्या देखरेखीखाली बाल शिवरायांना सर्व प्रकारचे शिक्षण मिळत होते हे सिद्ध होते.
महाबली शहाजी महाराजांनी स्वतंत्र राज्य स्थापन करण्याचे प्रयत्न केले पण ते प्रयत्न थोड्याफार प्रमाणात वेगवेगळ्या कारणाने अयशस्वी झाले, १६३६ साली निजामशाही संपुष्टात आल्यावर शहाजीराजे हे आदिलशाहीत दाखल झाले. आदिलशाहीत दाखल झाल्यावर शहाजी महाराजांनी रणदुल्ल्लाखान याच्या सोबत कर्नाटक स्वारी केली होती आणि यात शहाजी महाराजांनी अतुलनीय असा पराक्रम केला होता याबद्दल शिवभारतकार लिहतो की –
” बिंदुपुर ( बेदनुर ) चा राजा महातेजस्वी वीरभद्र, वृषपत्तनचा प्रसिद्ध राजा केंगनाईक, कावेरीपत्तनचा राजा महाबाहु जगदेव, श्रीरंगपट्टनचा राजा क्रूर कंठीराव, तंजावरचा राजा विजयराघव, तंजीचा (चंची) राजा प्रौढ़ वेंकटनाईक, मदुरेचा राजा गर्विष्ठ त्रिमलनाईक, पिलगुंडचा राजा उद्धट वेंकटाप्पा, विद्यानगरचा (विजयानगर) राजा धीट श्रीरंगराजा, हंसकुटचा ( होस्पेट) राजा प्रसिद्ध तम्मगौड़ा आणि इतरही राजांना शहाजीने आपल्या पराक्रमाने ताब्यात आणले ”
स्वराज्य संकल्पक शहाजीराजे यांनी बेंगलूर येथे राहून आपले अधिकार क्षेत्र वाढवले, आदिलशाहीची राजधानी विजापुर असूनही शहाजीराजे हे बेंगलूर येथे दरबारी आपली फौज, अनेक कवी, पंडित आणि अधिकारी यांच्यासह वात्सव्यास राहून आपली कर्तबगारी बजावत वेगळे स्वतंत्र असे राज्य चालवत होते. महाबली शहाजी महाराजांच्या या सर्व कर्तबगारीत आणि भुतकाळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेचा सार आहे.
शहाजी महाराजांच्या चरित्राचा विचार करत असताना त्यांंचा राजकीय मुस्तद्दीपणा, बुद्धीचातुर्य, धाडस, लढवय्येपणा तसेच अनेक पैलू त्यांनी केलेल्या अनेक पराक्रमातून आपल्या समोर येतात, याशिवाय शहाजी महाराजांचा महत्वाचा पैलू म्हणजे लोकसंघटन. महाबली शहाजी महाराजांच्या लोकसंघटन या पैलूबद्दल समकालीन कवी जयराम पिंडये आपल्या राधामाधवविलासचंपू या महत्वाच्या साधनात लिहतो –
” मनुष्यमात्र म्हटले म्हणजे त्याला काही तरी त्याच्या दृष्टीने सर्वोत्तम व्यसन असते. तसे शहाजीला सेनेचे व्यसन होते. सर्व काही गमावील, प्रसंगी प्राणही गमावतील पण सैन्य म्हणून कधीही हातचे जाऊ देणार नाही. शहाजी आपल्या सैन्याची व सैनिकांची इतकी पराकाष्टेची काळजी घेई की संकटसमयी इतर सर्व बाबींना गौणत्व देऊन,सैन्याच्या जोपासनेला व मशागतिला तो अनन्य प्राधान्य देई. शहाजीचा जसा सैन्यावर लोभ त्या प्रमाणेच सैनिकांचा शहाजीवर लोभ असे ”
शहाजी महाराजांची कारकीर्द पाहिली तर ते अनेकदा या शाहीतुन त्या शाहीत कार्यरत होते ही खांदेपालट करत असताना त्यांचे प्रत्येक ठिकाणी योग्य स्वागत आणि गौरवच केलेला दिसतो तो त्यांच्या अतुलनीय पराक्रम आणि महाबली शहाजी महाराजांच्या जवळ असलेल्या या लोकसंघटन केलेल्या सैन्यदळामुळे. स्वराज्य संकल्पक शहाजी महाराजांनी तीन वेळा स्वतंत्र राज्य स्थापन करण्याचा प्रयत्न केला तेंव्हाही हे सैन्य त्यांच्या पाठीशी नक्कीच उभे होते. शहाजी महाराजांनी लोकसंग्रहित केलेल्या काही मंडळींचा छत्रपती शिवाजी महाराजांना देखील स्वराज्य स्थापनेच्या पहिल्या टप्प्यात उपयोग झालेला आपणास दिसतो. सरलष्कर शहाजी महाराजांचा हाच लोकसंघटनाचा गुण छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगी देखील आपल्याला दिसून येतो.
१६५९ साली आदिलशाहचा सरदार अफजलखान याने स्वराज्यावर स्वारी केली होती, त्यात अफजलखान याचा वध झाला हा इतिहास सर्वांना माहीत आहे. महाबली शहाजी महाराजांनी याचदरम्यान विजापूरवर स्वारी केल्याची एक नोंद मिळते..
शहाजी महाराजांनी अफजलखानाच्या निषेधार्थ आणि विजापुरच्या शिवरायांवर केलेल्या मोहिमेच्या विरोधात आदिलशाहीला धड़ा शिकवण्यासाठी मोहीमेची माहिती हेन्री रेव्हिंगटनच्या १० डिसेंबर १६५९ चे राजापुरहुन लंडनला पाठवलेल्या एका पत्रात मिळते , त्यात तो लिहतो –
” one months tyme more will, put an end to this trouble for sevagee’s father, shawajee that lyes to south wards is expecitied with his army consisting 17000 men and they intend for vizapore. the king and queenz resistance, whose strength consists only in men and they are not above 10000 soulders so that in probadity the Kingdom will be lost ”
या पत्राचे मराठी भाषांतर असे आहे की ” एक महिन्यात ही दंगल शांत होईल असे वाटते. कारण शिवाजीचा बाप शहाजी दक्षिणेकड़े आहे तो १७००० सैन्य घेऊन आठ दिवसात येईल अशी अपेक्षा आहे आणि तो राजधानी विजापुरवर चालून जाईल आणि सैन्य अपुरे असल्याने हे राज्य बुडेल ”
१६६४ साली होदिगेरी येथे मुक्काम होता, शहाजी महाराज जंगलात शिकारीसाठी घोड्यावर स्वार निघाले असताना शिकारीचा पाठलाग करताना दुर्देवाने घोड्याचा पाय खळग्यात अडकून शहाजीराजे खाली पडले. या अपघातात शहाजीराजे यांना जबर मार लागला होता त्यातच त्यांचा २३ जानेवारी १६६४ रोजी मृत्यू झाला ..
महाबली शहाजी महाराज यांचा भातवडीचा पराक्रम, एक वेळा नाहीतर तब्बल तीन वेळा स्वतंत्र होण्याचे प्रयत्न असोत त्याच बरोबर प्रतिनिजामशाही स्थापन करत स्वतःकडे राज्यकारभार ठेवण्याचा प्रयत्न, आदिलशाही आणि मोगलांशी दिलेला लढा यावरून सरलष्कर शहाजी महाराज यांचा पराक्रम, संघटन कौशल्य, राजकीय मुस्तद्दीपणा आणि कर्तृत्व हे अतिउच्च पातळीचे होते हे दिसून येते. १६३६ साली दक्षिणेत गेल्यानंतर स्वतंत्र दरबारातून केलेला कारभार, बाल शिवाजी राजेंच्या शिक्षणाची केलेली व्यवस्था आणि शिवाजी महाराज बेंगलूर येथून परतताना त्यांच्या सोबत दिलेली आपली विश्वासू माणसे, ध्वज आणि मुद्रा हे पाहता शहाजी महाराजांच्या स्वराज्य संकल्पनेची कल्पना आपल्याला स्पष्टपणे येऊ शकते. दक्षिणेत शहाजी महाराजांनी गाजवलेला पराक्रम आणि मोहिमा या समोर येण्याची खूप मोठी गरज आहे, भविष्यात हे पराक्रम सविस्तरपणे नक्कीच मांडले जातील हि अपेक्षा आहे.
पराक्रम, युध्दप्रसंगाची बुध्दिमत्ता, उत्तम प्रशासन, स्वतंत्र राज्यकारभार या गुणांचे शिवरायांमध्ये बीजारोपण करणारे, अनंत संकटावर मात करत छत्रपती शिवाजी महाराजांना घडविणारे स्वराज्य संकल्पक महाबली महापराक्रमी छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्यगुरू शहाजीराजे भोसले यांना त्रिवार मानाचा मुजरा..
राज जाधव, बार्शी, सोलापूर