मुक्तपीठ टीम
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भारतीय रेल्वेच्या प्रवाशी वाहतुकीवर चांगलाच परिणाम झाला होता. अनेक मार्गांवरील गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. परंतु आता रेल्वे अनेक महत्त्वाच्या मार्गांवर पुन्हा सेवा सुरू करीत आहे. नव्यानं सुरुवात करताना रेल्वेनं प्रवाशांसाठी चांगली ऑफर आणली आहे. रेल्वेची तिकिटे बुक करताना पैसे वाचवता येतील. त्यासाठी प्रवाशांना भारताच्या यूपीआयच्या माध्यमातून रेल्वेच्या तिकिटे घेणाऱ्यांना सूट देत आहे. यूपीआयमार्फत तिकिट बुक करून एकूण ५% सूट मिळेल. रेल्वेची तिकिटे स्वस्त बुक करण्यासाठी या ऑफरचा फायदा घेता येईल. याआधी सुरु असलेली ही ऑफर आता पुढील वर्षभरही उपलब्ध असेल.
रेल्वेच्या ऑफरची केली घोषणा
या ऑफरची घोषणा करताना भारतीय रेल्वेने असे म्हटले आहे की, रेल्वेच्या काउंटरवर युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय) / भारत इंटरफेस फॉर मनी (बीएचआयएम) मार्फत रेल्वेच्या तिकिटावर उपलब्ध होणारी सवलत पुढील वर्षी १२ जून २०२२ पर्यंत वाढविण्यात आली आहे.
तिकिट बुकिंगवर ५० रुपयांची सूट
रेल्वे प्रवासी या सवलतीचा लाभ काउंटरवरुन तिकिट बुक करून आणि ऑनलाइन तिकिट बुक करुन घेऊ शकतात. रेल्वेने तिकिटांच्या पैशांवर एकूण ५० रुपयांच्या अधीन ५% सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. तिकिटावर जास्तीत जास्त ५० रुपयांची सूट मिळेल. तसेच तिकिटाची किंमत १०० रुपयांपेक्षा जास्त असावी.
ऑफरचा लाभ घेण्यासाठी पुढीलप्रमाणे करा तिकिटे बुक
• सर्वप्रथम पीआरएस काउंटरवरील रेल्वे कर्मचारी प्रवाश्यांकडून सर्व प्रवासाचा तपशील घेतील आणि भरलेल्या रकमेची माहिती देतील.
• त्यानंतर प्रवाशाला पेमेंट पर्याय म्हणून यूपीआय / बीएचआयएममार्फत तिकिटाची किंमत भरण्याचा पर्याय निवडावा लागतो. ज्यानंतर काउंटरवरील व्यक्ती यूपीआय पेमेंट पर्याय म्हणून निवडेल.
• यानंतर, प्रवाशाला त्याच्या मोबाइलवर पेमेंटशी संबंधित संदेश मिळेल.
• प्रवाशाला पेमेंट संदेशाची खात्री करावी लागेल. यानंतर यूपीआयशी जोडलेल्या खात्यातून तिकिटाची रक्कम डेबिट केली जाईल.
• पैसे भरल्यानंतर पीआरएस काउंटरवर बसलेली व्यक्ती तिकीट प्रिंट करेल आणि प्रवाशाला तिकीट मिळेल.