मुक्तपीठ टीम
काँग्रेसचे नेते राहुल गांधी २ दिवसांच्या जम्मू काश्मीर दौऱ्यावर आहेत. गुरुवारी त्यांनी १४ किलोमीटर पायी चालत वैष्णोदेवीचं दर्शन घेतलं. आज राहुल गांधी पक्षाचे नेते, कार्यकर्ते, आमदार आणि माजी मंत्र्यांची भेट घेणार आहेत.
राहुल गांधी अनेक वर्षांपासून वैष्णोदेवीचं दर्शन घेण्यासाठी इच्छुक होते. गेल्या ३ वर्षांपासून पक्षाचे नेते त्यांना याठिकाणी येण्यासाठी आमंत्रित करत होते. मात्र राजकीय परिस्थिती पाहता राहुल गांधींच्या दौऱ्याचं नियोजन होत नव्हतं. आता परिस्थितीत थोडीशी सुधारल्यामुळे राहुल गांधींचा हा दौरा असल्याचं जम्मू काश्मीर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष गुलाम अहमद मीर यांनी सांगितलं आहे.
राहुल गांधींनी घेतलं वैष्णोदेवीचं दर्शन
- मंदिरात जाण्यासाठी अनेक नेते हेलिकॉप्टर आणि घोड्याचा वापर करतात.
- मात्र राहुल गांधी कटरापासून मंदिरापर्यंत पायी गेले.
- मंदिरात पूजाअर्चा केल्यानंतर पायीच ते खाली उतरले.
- राहुल गांधींच्या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी कोणत्याही राजकीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं नव्हतं.
लडाख दौऱ्याचंही नियोजन
- जम्मू काश्मीरच्या दौऱ्यानंतर राहुल गांधी लडाखचाही दौरा करु शकतात.
- या भागातली तणावपूर्ण स्थिती निवळल्यानंतर सर्वच जिल्ह्यांचा दौरा करण्यासाठी राहुल गांधी तयारीत आहेत.
- या दौऱ्यादरम्यान स्थानिकांसोबत संवाद साधून त्यांच्या समस्या राहुल गांधी जाणून घेतील.
- कलम ३७० हटवल्यानंतर राहुल गांधींचा जम्मू काश्मीरचा हा दुसरा दौरा आहे.
- ९ ऑगस्टला त्यांनी श्रीनगरचा दौरा करुन तिथल्या पक्ष कार्यालयाचं उद्घाटन केलं होतं.