मुक्तपीठ टीम
भारत जोडो यात्रेत मध्य प्रदेशातील आगर माळवा येथे जाहीर सभेला संबोधित करताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजप आणि आरएसएसवर हल्लाबोल केला आहे. “हे लोक ‘जय सियाराम’चा जयघोष करत नाहीत. कारण ते सीतेला मान देत नाहीत. त्यांच्या संघटनेत महिलांना स्थान नाही. मी आरएसएसच्या मित्रांना सांगू इच्छितो की, जय श्री रामा व्यतिरिक्त ‘जय सियाराम’ आणि ‘हे राम’ वापरा, सीताजींचा अपमान करू नका.” असे वक्तव्य राहुलल गांधीनी या जाहीर सभेत केले.
‘जय सियाराम’ किंवा ‘हे राम’ असा जयघोष करण्याचा राहुलल गांधींचा भाजप आणि आरएसएसला सल्ला!
राहुल गांधी म्हणाले की, ‘जय सियाराम’ किंवा ‘जय सीताराम’ असा जयघोष करावा. याचा अर्थ राम आणि सीता एक आहेत असा होतो. पण, सीतेला मानत नसल्याने भाजप आणि आरएसएस जय श्री रामचा जयघोष करतात. भाजपने आता आपला नारा बदलावा, असा सल्ला त्यांनी दिला.
राहुल गांधींनी ‘या’ तीन जयघोषांचे दिले स्पष्टीकरण
१. ‘हे राम’
- हे राम म्हणजे, अहो राम.
- राम ही एक जीवनपद्धती होती, प्रभू राम ही केवळ एक व्यक्ती नव्हती, जीवन जगण्याची पद्धत, प्रेम, बंधुता, आदर, तपश्चर्या, त्यांनी संपूर्ण जगाला जगण्याचा मार्ग शिकवला.
- हे राम असाही जयघोष करावा कारण, प्रभू राम ही भावना आपल्या हृदयात आहे आणि त्याच भावनेने आयुष्य जगायचे असते.
२. ‘जय सियाराम’
- ‘जय सियाराम’ म्हणजे जय सीता आणि जय राम.
- सीता आणि राम एकच आहेत यातून हे स्पष्ट होते.
- त्यामुळे जय सियाराम किंवा जय सीताराम असा जयघोष करावा.
- प्रभू राम सीताजींच्या सन्मानासाठी लढले. आम्ही जयासियाराम म्हणतो आणि सीतेसारख्या महिलांचा समाजात आदर करतो.
३. ‘जय श्री राम’
- यामध्ये आपण प्रभू रामाचा जयजयकार करतो.
- भाजपवाले जय श्री राम म्हणतात, पण जय सियाराम आणि हे राम का म्हणत नाहीत.
- प्रभू राम ज्या भावनेने जीवन जगले त्या भावनेने आरएसएस आणि भाजपचे लोक जीवन जगत नाहीत.
- रामाने कोणावरही अन्याय केला नाही.
- समाजाला जोडण्याचे काम रामाने केले.
- रामाने सर्वांना आदर दिला. आरएसएस आणि भाजपचे लोक प्रभू रामाच्या जीवनपद्धतीवर चालत नाहीत.
- ते सियाराम आणि सीताराम करू शकत नाहीत, कारण त्यांच्या संघटनेत एकही महिला नाही, म्हणून ती जयसिया रामाची संघटना नाही, त्यांच्या संघटनेत सीता येऊ शकत नाही.
भाजप आणि आरएसएसला सीतेचा आदर करण्याची विनंती!
राहुल गांधी म्हणाले की, “भाजप आणि आरएसएस जय सियाराम म्हणू शकत नाहीत कारण पक्षात एकही महिला नाही आणि ती ‘सियाराम’ची संघटना नाही. तिथे सीता नाही. त्यांनी सीतेला बाहेर ठेवले. म्हणून माझ्या आरएसएस मित्रांना विनंती आहे की, कृपया जय श्री राम तसेच जय सियाराम आणि हे राम असा जयघोष करा.”