मुक्तपीठ टीम
कोरोना काळात आलेल्या मंदीवर मात करून खिशात तेजी आणण्यासाठी दुसऱ्यांच्या बँक खात्यातील अब्जावधी ढापण्याचा कट एका हाय-टेक टोळीनं रचला होता. तो कट रचण्याच्या आरोपाखाली पुणे पोलिसांनी आयटी अभियंत्यांच्या एका टोळीला जेरबंद केले आहे. या टोळीत भाजपाचा पुण्यातील एक पदाधिकारीही पकडला गेल्याने खळबळ माजली आहे. या खात्यांमध्ये २१६ कोटी २९ लाख ३४ हजार २४० रुपये एवढी रक्कम आहे. पुणे पोलिसांच्या सायबर क्राइम पथकाने माहिती मिळाल्यानंतर रात्रभर कारवाई करून टोळीला जेरंबद करून गोपनीय माहिती विकण्यासाठी घेतलेली २५ लाख रुपयांची आगाऊ रक्कमही जप्त केली आहे.
आयटी टोळीचा ई-घोटाळ्याचा कट होता तरी कसा?
- बँकांमध्ये अनेक खाती वापरात नसतात, अशा वापरात नसलेल्या काही खात्यांमध्ये मोठ्या रकमा असतात.
- बँकांमधील आयटी विभागात कार्यरत अभियंत्यांनाही त्याची माहिती असते.
- डॉरमेंट अकाऊंट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशा खात्यांची माहिती चार आयटी अभियंते चोरत असत.
- खरंतर बँक खातेधारकांचे खात्यातील जमा रक्कम, पिन क्रमांक आणि इतर गोपनीय माहिती दुसऱ्यांना माहिती असू नये. ती गोपनीय असावी.
- पण हे अभियंते बँकांमधील वापरात नसलेल्या खात्यांची ती गोपनीय माहिती मिळवत असत.
- आयटी अभियंते त्यांनी मिळवलेली ही गोपनीय माहिती भाजपाच्या चित्रपट आघाडीचे शहराध्यक्ष रोहन मंकणी यांना देत असत.
- चार आयटी अभियंत्यांनी चोरलेली माहिती उर्वरित पाचजणांना पुरवली जात असे.
- त्या पाचजणांमध्ये दोन सॉफ्टवेयर अभियंते आणि तीन स्टॉक ब्रोकर/ व्यापारी खरेदीदार आहेत
- आरोपी रोहन मंकणी बँक खात्यांच्या गोपनीय माहितीची विक्री करून त्याबदल्यात मोठी रक्कम मिळवणार होते.
- या खात्यांमध्ये २१६ कोटी २९ लाख ३४ हजार २४० रुपये एवढी रक्कम होती.
- इतर आरोपी त्या गोपनीय माहितीचा वापर करून वापरात नसलेल्या बँक खात्यांमधील मोठ्या रकमा दुसऱ्या खात्यांमध्ये वळवून हडपणार होते.
- हा एक प्रकारचा बँक खात्यांमधील ई-घोटाळाच!
त्याबद्दलची माहिती पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर त्वरित हालचाली झाल्या. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अतिरिक्त आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त भाग्यश्री नवटके, सहायक आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने तपास सुरू करण्यात आला. सिंहगड रस्त्यावरील सुधीर भटेवरा यांच्याकडून पैसे घेण्यासाठी आरोपी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा लावून आरोपींना पकडण्यात आले. आरोपींकडून बँक खात्यांची गोपनीय माहिती विकण्यासाठी आगाऊ रक्कम म्हणून मिळालेली पंचवीस लाखांची रोकड जप्त करण्यात आली.
त्यानंतर गुजरातमधील आणखी दोन संशयित मुंबईतील रेल्वे स्थानकावर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांची टीम मुंबईत गेली आणि त्यांना अटक केली. रात्रभर चाललेल्या कारवाईत पोलिसांनी २५ लाख रुपये, दोन दुचाकी, एक स्कूटर आणि ११ सेलफोन जप्त केले.
पोलिस उपायुक्त (सायबर) भाग्यश्री नवाटके यांनी सांगितले की, “यापैकी बरीच खाती गेल्या काही वर्षांपासून वापरात नव्हती. अटक केलेले संशयित आरोपी हैदराबाद, औरंगाबाद, सूरत, पुणे आणि इतर ठिकाणाहून आले आहेत.”
“एखादा मोठा सायबर क्राईम होण्यापूर्वी पोलिसांकडून ही मोठी प्रतिबंधात्मक कारवाई आहे. खासगी बँकांच्या अधिकाऱ्यांना आम्ही त्यांच्या ग्राहकांच्या डेटाच्या सुरक्षेबाबत विचारणा करू,” असेही पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
बँक ई-घोटाळा प्रकरणातील अटक आरोपी
- रोहन रवींद्र मंकणी
- रवींद्र महादेव माशाळकर
- आत्माराम हरिश्चंद्र कदम
- मुकेश हरिश्चंद्र मोरे
- विशाल धनंजय बेंद्रे
- सुधीर शांतिलाल भटेवरा
- राजेश मुन्नालाल शर्मा
- परमजितसिंग संधू
- अनघा अनिल मोडक