मुक्तपीठ टीम
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री आणि ॲग्रिकल्चरचा एक ज्वलंत इतिहास असून राज्यातील उद्योग वृद्धीसाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे मोठे योगदान आहे. मराठी माणसाला उद्योग निर्मितीत प्रोत्साहन देत उद्योगवाढीसाठी महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स यांचे काम अखंडपणे सुरू आहे. या ‘महाराष्ट्र चेंबर पत्रिके’च्या ५१ व्या वर्षाच्या पहिल्या अंकाचे प्रकाशन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक दीपक कपूर यांच्या हस्ते आज मंत्रालयात करण्यात आले.
या पुस्तक प्रकाशन प्रसंगी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री आणि ॲग्रिकल्चरचे नवनियुक्त अध्यक्ष ललित गांधी, माजी उपाध्यक्ष समीर दूधगावकर तसेच प्रभारी सरकार्यवाह सागर नागरे उपस्थित होते.
भारतीय उद्योजकांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर उद्योग व व्यापारात अग्रेसर ठेवण्यात महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सला ९५ वर्षांचा गौरवशाली इतिहास आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण, शहरी, लहान-मोठे, उद्योजक व्यापारी आणि व्यावसायिकांसाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री आणि ॲग्रिकल्चरच्या माध्यमातून कार्य करीत आहे. याचे कौतुक दीपक कपूर यांनी यावेळी केले.
याप्रसंगी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्यावतीने दीपक कपूर यांना ‘भगवद्गीता’ हा ग्रंथ भेट तसेच शाल देऊन सत्कार करण्यात आला.