लवकरच देशभरात पब्लिक टेलिफोन बूथप्रमाणे पब्लिक वायफाय बूथ सुरू करण्यात येणारायत. या कामासाठी पीएम वाय-फाय एक्सेस नेटवर्क इंटरफेस म्हणेजच पीएम-वाणी नावाची इको सिस्टम तयार केली जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या समितीने पीएम-वानी याला मंजूरी दिलीय. पान टपरी आणि किराणा दुकानांसारख्या ठिकाणीही आता पब्लिक वायफाय सुविधा उपलब्ध असेल.
सरकारच्या या निर्णयामुळे ४ जी नेटवर्कपासून वंचित भागातील ग्राहकांनाही हाय-स्पीड इंटरनेटचा आनंद घेता येणाराय. त्याचबरोबर ग्रामीण आणि दुर्गम भागातील लोकांना इंटरनेटच्या माध्यमातून आरोग्य, शिक्षण आणि वस्तूंची खरेदी व विक्री यासारख्या सुविधा मिळतील.
पब्लिक डेटा ऑफिस (पीडीओ) म्हणजेच स्थानिक दुकानदार, पब्लिक डेटा ऑफिस अॅग्रीगेटर (पीडीओए), अॅप प्रोव्हाईडर आणि सेंट्रल रजिस्ट्री पीएम-वाणी इको सिस्टमशी जोडली जाईल. पीडीओ पेड पब्लिक वाय-फाय एक्सेस पॉइंट स्थापित करण्यास सक्षम असतील. एका अॅपच्या मदतीने वापरकर्ते पब्लिक वाय-फाय वापरण्यास सक्षम असतील. केंद्रीय रेजिस्ट्री या सर्व गोष्टींवर नजर ठेवेल, जी सी-डॉटचा भाग असेल.
नोंदणीकृत पीडीओ लहान दुकानांमध्ये आपले पॉइंट लावतील जेथे सामान्य लोक त्यांच्या गरजेनुसार वाय-फाय वापरु शकतील. वापरकर्त्यांना ही सुविधा २ ते २० रुपयांच्या पॅकमध्ये उपलब्ध होऊ शकते. या प्रकारची सुविधा सुरू झाल्यास, वाय-फाय एक्सेस आणि त्यांची देखभाल करणाऱ्या छोट्या कंपन्या पुढे येतील. पंतप्रधान मोदी म्हणाले की, ऐतिहासिक पीएम वाणी योजना तंत्रज्ञानाच्या जगात क्रांती घडवून आणेल. भारताच्या कानाकोपऱ्यात वाय फायची उपलब्धता लक्षणीयरीत्या सुधारेल. यामुळे व्यवसायातील आणि जीवनातील सुलभता वाढेल.