मुक्तपीठ टीम
कोरोनाविरोधात जगात अनेक उपाय शोधले जात आहेत. आपल्या सर्वांच्या आवडत्या लालपरीनं लाखो प्रवाशी प्रवास करतात. त्यांचे कोरोनापासून संरक्षण करण्याबरोबरच त्यांच्यातील कुणी कोरोनाग्रस्त असेल तर आवडती लालपरी कोरोनावाहक होऊ नये यासाठीही परिवहन महामंडळ काळजी घेत आहे. त्यासाठी एसटी बस, स्थानक येथे जास्त स्पर्श होणारे जे संवेदनशील भाग आहेत तेथे नमुने (स्वॅब) घेऊन प्रयोगशाळेत चाचणी केली जाईल. यातून संसर्गाचे प्रमाण कळू शकेल. तसेच कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी बसेसवर अँटी-मायक्रोबियल कोटिंग केलं जाणार आहे. या कोटिंगमुळे कोरोनाचे विषाणू रोखता येण्यास मदत होऊ शकेल.
- चाचणी आणि ट्रेसिंग या प्रक्रियेत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एक वेगळा प्रयोग करण्याचे ठरवले आहे.
- त्यासाठी एसटी बसच्या तसेच आगारातील सर्वाधिक मानवी स्पर्श होणाऱ्या जागांवरून नमुणे गोळा केले जातील.
- हे नमुने (स्वॅब) घेऊन प्रयोगशाळेत चाचणी केली जाईल.
- या प्रयोगाद्वारे नेमका संसर्ग किती आणि कसा पसरतो, त्याची माहिती मिळून कोरोना साखळी तोडण्याची योजना अधिक प्रभावीरीत्या राबवता येईल.
एसटीची लालपरी ग्रामीण जीवनरेखा
- सध्या एसटीच्या ताफ्यात सुमारे १८ हजार बस आहेत.
- एसटीच्या लाल रंगाच्या बसेस लालपरी म्हणून ओळखल्या जातात. महाराष्ट्राच्या दुर्गम भागासाठी त्याच जीवनरेखा म्हणून काम करतात.
एसटीही होणार कोरोनामुक्त
- दुसऱ्या लाटेत महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात संक्रमणाचा बराच प्रसार झाला आहे.
- कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी एसटी बसमध्ये अँटी-मायक्रोबियल कोटिंग केले जाणार आहे.
- या कोटिंगमुळे कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखता येऊ शकतो, असा दावा केला जातो.
एसटी बसेसचे नमुणे नियमित तपासणार
- एसटी आता बसच्या स्वॅब टेस्टसाठी एका वर्षात बसमधून ९ हजार स्वॅब गोळा करण्याची योजना आखत आहे.
- शेकडो बसमधून कोरोना विषाणूचे नमुने गोळा करुन पुढील चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले जातील.
- याकरिता एसटी महामंडळाकडून निविदा काढण्यात आली आहे.
एसटी महामंडळ आता विषाणूविरोधात एक पाऊल पुढे
- आता बसवरील रासायनिक कोटिंग कालबाह्य होण्यापूर्वी अँटी-मायक्रोबियल कोटिंगचा प्रभाव तपासण्याची योजना आखली आहे. एसटीमधील नमुणे तपासणीसाठी एक प्रयोगशाळा नियुक्त केली जात आहे.
- ही प्रयोगशाळा फक्त कोरोनाच नाही तर H1N1 किंवा SARS किंवा इन्फ्लूएन्झा विषाणूंची उपस्थिती शोधण्याची प्रक्रिया राबवेल.
- एसटी महामंडळाने या प्रक्रियेसाठी हाफिकन इंस्टिट्युटचीही मदत घेतली आहे.
एसटी बसची कोरोना तपासणी कशी होणार?
- खरंतर महाराष्ट्रात एसटीचे ३१ विभाग आणि २५० बस डेपो आहेत. एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांचे एक पथक प्रत्येक प्रभागातून एकूण पाच बस निवडून प्रयोगशाळेला चाचणीसाठी कळवेल.
- त्यानंतर प्रयोगशाळेला सात दिवसांच्या आत स्वॅब गोळा करावे लागतील.
- हे स्वॅब बसच्या त्या भागांमधून घेतले जातील जिथे प्रवाशांचा बसला स्पर्श होतो.
- जसे बस दरवाजा हँडल, फ्रेम रॉड, हँडल हँड/ग्रॅब रेल, आर्म रेस्ट (हँड रेस्ट), खिडक्यांवर गार्ड रेल, ड्रायव्हर स्टीयरिंग व्हील, पॅसेंजर सीट इ. असे एकूण दहा नमुने गोळा केले जातील.