मुक्तपीठ टीम
महाराष्ट्राच्या राजकारणात प्रस्थापितांना हादरे देणारा भारिप- बहुजन महासंघाचे नेते ऍड प्रकाश आंबेडकर यांचा ‘ अकोला पॅटर्न’ एकेकाळी गाजला होता. त्यानंतर गेल्या ११ महिन्यात सुमारे अडीच हजार शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर, प्रख्यात शेतीतज्ज्ञ, ‘ओबीसी इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ऍग्रीकल्चर’ चे चेअरमन प्रा काशीराम वंजारी हे शेतकऱ्यांना जगवण्यासाठी आता ‘अकोले पॅटर्न’ घेऊन आले आहेत.
बळीराजाला वाचवण्यासाठी रामबाण उपाय ठरणारा एक फॉर्म्युला ते उद्या बुधवारी २३ फेब्रुवारी रोजी मुंबईत जाहीर करणार आहेत. त्यासाठी दुपारी ३ वाजता ते मुंबई मराठी पत्रकार संघात पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनसहित मीडियाशी संवाद साधणार आहेत.
अभिनेता सुशांतसिंग राजपूत याने केलेली आत्महत्या दुःखद आणि धक्कादायक असल्याने ती बातमी राष्ट्रीय होते, यावर आमचे दुमत नक्कीच नाही. पण राज्यातील हजारो शेतकऱ्यांच्या आत्महत्या चिंताजनक आणि कृषीप्रधान देशासाठी लांच्छनास्पद आहेत. हे आत्महत्यांचे सत्र रोखण्यासाठी ओबीसी इंडियन चेंबर झटत आहे. आमच्या या प्रयत्नांना हातभार लावून मीडियाने साथ द्यावी, असे आवाहन त्या चेंबरतर्फे प्रा सुरेश जांभुळकर यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.
शेतसारा भारण्याचीही ऐपत नाही
लहरी निसर्ग आणि दलालांची मर्जी – मनमानी यांच्या कात्रीत राज्यातील शेतकरी सापडला आहे. लागवड खर्चात वाढ, उत्पादनात घट आणि शेतीमालाला समाधानकारक बाजारभाव मिळत नसल्याने शेती व्यवसाय तोट्याचा आणि बेभरवशाचा बनला आहे असे सांगतानाच विदर्भातील बड्या बड्या शेतकऱ्यांची शेतसारा भरण्याची सुद्धा ऐपत राहिलेली नाही, याकडे ओबीसी इंडियन चेंबरने लक्ष वेधले आहे.