प्रा. हरी नरके / व्हा अभिव्यक्त!
शिवसेनेतील बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे आकडा जुळून येत असतानाच महाराष्ट्रातील जनमानसातून त्यांच्याविरोधातील काही चर्चा रंगू लागल्या आहेत. प्रा. हरी नरके यांनी सामान्य माणसांचे काही प्रश्न एकनाथ शिंदेंसमोर मांडून उत्तर मागितले आहे.
सामान्य माणसांचे काही प्रश्न…
- माझ्या माहितीप्रमाणे बाळासाहेब कधीही न गुजरातला गेले होते, ना आसामला. मग तुम्ही बंदोबस्तात १२०च्या स्पीडने आधी सुरतेला नी नंतर गोहाटीला का पळालात?
- आपण कोणाला घाबरत नाही हे विधान महाराष्ट्रात येऊन का करीत नाही?
- बळजबरी नाही तर “पाकिस्तानला नमवणाऱ्या महाशक्तीच्या” कोंडवाड्यात का बसला आहात?
- हिंदुत्वाचा पुळका पी.ए.ला इडीची नोटीस आल्यावरच कसा काय आला?
- कालपर्यंत ज्यांना “कुटुंबप्रमुख” म्हणत होतात, परमपूज्य म्हणत होतात, ते रातोरात खलनायक कसे काय झाले? हेच शिकवले बाळासाहेबांनी?
- पक्ष बदलता येतो, “कुटुंबप्रमुख” नाही. तुमचे हे ” तथाकथित हिंदुत्व ” तुम्हाला “कुटुंबप्रमुख (बाप) ” बदलायला सांगते का? हा ज्येष्ठांचा आदर शिकवला तुमच्या हिंदुत्वाने ?
- ज्यांनी पक्ष उभा करणाऱ्या मुंडे, खडसेंचे हाल केले, ते तुमची उपयुक्तता संपली की तुमचे काय हाल करतील याचाही राडीसनमध्ये मिळालेल्या सक्तीच्या विश्रांतीमध्ये विचार करा.
- “झाडास बांधीलियास झाड उपटून पळणारे” लढवय्ये नसतात, बाजारबुणगे असतात. “बचेंगे तो और लढेंगे” हे वचन कधी ऐकले आहे का?
- बहुजनांना वापरा आणि संपवा, नाहीसेच करा हा ज्यांचा हजारो वर्षांचा इतिहास आहे, त्यांच्यावर विश्वास ठेवणे ही फक्त आत्महत्या आहे.
- नवा कोरा व्हिडिओ बाजारात आलाय. हिटलरच्या जळीत घरातला (कॅम्पमधला) ज्यू म्हणतोय, “मी स्वखुशीने मुरदाघरात आलो आहे. इथे मला काहीच कमी पडू देणार नाहीत. इथे इडीचे दु:ख नाही. आहे फक्त बळी देण्यापूर्वी बक्र्याला सजवतात तसे सजवलेले अडीच दिवसांचे सुख!
(प्रा. हरी नरके हे ५४ पुस्तकांचे लेखक-संपादक. वक्ते, संशोधक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या साहित्याचे संपादक प्राध्यापक आणि विभागप्रमुख – महात्मा फुले अध्यासन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ, पुणे [निवृत्त] आहेत.)