मुक्तपीठ टीम
रावसाहेब पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना कर्जमुक्त करण्यासह उसाला ३००० रुपयांचा बाजारभाव देणार आहोत. भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शी आणि लोकाभिमुख कारभाराला किसान क्रांती पॅनलचे प्राधान्य असून, संगणकीकृत यंत्रणा, डिजिटल वजन काटा आणि पारदर्शी टेंडर प्रक्रिया राबविण्यात येईल. विद्यमान चेअरमन अशोक पवार यांच्या अनागोंदी व भ्रष्ट कारभाराचा लेखाजोखा मांडला असून, सभासदांनी ही निवडणूक हाती घेतल्याने किसान क्रांती पॅनल बहुमताने निवडून येणार आहे,” असा विश्वास व निर्धार पॅनलचे ऍड. सुरेश पलांडे यांनी व्यक्त केला. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ॲड. सुरेश पलांडे बोलत होते. प्रसंगी उमेदवार आबासाहेब गव्हाणे, शिरूर तालुका भाजपचे आबासाहेब सोनवणे, काकासाहेब खळदकर, कैलास सोनावणे, संजय पलांडे आदी उपस्थित होते.
ॲड. सुरेश पलांडे म्हणाले, “अशोक पवार यांच्या गेल्या २५ वर्षातील एककल्ली कारभारामुळे कारखान्याचे, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. परिसरात उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात असतानाही इतर कारखान्यांच्या तुलनेत घोडगंगाचे गाळप कमी होत आहे. शेतकऱ्याला बाजारभाव देखील कमी दिला जात असून, इतर कारखान्यांच्या तुलनेत ३०० ते १२०० रुपयांचे प्रतिटन इतका कमी भाव दिला जात आहे. २१-२२ या हंगामात घोडगंगा कारखान्याने सात लाख पोती साखर उत्पादित केली. इतर कारखान्याच्या तुलनेत साखरेच्या एका पोत्यामागे ७०० ते ९०० रुपये अधिक उत्पादन खर्च अधिक झाल्याने ६३ कोटी रुपये इतका भुर्दंड बसला आहे. एका हंगामात भीमाशंकर साखर कारखान्याच्या तुलनेत ६३ कोटी रुपये जास्त खर्च केले आहेत. अशा प्रकारे या जास्तीच्या खर्चातून खाजगी कारखान्याचा खर्च चावत आणि प्रचंड भ्रष्टाचार होत असल्याचे सभासद शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. २०२१-२२ वार्षिक अहवालाप्रमाणे कारखान्यावर ३८५ कोटी ६४ लाख इतके कर्ज व देणे आहे. गेल्या हंगामात ४१ कोटी ९१ लाख रुपयांचा तोटा झालेला आहे. त्याचप्रमाणे सप्टेंबर २०२२ मध्ये कारखान्याने ५५ कोटी रुपयांचे पूर्वहंगामी कर्ज घेतले असून, त्याचा वापर बेकायदेशीरपणे एफआरपी देण्यासाठीऊ केला आहे. ही वस्तुस्थिती लक्षात कारखान्यावर ४५० कोटीपेक्षा जास्त कर्ज व देणी असल्याचे कारखान्याने सादर केलेल्या वार्षिक लेखापरीक्षण अहवालावरून स्पस्स्त होत आहे.”
“चेअरमन अशोक पवार यांनी घोडगंगा साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात व्यंकटेश्व कृपा हा खाजगी साखर कारखाना उभारला असून, घोडगंगेच्याच खर्चात हा खाजगी साखर कारखाना चालवला जातोय की काय? अशी परिस्थिती आहे. कारण २०१९ मध्ये एक क्विंटल साखर बनवायला भीमाशंकर कारखान्यापेक्षा १४८३ रुपये अधिक लागल्याचे दिसून येते. हा उघडपणे फुगवलेला खर्च आहे. एवढेच नाही, तर गेल्या चार वर्षात प्रवास खर्च आणि कायदा व सल्ल्याची फी तीन कोटींच्या वर खर्च केली गेली आहे. वीजनिर्मितीच्या बाबतीतही दौंड साखर कारखान्याच्या तुलनेत कमी वीज उत्पादनामुळे १०० कोटींच्या वर तोटा झाला आहे. ५००० मेट्रिक टन गाळप क्षमता करणेसाठी मंजुरी मिळूनही केवळ २५०० मेट्रिक टन गाळप होते. तसेच विस्तारवाढीचा प्रकल्प राज्य व केंद्र सरकारची मंजुरी मिळवून आणि २१ कोटीपेक्षा अधिक खर्च करूनही अद्याप रखडलेला आहे. अशोक पवार यांच्या या अशा मनमानी, स्वार्थी आणि खिसा भरू कारभारामुळे घोडगंगा कारखान्याच्या सभासदांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे सभासदांमध्ये या कारभाराविषयी चीड आहे,” असे ॲड. पलांडे यांनी सांगितले.
सभासदांच्या हाती निवडणूक
अशोक पवार यांच्या २५ वर्षांच्या भ्रष्ट कारभाराला वैतागलेल्या सभासदांनी ही निवडणूक हाती घेतली आहे. अनेक अदृश्य शक्ती एकवटल्याने अशोक पवार व त्यांच्या पॅनेलचा सुपडासाफ होणार आहे. सर्व पक्षाच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी परिवर्तनाचा निर्धार केला असून, शेतकऱ्यांच्या व कारखान्याच्या हिताला प्राधान्य देणाऱ्या लोकांना संचालक मंडळावर पाठवण्याचा विडा उचलला आहे. लोकाभिमुख कारभार करण्याऐवजी सभासदांची अडवणूक करायची असा प्रकार केल्याने तालुक्यातील जनता, शेतकरी व सहकार क्षेत्राशी संबंधित सर्वच अशोक पवार यांच्यावर नाराज आहेत. विरोधक कारखाना कसा चालवणार असा दिशाभूल करणारा प्रश्न अशोक पवार करत आहेत. केंद्रातील व राज्यातील सेना-भाजपाचे सरकार सत्तेत असून, घोडगंगा साखर कारखान्याच्या प्रगतीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वस्त केले आहे.
घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ६ नोव्हेंबर २०२२ रोजी होणार आहे. सर्वपक्षीय लोकांनी एकत्र येवून घोडगंगा किसान क्रांती पॅनेलची स्थापना केलेली आहे. घोडगंगा कारखान्याच्या दुरावस्थेला फक्त आणि फक्त चेअरमन अशोक पवार हे कारणीभूत आहेत. त्यामुळे येणाऱ्या निवडणूकीमध्ये भ्रष्टाचार मुक्त पारदर्शक कारभारासाठी घोडगंगा किसान क्रांती पॅनेलला विजयी करावे. उद्या शुक्रवारी (ता. ४) दुपारी ४.०० वाजता राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील घोडगंगा किसान क्रांती पॅनलला समर्थन देण्यासाठी मांडवगण फराटा येथे सभा घेणार आहेत. राज्य सरकार या पॅनेलच्या पाठीमागे समर्थपणे उभे आहे, हा देवेंद्र फडणवीस यांचा निरोप जनतेपर्यंत पोहोचवणार आहेत.