मुक्तपीठ टीम
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ज्याप्रकारे मनसुख हिरेन प्रकरणात गदारोळ घातला तशीच भूमिका अन्वय नाईक प्रकरणात का घेतली नाही? सर्वोच्च न्यायालयाने निकाल नाही तर फक्त जामीन दिला आहे. पण विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी निकाल दिल्याचे सांगून दिशाभूल केली, असा आरोप अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांनी केला. फक्त श्रीमंत व्यक्तींनाच न्याय मिळणार का? असा उद्विग्न सवाल अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांनी उपस्थित केला आहे. अधिवेशनात आक्रमक भूमिका घेऊन आघाडी सरकारला अडचणीत आणणाऱ्या फडणवीसांसमोरही आता त्यांच्या सत्ताकाळातील प्रकरणे संकटं उभी करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अन्वय नाईक यांची पत्नी आणि मुलगी यांनी देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन भाजप सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. या दोघींनी मनसुख हिरेन प्रकरणाचा दाखला देत भाजप सरकारवर टीका केली आहे. मनसुख हिरेन प्रकरणात काही तासांमध्ये कारवाई केली जाते. आमच्या प्रकरणाला तर तीन वर्षे झाली. तरीही अद्याप विशेष कारवाई झाली नाही. काही प्रकरणात तातडीने सीडीआर काढला किंवा मिळवला जातो. तेही विरोधी पक्षात असताना! असाच सीडीआर मुख्यमंत्री असताना का काढण्यात आला नाही, असा सवालही अन्वय नाईक कुटुंबीयांनी केला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसुख हिरेन प्रकरणात सचिन वाझे यांचा सीडीआर सभागृहात वाचून दाखवला होता. याच मुद्द्यावरुन अन्वय नाईक कुटुंबीयांनी सवाल उपस्थित केले.
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना आमचे बिलकूल ऐकून घेतले नाही, आम्हाला दाद दिली नाही, असा थेट आरोप अन्वय नाईक यांच्या पत्नीने केला. फक्त श्रीमंतानाच न्याय मिळणार का? असा सवाल अन्वय नाईक यांच्या पत्नीने उपस्थित केला.