प्रेम शुक्ल / व्हाअभिव्यक्त!
राम मनोहर लोहिया यांचं नाव घेतलं की देशाला आठवतात ते त्यांचे भेदभावरहित समाज रचनेचे विचार. लोहियाजींनी जात, वर्ण, पंथ, लिंग, वर्ग अशा कोणत्याही भेदापासून मुक्त अशा समाजाचा विचार केला होता. अशा भेदांमुळे होणारं सामाजिक शोषण थांबावं, कोणत्याही शोषणापासून मुक्त असलेल्या भारतासाठी नेहमीच त्यांनी प्रयत्न केले. अखेर काही दशकांनंतर त्यांचं ध्येय देशाच्या सर्वोच्च स्तरावरून साकार करण्याच्या प्रयत्न सुरु झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नव्यानं साकारलेलं मंत्रिमंडळ हे लोहियांजींच्या स्वप्नातील शोषणरहित समाजरचनेचं आधुनिक भारतातील प्रतिक आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ज्या मंत्रिमंडळाचं नेतृत्व करत आहेत, ते मंत्रिमंडळ युवा, सुशिक्षित आणि अनुभवी यांचा कौशल्यानं साधलेला एक आदर्श संगम आहे. या मंत्रिमंडळात अनुभवाचा आणि उत्साहाचा एक अनोखा संगम आहे, जो भारतीय लोकशाही कारभाराच्या परंपरेत यश आणि प्रगतीचा एक नवीन अध्याय लिहिणार आहे. नव्हे, दैदिप्यमान भारताच्या निर्मितीच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल ठरणार आहे.
नव्याने अस्तित्वात आलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या रचनेतून उक्ती आणि कृतीमध्ये जमीन अस्मानाचा फरक असणाऱ्या दिखाऊ नेतृत्वाचा काळ संपला असल्याचंही दिसून येतंय. हा “काळ बोले तैसा चाले” संत शिकवणुकीनुसार समतेचा झेंडा उंचावत जशी उक्ती तशीच कृती करणाऱ्या नव्या भारताच्या नव्या नेतृत्वाचा आहे. सामाजिक न्याय आणि समानता हे पंतप्रधान मोदींसाठी केवळ भाषणातील टाळेखाऊ कोरडे शब्द नाहीत, तर उक्तीनुसार कृतीत आणायची तत्व आहेत. देशाचं हे असं मंत्रिमंडळ आहे ज्यात अनुसुचित जातीतील १२, अनुसूचित जमातीतील ८, ओबीसी समाज घटकांमधील २७ आणि ११ महिला आहेत. समाजातील कमकुवत आणि शोषित घटकांसह भारतीय समाजातील प्रत्येक घटकाच्या योग्य प्रतिनिधित्वाचं चित्र या मंत्रिमंडळात साकारल्याचा हा पुरावा आहे. समाजाच्या प्रत्येक स्तराला देशाचं मंत्रिमंडळ आपलं वाटावं असा प्रत्येकासाठी आपलं असं कुणीतरी या मंत्रिमंडळ आहे. नव्हे हे मंत्रिमंडळ आपलंच आहे, असंच प्रत्येक भारतीयाला वाटावं असंच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील अवघ्या भारताचं आपलं मंत्रिमंडळ आहे.
भारतीय समाजातील सर्व घटकांच्या योग्य प्रतिनिधित्वासह सामूहिक कारभार हे मोदी सरकारचे वैशिष्ट्य आहे. आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करताना पंतप्रधानांनी सर्वांची गुणवत्ता उपयोगात आणण्याची काळजी घेतली. देशातील सर्व भौगेलिक विभाग आणि आपल्या समाजातील सर्व घटकांना त्यांचे योग्य प्रतिनिधित्व मिळावे, यवर जातीनं लक्ष दिले. आकार कसाही असो, पण सर्व राज्यांना मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळालं आहे. संपूर्ण देशाच्या गरजा लक्षात घेऊन धोरणे व कार्यक्रम तयार केले जावेत. भारताचा विकास सर्वांना साथ देत, देशाच्या कानाकोपऱ्यात समग्र विकासाची फळे पोहचवत व्हावा, याची दक्षता घेण्याचा हा पंतप्रधानांचा मार्ग आहे. यामुळे आपली लोकशाही अधिक परिपक्व होईल. कारण शेवटी लोकशाही ही लोकांची म्हणजे फक्त सत्तेतील विशिष्ट लोकांची नाही, तर देशातील सर्वच लोकांची असली पाहिजे. पंतप्रधानांनी मंत्रिमंडळाच्या नव्या रचनेतून लोकशाही ही खऱ्या अर्थानं सर्व लोकांची आपली असल्याचं दाखवून दिलं आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ठाम मत होते, “सत्ता आणि राज्य कारभारामध्ये दलित, मागास व शोषित वर्गांना योग्य आणि न्याय्य प्रतिनिधित्व दिल्याशिवाय त्यांची वाढ आणि विकास अशक्य आहे”. आतापर्यंतच्या सत्ताधाऱ्यांनी योग्य प्रतिनिधित्वाची खोटी आश्वासने दिली आहेत. मोदी सरकारचं ते सरकार आहे, ज्याच्या मंत्रिमंडळात प्रत्यक्षात अशा घटकांचा समावेश करून उक्तीला प्रत्यक्षात कृतीत आणण्यात आलंय. अनुसूचित जाती आणि जमातींमधील २० मंत्री असणं, खऱ्या अर्थानं न्याय्य आणि योग्य प्रतिनिधित्व देण्याचे प्रामाणिक प्रयत्न दाखवून देत आहेत.
मंडल आयोगाच्या अहवालाची अंमलबजावणी करून माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंह यांनी बहुजन व मागासवर्गीयांसाठी सामाजिक आणि राजकीय उद्धाराचा एक अरुंद रस्ता बनविला. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सध्याचे सरकार हे दलित आणि शोषित वर्गासाठी अमर्यादित संधींचा वेगवान एक्स्प्रेस वे बनविणारे सरकार आहे.
महिलांच्या हक्कांविषयी आणि कारभारात त्यांना समान प्रतिनिधित्वाच्या आवश्यकतेविषयी बोलणे ही एक बाब झाली, परंतु त्यांना त्यांचे हक्क देणे ही आणखी एक वेगळीच बाब आहे. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या मंत्रिमंडळात ११ महिलांचा समावेश केला आहे, ज्यातून त्यांच्या सरकारची महिलांच्या हक्कांविषयी असलेली खरी तळमळ कळते.
मंत्रिमंडळ विस्ताराचं खरं आणि महत्त्वाचे लक्ष्य म्हणजे भारताचे संपूर्ण प्रतिनिधित्व सुनिश्चित करणे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारसाठी प्रत्येक राज्य महत्त्वपूर्ण आहे. प्रत्येक राज्याला विशेष महत्त्व आहे. देशाचा सर्वांगीण विकास हे सरकारचे प्राथमिक लक्ष्य आहे. म्हणून जेव्हा पंतप्रधान मोदींनी काळजीपूर्वक आपली कॅबिनेट निवडली, तेव्हा हा संदेश मोठा आणि स्पष्ट होता – राजकारण आणि कारभार हे दोन स्वतंत्र घटक आहेत. त्यांची सरमिसळ नसावी. प्रत्यक्ष कृतीतून त्यांनी ते दाखवून दिले आहे.
लोहिया म्हणायचे की सक्षम व्यक्तींना संधी दिली जावी, परंतु आपण त्यांना सक्षम व सक्षम बनविण्याच्या संधी देखील निर्माण केल्या पाहिजेत, हेही महत्वाचं आहे. त्यासाठी शोषित, दुर्लक्षित आणि उपेक्षितअशा समाज घटकांचा आत्मविश्वासही वाढविला पाहिजे. मंत्रिमंडळ विस्तारात घेतलेल्या काळजीमुळे पहिल्यांदाच अनेक समाज घटकांना केंद्र सरकारमध्ये प्रतिनिधित्व मिळालं आहे. पूर्वीच्या कोणत्याही केंद्रीय मंत्रिमंडळात आतापर्यंत दलित समाज आणि अनुसूचित जमातीचे एवढ्या चांगल्या संख्येनं मंत्री नव्हते. या विस्तारानंतर केंद्रीय मंत्रिमंडळात आठ वेगवेगळ्या राज्यांतील अनुसुचित जातींमधील १२ मंत्री आहेत. त्याचप्रमाणे अनुसूचित जमातींचे प्रतिनिधित्व करणार्या मंत्र्यांची संख्या ८ आहे. आजवर त्या जमातींना लाभलेलं हे सर्वात जास्त प्रतिनिधित्व आहे.
सरकार चालविण्यासाठी मोदी मंत्रिमंडळात सर्वोत्तम आणि पात्र मंत्री आहेत. या मंत्र्यांमध्ये सात पीएचडी, तीन एमबीए, तेरा वकील, सहा डॉक्टर, पाच अभियंता, सात माजी नोकरशहा आणि ६८ पदवीधर आहेत. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर नवीन ‘टीम मोदी’मध्ये ८८ टक्के मंत्री हे पदवीधर आहेत. आतापर्यंतचं हे सर्वात जास्त गुणवंत पात्रताधारक मंत्रिमंडळ आहे.
मंत्रिमंडळ विस्ताराच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींनी एक स्पष्ट संदेश दिला आहे. पूर्व ते पश्चिम आणि उत्तर ते दक्षिण भारताचा कारभार हा सामुदायिक प्रयत्न आणि प्रत्येकाच्या सहभागातून होणार आहे. आणि याच कारणास्तव, आज आपण केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रत्येक राज्य, प्रत्येक समाज, प्रत्येक जातीचे प्रतिनिधित्व पाहत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हे सरकार खऱ्या अर्थाने मजबूत, अखंड भारताचे प्रतिनिधित्व करते, यावर आता दुमतच असू शकत नाही. मला तर वाटतं, कदाचित नव्या संशयास्पद वाटणाऱ्या आरोपांचा गदारोळ माजवत, जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्यामागेही तेच खरं कारण असावं!
(प्रेम शुक्ल हे भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत. आपल्या आक्रमक पण अभ्यासू आणि तर्कशुद्ध मांडणीसाठी ते ओळखले जातात. हिंदीसह इंग्रजी आणि मराठीवरही त्यांचे चांगले प्रभूत्व आहे. पत्रकारितेत तीन दशके कार्यरत राहिल्यानंतर सध्या ते राजकारणात कार्यरत आहेत.)
ट्विटर @PremShuklaBJP फेसबूक BJP.PremShukla
पेगॅसस हेरगिरी: अमित शाह यांच्या ‘क्रोनोलॉजी’ आरोपामागील रणनीती समजून घ्या!