मुक्तपीठ टीम
तपास यंत्रणा स्वायत्त असून त्यांच्या पद्धतीने त्या काम करत असतात. कोणत्याही गोष्टीमध्ये तथ्य असल्याशिवाय कारवाई होत नाही. आपण काही केले नसेल तर ईडी असो किंवा सीबीआय, कारवाईला घाबरण्याचे कारण नाही, असे मत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी व्यक्त केले.
प्रविण दरेकर जन आशीर्वाद यात्रेनिमित्त रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी प्रसारमाध्यमांसोबत संवाद साधताना दरेकर पुढे म्हणाले, साखर कारखान्याच्या चौकशीकरता ईडी लागली तर त्यात गैर काहीही नाही. कोणतेही पुरावे असल्याशिवाय चौकशी लागत नाही. जो साखर कारखाना सरकारी तत्त्वावर चालत नसतो तोच कारखाना चार-पाचशे कोटीत विकत घ्यायचा आणि त्याचे रूपांतर खासगी कारखान्यात केल्यास त्याला आवक निर्माण होते. खासगीकरण झाल्यानंतर त्यावर कर्ज घ्यायचे असे काम होत असते. अशा प्रकारचे व्यवहार साखर कारखान्यात होत असेल तर ईडीची चौकशी होते. कारण संशय निर्माण होतो. एवढ्या पैशाचे व्यवहार होतात कुठून? याकरता चौकशी लागते. जर आपण काही गैर केले नसेल तर घाबरण्याचे काही कारण नाही, असा टोलाही दरेकर यांनी लागवला.