मुक्तपीठ टीम
हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं आज भूमिपूजन होणार आहे. या भूमिपूजनाचं अनेक दिग्गज नेत्यांना निमंत्रण देण्यात आलेलं नाही. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना या स्मारकासाठी प्रचंड मेहनत घेतली होती, आवश्यक परवानग्या मिळवून दिल्या होत्या. परंतु त्यांना सुद्धा बोलावण्यात आलेले नाही, यापेक्षा आणखी काही दुर्दैवी असू शकत नाही, हा विचारांचा कद्रुपणा झाला, भूमिपूजन सोहळ्याला विरोधकांना न बोलावल्याने राज्यसरकारला विरोधी पक्षनेत्यांना किंमत द्यायचीच नाही, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे.
दरेकर म्हणाले की, विरोधकांना भूमिपूजन सोहळ्याला बोलवायला हवं होतं. बाळासाहेबांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी सर्व पक्षीय नेत्यांना बोलावण्यात आलं होतं. या प्रसंगीही सरकारने तसं करायला हवं होतं तसेच बाळासाहेब शिवसेना पक्षाचे प्रमुख जरी असले तरी राजकारणाच्या पलीकडे महाराष्ट्रातील जनतेनं त्यांच्याकडे पाहिलं आहे, त्यांचे विचार वेगळे असतील, मतभेद पक्षांमध्ये असू शकतात. बाळासाहेबांसारख्या लोकप्रिय नेतृत्व असलेल्या नेत्यांच्या स्मारकाच्या कार्यक्रमाला सर्वाना बोलवलं गेलं असत तर कार्यक्रमाची उंची वाढली असती. राज्यसरकार कोरोनाचं कारण पुढे करत असेल तर यापूर्वी ऑनलाईन भूमिपूजन कार्यक्रम अनेक झाले आहेत, वेगवेगळ्या कार्यक्रमांना राज्यसरकार परवानगी देत आहे. पण कार्यक्रमाला बोलवायची इच्छा नसेल तर कोरोना किंवा अशी अनेक कारणं राज्यसरकार देऊ शकते.
राजकारणात इतका कद्रुपणा नसावा. ज्याप्रमाणे प्रमोद महाजन यांनी शिवसेना भाजप संबंध वृद्धिंगत करण्यासाठी योगदान दिले होते तसेच फडणवीस यांनी बाळासाहेबांचा विश्वास संपादित केला होता, त्यांच्या स्मारकासाठी पुढाकार घेतला होता, हे स्मारक व्हावं म्हणून मोठं योगदान दिलं होतं, केंद्राच्या परवानग्या, राज्याच्या परवानग्या मिळवल्या होत्या, हा विषय मार्गी लागावा म्हणून अत्यंत सकारात्मक भूमिका घेतली होती. त्या माननीय देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण गेलं नसल्याचं समजत आहे, लोकांना हे आवडणार नाही, ते निश्चितपणे या कृतीचा निषेध करतील, असे दरेकर यांनी सांगितले.
बाळासाहेबांचा व्यगंचित्राचा वारसा पुढे नेणारे राज ठाकरे त्यांच्याच घरातले असून सुद्धा त्यांना कार्यक्रमाला बोलावले गेले नाही, नगर विकास मंत्री, ज्यांच्या खात्याकडून हे काम होणार आहे, त्या एकनाथ शिंदे यांना सुद्धा बोलावले गेले नाही. प्रश्न मान, अपमानाचा नाही प्रश्न कोत्या मनोवृत्तीचा आहे. बाळासाहेबांसमोर मान-अपमानाची गोष्ट फारच छोटी आहे, कारण त्यांच्या उंचीएव्हढे महाराष्ट्रात कुणी नाही. त्यांच्या विचारांमुळेच मी आज आहे, मला बोलावलं असत तर आनंद झालाच असता, परंतु वरातीमागून घोडे नाचवण्यात मजा नाही, अशी टीका दरेकर यांनी केली.