उदयराज वडामकर / कोल्हापूर
कोल्हापूरचे सुपुत्र प्रशांत शिवाजी जाधव यांच्यावर त्यांच्या मूळगावी बसर्गे गडहिंग्लज येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. लडाखमधील तुर्तकमध्ये भारतीय लष्करांची बस नदीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत वीरमरण आलेल्या कोल्हापूरचे सुपुत्र जवान प्रशांत शिवाजी जाधव यांच्यावर त्यांच्या मूळगावी बसर्गे या ठिकाणी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
अतिशय शोकाकुल वातावरणात वीर जवानाला अंतिम निरोप देण्यासाठी जमलेल्या समुदायाने पुष्पवृष्टी करत अमर रहे ,अमर रहे ,भारत माता की जय आधी गगनभेदी घोषणांनी परिसर दुमदुमला होता. वडील शिवाजी कन्या नियती यांनी पार्थिवाला भडाग्नी दिला. साश्रू नयनांनी त्यांनी लाडक्या वीर पुत्राला निरोप दिला.
लष्करी जवानांनी व पोलिस दलाने बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली.
कोल्हापूरचे प्रशांत जाधव व सातारचे सुभेदार विजय सर्जेराव शिंदे यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून प्रत्येकी एक कोटीची आर्थिक मदत देण्यात येणार आहे.