मुक्तपीठ टीम
भांडुप पश्चिम एलबीएस मार्ग येथील सनराईस हॉस्पिटलमध्ये गुरुवारी रात्री पावणेबारा वाजता लागलेल्या आगीमध्ये दहा जणांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. कोविडमुळे आधिच मृत्यू पावलेल्या रुग्णांचे मृतदेह आगीत पूर्णपणे खाक झाले. ही घटना अत्यंत दुर्दैवी तसेच गंभीर असून याला महापालिका प्रशासन जबाबदार आहे. याप्रकरणी अनधिकृत सनराईस हॉस्पिटलला परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आली.
पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी आणि एचडीआयएल या दिवाळखोरीत निघालेल्या कंपनीचे संचालक यांनी एचडीआयएल ड्रीम मॉलमध्ये बांधलेल्या त्यांच्याच मालकीच्या सनराईस रुग्णालयात हा प्रकार घडला. सदर रुग्णालयास नियमानुसार महापालिका परवानगी देत नव्हती. याआधी अग्निशामन दलाने ना हरकत प्रमाणपत्र दिले नव्हते. विकास नियंत्रण नियमावली प्रमाणे मॉलमध्ये वापरात बदल (change of user) करून रुग्णालय सुरू करता येत नाही अशावेळी हे रुग्णालय अनधिकृतच ठरते.
रुग्णालय सुरू करण्यासाठी आवश्यक कायदा नियम, अटी व शर्तीचे कुठलेही पालन न करता हे रुग्णालय उभारले होते. परंतु या रुग्णालयास परवानगी मिळत नसताना कोविड १९ चा प्रादुर्भाव वाढला आणि लॉकडाऊन झाले. या संधीचा फायदा घेत प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाण्यासाठी या खासगी रुग्णालयास विशेष बाब म्हणून कोविड रुग्णालय अशी परवानगी महापालिकेच्या एस विभागाने राजकीय दबावापोटी दिली. त्याची परिणीती आज दहा रुग्णांचे नाहक प्राण जाण्यात झाली. सनराईस रुग्णालयात आग लागल्यानंतर तिथे अग्निशमन यंत्रणा कार्यरत नव्हती. अग्निशमन दल तिथे पोहोचल्यानंतर त्यांना रुग्णालयापर्यंत जाण्यास बरेच अडथळे असल्यामुळे आग विझवण्यासाठी खूप उशीर झाला. सनराईस रुग्णालय हे खासगी रुग्णालय असल्याने रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा लाख रुपयांची देयके घेतली जात होती.
सनराईस रुग्णालयात बाबत स्थानिक भाजपा नगरसेविका साक्षी दळवी यांनी वारंवार तक्रार करूनही त्याकडे राजकीय दबावापोटी दुर्लक्ष करण्यात आले. सदर तक्रारीला लेखी उत्तर देताना वैद्यकीय अधिकारी आरोग्य एस विभाग यांनी सनराईस हॉस्पिटल यांना नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आले आहे. तसेच अग्निशामक अधिकारी यांनी ना हरकत प्रमाणपत्रही दिले असे कळविले आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे. तरी या अधिकाऱ्यांना त्वरित निलंबित करून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली.
चौकट या विषयाबाबत हरकतीचा मुद्दा उपस्थित करून सभा कोणतेही कामकाज न करता तहकूब करावी अशी मागणी नगरसेवक अभिजित सामंत यांनी सुधार समितीत आणि नगरसेवक अतुल शाह स्थापत्य (शहर) समितीत केली. पण १० जणांच्या प्राणापेक्षा समितीच्या कामकाजाला अधिक महत्व देत सुधार समिती तसेच स्थापत्य (शहर) समिती अध्यक्षांनी कामकाज पुढे रेटले. त्यावेळी असंवेदनशील सुधार आणि स्थापत्य (शहर) समिती अध्यक्षांचा निषेध करित भाजप नगरसेवकांनी सभात्याग केला.