मुक्तपीठ टीम
पूर्वी लोकप्रतिनिधीची निवडून येण्याची पात्रता ही त्याच्या भरीव विकास कामांवर ठरत होती, पण आज ते तुम्ही निवडणुकीत खर्च किती करू शकतात, यावर ठरतं, असं मत आदर्शगाव हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवारांनी व्यक्त केले आहे. निवडणूक ही गाव आणि राष्ट्र उभारणीसाठी असावी, असेही त्यांनी सांगितले.
इतरांच्या चुका दाखविण्यापेक्षा समन्वयाने काम करा
- सरपंच परिषद मुंबईच्या वतीने जळगावात आयोजित जिल्हा सरपंच मेळाव्यात ते बोलत होते.
- पोपटराव पवार यांनी या मनोगतातून आजच्या निवडणुकीत पैसा खर्च करुन विजयी होणार्यांना टोला लगावला असल्याचे बोलले जात आहे.
- पैसा ही विकासासाठी समस्या नाही, गावाचा विकास करण्यासाठी मानसिकता असणे ही मोठी समस्या, टीका टीपण्णी करण्यापेक्षा,इतरांच्या चुका दाखविण्यापेक्षा समन्वयाने काम करा, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत या तिघांनी एकत्र येवून काम केले तरच स्वावलंबी गाव आणि बलशाली भारताचे स्वप्न पूर्ण करु शकतो.
निवडणूक प्रक्रिया ही गाव आणि राष्ट्र उभारणीसाठी…
- अलीकडच्या काळात कामाला विरोध करुन सत्तेत जाण्याचा मार्ग राहिला आहे.
- निवडणूक प्रक्रिया ही गाव आणि राष्ट्र उभारणीसाठी असली पाहिजे.
- निवडणुकीची व्यवस्था खूप बदललीय, आपण निवडून आलेल्या प्रतिनिधीला विधानसभेत जाऊन भाषण करण्याची संधी देत नाही.
- लोकप्रतिनिधींना शनिवार आणि रविवारी मतदारसंघात यावं लागतं.
- अंत्यविधी, दशक्रिया विधी, लग्न, वाढदिवस, बारसं, सण आणि उत्सव या व्यक्तिगत कामासाठी लोक प्रतिनिधींना बोलवतो.
- आपण वैयक्तिक कामासाठी लोक प्रतिनिधींना बोलवतो मात्र सामुदायिक कामासाठी बोलावलं पाहिजे.
- हे चित्र येणाऱ्या काळात बदलेलं असं आपण आशावादी राहुया.
केवळ चेकवर स्वाक्षरी करायला मिळते, म्हणून सरपंच बनू नका
- जिंकला की हवेत उडायच नाही, आणि हरलाच तर नैराश्यामध्ये जायचे नाही.
- गावात महापुरूषांचे पुतळे नाहीत.
- महापुरूषांचे पुतळे उभारण्यापेक्षा त्यांचे विचार कृतीत आणावेत, पक्ष, पद बाजूला ठेवून संस्काराच्या गोष्टी शिकल्या पाहिजेत.
- केवळ चेकवर स्वाक्षरी करायला मिळते, म्हणून सरपंच बनू नका.
- काही उद्देश ध्येय डोक्यासमोर ठेवा.
- तर तुम्हीसुध्दा तुमचे गावाचा हिवरे बाजारप्रमाणे विकास घडवू शकता.
- गावाचे नेतृत्व हा सरपंच करत असतो.
- सरपंचाने सर्वांना सोबत घेवून शासनाच्या योजना लोहसहभागातून राबविल्या तर प्रत्येक गाव स्वावलंबी होईल.