मुक्तपीठ टीम
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी वर्ष १९४९ मध्ये २६ नोव्हेंबर रोजी देशाला संविधान अर्पण केलं. या संविधानानं देशातील प्रत्येकाला मान, सन्मान व समानतेचा हक्क दिला. त्यामुळे आज देशभरात संविधान दिन साजरा केला जाक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं, देशाच्या उभारणीतील संविधानाच्या वाट्याचं कृतज्ञतापूर्वक स्मरण केले जात आहे. राजकीय नेत्यांनी या निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
विविधतेचा देश
अखंड, एकसंध ठेवण्याची केवळ संविधानात ताकद – उपमुख्यमंत्री अजित पवार
“भारतीय संविधान जगातील सर्वोत्कृष्ट संविधान, भारतवासियांची ताकद, जगण्याचा मूलाधार आहे. संविधानानं देशातील प्रत्येक व्यक्तीला समान अधिकार दिला आहे. सन्मानानं जगण्याचं, इच्छेनुसार वागण्याचं, निर्भयतेने व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे. विकासाची समान संधी उपलब्ध केली आहे. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, भौगोलिक विविधता असलेला भारत अखंड, एकसंध ठेवण्याची ताकद संविधानात आहे. सर्व जाती, धर्म, पंथ, प्रांताच्या नागरिकांना एकजूट ठेवून त्यांच्या मनात एकता, समता, बंधूतेचा विचार रुजवणं संविधामुळेच शक्य झालं आहे. सर्वधर्मसमभाव, मानवतावाद संविधानाचा गाभा आहे. देशाची एकता, अखंडता, सार्वभौमत्व संविधानामुळेच अबाधित आहे. भारतीय संविधानाचं हे महत्व सर्वांपर्यंत पोहचवण्याचा, देशाच्या भावी पिढीला संविधान साक्षर करुन लोकशाही मूल्यांवरील विश्वास अधिक दृढ करण्याचा प्रयत्न आज संविधान दिनाच्या निमित्तानं करुया,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भारतील संविधान व लोकशाही व्यवस्थेचं महत्व अधोरेखित करुन समस्त देशवासियांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार संविधान दिनानिमित्त शुभेच्छा देतांना म्हणाले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी वर्ष १९४९ मध्ये आजच्याच दिवशी देशाला संविधान अर्पण केलं. या संविधानानं देशातील प्रत्येकाला मान, सन्मान व समानतेचा हक्क दिला. संविधानानं दिलेल्या स्वातंत्र्य, समता व बंधूतेच्या विचारांचा अवलंब करुन देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता अबाधित राखणं. देशाला एकजूट ठेवणारी सर्वधर्मसमभावाची भावना अधिक दृढ करणं हे आपलं नैतिक व राष्ट्रीय कर्तव्य आहे. भारतीय संविधान तसंच लोकशाही मूल्यांची जपणूक करीत त्यांचं महत्व भावी पिढीपर्यंत पोहचवण्याचा, देशाची लोकशाही अधिक मजबूत करण्याचा पुनर्निर्धार आज संविधान दिनाच्या निमित्तानं सर्वांनी करुया, असं आवाहन करीत उपमुख्यमंत्र्यांनी महामानव डॉ. बाबासाहेबांना विनम्र अभिवादन केले असून देशवासियांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्याआहेत.
@thxteacher @VarshaEGaikwad इयत्ता ३ री मध्ये शिकणारी मृणाल महामुरे हिने काढलेली रांगोळी..! @Muktpeeth pic.twitter.com/UKvxkkKGgd
— Niraj Mahamure (@MahamureNiraj) November 26, 2021
भारतीय संविधान जगाला आदर्श – सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे
भारतीय संविधान हे समस्त जगासमोर आदर्श असून देशाची एकता व अखंडता कायम अबाधित ठेवण्याची ताकत या संविधानात आहे. असे मत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला व्यक्त केले. दि. २६ नोव्हेंबर रोजी साजऱ्या होत असलेल्या संविधान दिनानिमित्त त्यांनी संविधानकर्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
संविधान दिन हा २६ नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो. २९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसूदा समिती स्थापन झाली. अनेक बैठका व चर्चासत्रांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने स्वीकारला. त्यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.
यानिमित्ताने भारताच्या संविधानाबाबत जनता १००% साक्षर व्हायला हवी, संविधान घराघरात पोचावे. नागरिकांना आपले हक्क व कर्तव्ये यांची पूर्णपणे जाणीव असावी. तसेच आपल्या संविधानाप्रति व लोकशाही मूल्यांच्या प्रति जागरूकता असावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचेही मंत्री श्री.मुंडे यांनी संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला दिलेल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.
सामाजिक न्याय विभागामार्फत नुकतेच अंध दिव्यांगांसाठी ब्रेल लिपितुन देखील संविधान निर्माण करण्यात आले आहे. त्यामुळे अंध दिव्यांग सुद्धा आता संविधान साक्षर होत आहेत, याचा आनंद असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.
आज संविधान दिनाच्या निमित्ताने जबाबदार नागरिक म्हणून आपसातील समता व बंधुभाव दृढ करत आपल्या संविधानाचे रक्षण व सन्मान करण्याचा संकल्प करूया, असे आवाहनही सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.