मुक्तपीठ टीम
सत्ता कुणाचीही असो, सामान्यांचा हक्क हडपत स्वत:चे खजिने भरणाऱ्या माफियांचे काम जोरात सुरु असते. अकोल्यात ६०० क्विंटल रेशन गहू जप्त झाल्यानंतर रेशन माफियांचे काळे धंदे उघड झाले आहेत. गरिबांसाठी असलेला रेशनचा गहू ट्रकमधून तेलंगणात विकण्यासाठी नेला जात असताना पोलिसांनी जप्त केला. चालकांना अटक केली. पण त्याने काहीच होणार नाही. ही जप्ती म्हणजे रेशन माफियांसाठी अस्वलाच्या अंगावरचा एक केस! अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मनावर घ्यावं आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांच्या आदेशाने पोलिसांना केवळ रेशनचा गहू नेणारेच नाही तर काळ्या बाजाराचे सूत्रधार रेशन माफियाही जेरबंद करावेत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
अकोल्यात काय घडलं?
- गरिबांसाठी शासनाच्या सार्वजनिक धान्य वितरण यंत्रणेमार्फत देण्यात येणाऱ्या गव्हापैकी तब्बल ६०० क्विंटल गहू जप्त करण्यात आला आहे.
- हा गहू अकोल्याच्या खामगाव येथून हैदराबाद येथे काळ्या बाजारात विक्रीसाठी नेण्यात येत होता.
- माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित कारवाई करुन तो गहू जप्त केला आहे.
- विशेष पथकाला खबऱ्या मार्फत मिळालेल्या खबरीवरून ही कारवाई झाली.
- खामगाव येथून शासकीय रेशनचा गहू काळ्याबाजारात विक्रीसाठी जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी जप्तीची कारवाई केली.
गहू नेणाऱ्या ट्रक चालकाविरोधात गुन्हा
- रेशनचा गहू नेणाऱ्या ट्रक चालकाविरोधात बाळापूर पोलीस ठाण्यात, भारतीय जीवनावश्यक अधिनियम च्या कलम 3,7 कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
- आता काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणाऱ्या या रॅकेटचा सूत्रधार कोण आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.
- राज्य सरकारने हे प्रकरण गंभीरतेने घेऊन मुख्य सूत्रधाराचा शोध घेणे आवश्यक आहे.
- मुख्य सूत्रधार पकडला गेला तर रेशन माफियांना चांगलाच दणका बसेल.