कोरोना महामारीच्या काळात अभिनेता सोनू सूदने नागरिकांना त्यांच्या घरी परत जाण्यासाठी मोठे मदतकार्य केले होते. त्यामुळे सगळीकडे त्याचा उदोउदो झाला. रिल लाइफमधील या नायकाला रिअल लाइफमधील महानायकासारखी प्रसिद्धी मिळाली. आता मात्र सोनू बातमीत झळकला आहे तो वाईट कारणामुळे. अभिनेता सोनू सूदने अनधिकृतरित्या रहिवाशी इमारतीत हॉटेल सुरू केल्याचा ठप
का मुंबई महानगरपालिकेने ठेवला आहे. सोनू सूद विरोधात जुहू पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
काही दिवसांपूर्वी महानगरपालिकेच्या अभियंत्यांनी सोनू सूदच्या निवासी इमारतीची पाहणी केली असता तेथे हॉटेल असल्याचे समोर आले. त्यानंतर महाराष्ट्र प्रदेश आणि नगररचना (एमआरटीपी) कायद्यांतर्गत या प्रकरणी कारवाई करावी असे बीएमसीने जुहू पोलिसांना कळवले आहे. तसेच बेकायदेशीर बदल केल्याप्रकरणी महानगरपालिकेने गुन्हा दाखल करण्यास सांगितले आहे.
महानगरपालिकेने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, “सोनू सूदने परवानगी न घेता जुहूमधील एबी नायर रोडवर असणाऱ्या शक्ती सागर या सहा मजली निवासी इमारतीचे रुपांतर हॉटेलमध्ये केलं आहे”. नोटीस देण्यात आल्यानंतरही सोनू सूदने बेकायदेशीर बांधकाम सुरु ठेवण्यात आल्याचा आरोप महानगरपालिकेकडून करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई महानगरपालिकेने पाठवलेल्या नोटीसविरोधात सोनू सूदने दिवाणी न्यायालयात धाव घेतली होती, पण त्याला याबाबत योग्य तो दिलासा मिळाला नव्हता. “कोर्टाने सोनू सूदला उच्च न्यायालयात जाण्यासाठी तीन आठवड्यांचा वेळ दिला होता. मात्र, आता तीन आठवडे उलटले असून सोनू सूदने अद्याप केलेले बदल दुरुस्त केलेले नाहीत. त्यामुळे एमआरटीपी कायद्यांतर्गत तक्रार दाखल केली असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
या संबंधित सोनू सूदने दिलेल्या प्रतिक्रियेत म्हंटले आहे की, “बदल करण्यासाठी मी आधीच महानगरपालिकेकडून परवानगी घेतली आहे. हा विषय महाराष्ट्र किनारपट्टी विभाग व्यवस्थापन प्राधिकरणाच्या परवानगीचा आहे. करोनामुळे परवानगी मिळू शकली नाही. यामध्ये कोणताही गैरकारभार नाही. मी नेहमीच कायद्याचं पालन केलं आहे. कोरोना संकटात हे हॉटेल कोरोना योद्ध्यांसाठी वापरण्यात आले होते. त्यामुळे मी आता पालिकेच्या तक्रारीविरोधात उच्च न्यायालयात जाणार आहे”.