मुक्तपीठ टीम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज २८ मार्च २०२१ रोजी आकाशवाणीवरून “मन की बात” द्वारा केलेले संबोधन…जसं होतं तसं…
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार! यावेळी, जेव्हा मी, ‘मन की बात’ साठी आलेली पत्रे, टिप्पण्या/ सूचना तसेच मिळालेली वेगवेगळी माहिती ह्यावर नजर टाकत होतो तेव्हा बऱ्याच लोकांनी एका महत्वाच्या गोष्टीची आठवण केली.
‘मायगव्ह’ येथे आर्यन श्री, बंगलोर येथील अनुप राव, नोएडाचे देवेश, ठाणे येथील सुजित, हे सर्वजण म्हणाले,” मोदी जी, यावेळी ‘मन की बात’चा 75 वा भाग आहे. ह्याबद्दल आपले अभिनंदन”.
मी तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो, तुम्ही खूप बारकाईने लक्ष ठेवले आहे आणि ‘मन की बात’चे अनुसरण केले आहे. ‘मन की बात’ शी जोडलेले राहिला आहात. ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. माझ्या कडून आपल्याला तर धन्यवाद आहेतच, मी ‘मन की बात’ च्या सर्व श्रोत्यांचे आभार मानतो. कारण आपल्या साथी शिवाय हा प्रवास शक्य नव्हता. असं वाटतंय..जणू ही आत्ता आत्ता आत्ताची गोष्ट आहे, जेव्हा आपण सर्वांनी एकत्रितपणे हा वैचारिक प्रवास सुरू केला होता.
तेव्हा 3 ऑक्टोबर 2014 ला ‘विजयादशमी’ हा पवित्र सण होता आणि योगायोग पहा की आज, ‘होलिका दहन’ आहे. “ दिव्याने व्हावा दुसरा दिवा प्रज्वलित, आपले राष्ट्र व्हावे उज्वल, प्रकाशित.” ह्याच भावनेनें आपण हा मार्ग चालतो आहोत.
आपण देशाच्या कानाकोपऱ्यातील लोकांशी बोललो, त्यांच्या विलक्षण कामांबद्दल जाणून घेतले. आपल्यालाही अनुभव आला असेल की देशाच्या दूरदूरच्या कोपऱ्यातही किती अभूतपूर्व क्षमता दडलेली आहे! भारत मातेच्या कुशीत कशी कशी रत्ने घडत आहेत! हा समाजाकडे बघण्याचा, समाजाला जाणून घेण्याचा, समाजाचे सामर्थ्य ओळखण्याचा माझ्यासाठी देखील एक अद्भुत अनुभव होता.
ह्या 75 भागांमध्ये आपण किती-किती विषय घेतले? कधी नदीची गोष्ट तर कधी हिमालयाच्या शिखरांची गोष्ट, कधी बाब वाळवंटाची तर कधी नैसर्गिक आपत्तीची, कधी कधी मानवी सेवेच्या असंख्य कथांचा साक्षात्कार तर कधी तंत्रज्ञानाचा अविष्कार, कधी तरी अज्ञात कोपऱ्यातील एखाद्याच्या, काही नवे करून दाखवण्याच्या अनुभवाची गोष्ट.
आता तुम्हीच पाहा ना , ती स्वच्छतेची गोष्ट असेल, आपला वारसा जतन करण्याची चर्चा असेल, एवढेच नव्हे तर, खेळणी बनविण्याची गोष्ट असेल, काय काय नव्हते ह्यात? आपण ज्या विषयांना स्पर्श केला आहे, तेसुद्धा असंख्य आहेत.
या काळात आपण वेळोवेळी थोर व्यक्तींना श्रद्धांजली वाहिली, ज्यांनी भारत घडविण्यात अतुलनीय योगदान दिले आहे, त्यांच्याविषयी जाणून घेतले. आपण बर्याच जागतिक मुद्द्यांवर देखील बोललो आहोत, त्यांच्याकडून प्रेरणा घेण्याचा प्रयत्न केला आहे.
तुम्ही मला बर्याच गोष्टी सांगितल्या, अनेक कल्पना दिल्या. एक प्रकारे, ह्या विचार प्रवासात आपण सोबतीने चाललो, एकमेकांशी जोडले गेलो आणि नविनही काही जोडत राहिलो.
मी आज, या 75 व्या पर्वाच्या वेळी, सर्वप्रथम, प्रत्येक श्रोत्याचे ‘मन की बात’ यशस्वी करण्यासाठी, समृद्ध करण्यासाठी आणि ह्या कार्यक्रमाशी जोडलेले राहण्यासाठी अनेक अनेक आभार मानतो.
माझ्या प्रिय देशवासियांनो, किती सुखद योगायोग आहे ते पहा!
आज मला 75 व्या ‘मन की बात’ मध्ये बोलण्याची संधी आणि हा महिना, स्वातंत्र्याची 75- वर्षे, ‘अमृत महोत्सव’ सुरू होणारा महिना. अमृत महोत्सव दांडी यात्रेच्या दिवशी सुरु झाला आणि 15 ऑगस्ट 2023 पर्यंत चालेल. संपूर्ण देशभरात ‘अमृत महोत्सवा शी’ संबंधित कार्यक्रम सतत होत आहेत.
वेगवेगळ्या ठिकाणाहून या कार्यक्रमांची छायाचित्रे, माहिती लोक शेअर करत आहेत, पाठवत आहेत. ‘नमोॲप’वरही अशा च काही छायाचित्रांसमवेत, झारखंडच्या नवीन ह्यांनी मला एक निरोप पाठविला आहे.
त्यांनी लिहिले आहे की त्यांनी ‘अमृत महोत्सवा ‘ चे कार्यक्रम पाहिले आणि ठरवले की स्वातंत्र्यलढ्याशी संबंधित असलेल्या किमान दहा ठिकाणांना भेट द्यायची. त्यांच्या यादीतील पहिले नाव भगवान बिरसा मुंडांच्या जन्मस्थळाचे आहे. नवीन यांनी लिहिले आहे की झारखंडमधील आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांच्या कथा ते देशाच्या इतर भागात घेऊन जातील. नवीन दादा, तुमच्या ह्या विचारसरणीबद्दल मी तुमचे अभिनंदन करतो.
मित्रांनो, एखाद्या स्वातंत्र्यसैनिकाच्या संघर्षाची गाथा म्हणा
एखाद्या जागेचा इतिहास म्हणा, देशाची एखादी सांस्कृतिक कथा म्हणा , ‘अमृत महोत्सवाच्या’ दरम्यान आपण ते देशासमोर, देशवासियांच्या समोर आणू शकता. ह्या गोष्टींचा देशवासीयांशी संपर्क होण्याचे साधन बनू शकता. तुम्हाला दिसेल की बघता बघता ‘अमृत महोत्सव’ अशा बऱ्याच प्रेरणादायक अमृत बिंदूंनी भरून जाईल. आणि मग अशी अमृत धारा वाहू लागेल जी आपल्याला भारताच्या स्वातंत्र्याला शंभर वर्षे झाली तरी प्रेरणा देत राहील. देशाला एका नवीन उंचीवर नेईल, काही न काही करण्याचा उत्साह निर्माण करेल.
स्वातंत्र्याच्या लढाईत आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी अतोनात कष्ट सहन केले. कारण देशासाठी त्याग करणे, बलिदान देणे हे आपले कर्तव्य आहे असे ते मानत असत.त्यांच्या त्याग आणि बलिदानाच्या अमर कहाण्या आपल्याला आता सदैव कर्तव्याच्या मार्गाने जाण्यासाठी प्रेरित करत राहोत आणि जसे भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये म्हटले आहे,
“नियतं कुरु कर्म त्वं कर्म ज्यायो ह्यकर्मण: “
त्याप्रमाणे, त्याच भावनेने, आपण सर्वजण आपल्या नियत कर्तव्यांचे पूर्ण निष्ठेने पालन करू या. आणि स्वातंत्र्याच्या ‘अमृत महोत्सवाचा’ अर्थ हाच आहे की आपण काहीतरी नवीन संकल्प करूया. तो संकल्प पूर्ण करण्यासाठी संपूर्ण शक्तीनिशी प्रयत्न करू या. संकल्प असा असावा, जो समाजाच्या हिताचा असेल देशाच्या भल्याचा असेल आणि भारताच्या उज्वल भविष्यासाठी असेल. संकल्प असा असावा, ज्यामध्ये माझी स्वतःची काही जबाबदारी असेल, माझे कर्तव्य त्याच्याशी जोडलेले असेल. माझा विश्वास आहे की गीता प्रत्यक्षात जगण्याची ही सुवर्णसंधीच आपल्याला मिळाली आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, मागील वर्षी हाच मार्च महिना होता, जेव्हा देशाने ‘जनता कर्फ्यू’ हा शब्द प्रथमच ऐकला होता. पण ह्या महान देशाच्या महान प्रजेच्या, महान सामर्थ्याचा अनुभव पहा, ‘जनता कर्फ्यू’ संपूर्ण जगासाठी एक आश्चर्य बनला.. शिस्तीचे हे एक अभूतपूर्व उदाहरण होते, येणाऱ्या अनेक पिढ्या, या गोष्टीचा, नक्कीच अभिमान बाळगतील.
त्याच प्रमाणे, आमच्या कोरोना योद्धांच्याविषयी सन्मान, आदर, थाळ्या वाजवणे, टाळ्या वाजवणे, दिवा लावणे…
आपल्याला कल्पना नाही, हे सगळे कोरोना योद्ध्यांच्या हृदयाला किती स्पर्शून गेले आणि तेच कारण आहे की पूर्ण वर्षभर ते, न थकता, न थांबता, चिकाटीने काम करत राहिले. देशातील प्रत्येक नागरिकाचा जीव वाचवण्यासाठी, पूर्ण शक्तीनिशी लढत राहिले.
गेल्या वर्षी यावेळी, प्रश्न होता की कोरोनाची लस कधी येणार? मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी ही अभिमानाची बाब आहे की आज भारतात, जगातील सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम चालविला जात आहे. लसीकरण कार्यक्रमाच्या छायाचित्रांबद्दल भुवनेश्वरच्या पुष्पा शुक्ला यांनी मला लिहिले आहे. त्या म्हणतात की घरातील वडील माणसे लसीबद्दल जो उत्साह दाखवत आहेत, त्याविषयी मी ‘मन की बात’ मध्ये बोलावे.
मित्रांनो, बरोबरच आहे. देशाच्या कानाकोपऱ्या तून आपण अशा बातम्या ऐकत आहोत, छायाचित्रे पाहत आहोत, जी आपल्या अंतःकरणाला स्पर्श करत आहेत.
उत्तर प्रदेशच्या जौनपुरमधील 109 वर्षांच्या वयोवृद्ध माता राम दुलैया ह्यांनी लस घेतली आहे. त्याचप्रमाणे, दिल्लीमध्ये देखील, 107 वर्षे वयाच्या, केवल कृष्णजी ह्यांनी पण लसीचा एक डोस घेतला आहे. हैदराबाद मध्ये 100 वर्षांच्या जय चौधरीजी ह्यांनी लस घेतली आणि इतर सर्वांनाही लस अवश्य घेण्याचे आवाहन केले.
मी ट्विटर-फेसबुकवर पाहत आहे की कसे लोक त्यांच्या घराच्या वडीलधाऱ्यांचे, लस घेतल्यानंतरचे फोटो अपलोड करीत आहेत. केरळमधील एक तरुण, आनंदन नायर ह्यांनी तर त्याला एक नवीन नाव दिले आहे – ‘लस सेवा’.
असेच संदेश दिल्लीहून शिवानी, हिमाचल येथील हिमांशू आणि इतर अनेक तरुणांनीही पाठविले आहेत. मी तुम्हा सर्व श्रोत्यांच्या विचारांचे कौतुक करतो.
ह्या सगळ्या दरम्यान, कोरोनाशी लढा देण्याचा मंत्र पण नक्की लक्षात ठेवा. ‘दवाई भी – कडाई भी’ ! आणि आपल्याला फक्त बोलायचेच आहे असे नाही! आपल्याला ते प्रत्यक्ष आचरणात आणायचे आहे, बोलायचे आहे, सांगायचे आहे आणि लोकांनाही ‘दवाई भी कडाई भी’ असे वागण्यासाठी वचनबद्ध करायचे आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, मला आज, इंदूरच्या रहिवासी असलेल्या सौम्या ह्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. त्यांनी एका विषयाकडे माझे लक्ष वेधले आणि ‘मन की बात’ मध्ये याचा उल्लेख करावा असे सांगितले. हा विषय आहे – भारताच्या क्रिकेटर मिताली राज जी ह्यांचा नवीन विक्रम. मिताली जी, नुकत्याच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दहा हजार धावा करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला क्रिकेटपटू बनल्या आहेत.. त्यांचे ह्या यशाबद्दल खूप खूप अभिनंदन. एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांत सातहजार धावा काढणाऱ्या अशा त्या एकमेव आंतरराष्ट्रीय महिला खेळाडू आहेत.
महिला क्रिकेट क्षेत्रात त्यांचे योगदान खूप प्रभावी आहे. दोन दशकांहूनही जास्त अशा आपल्या कारकीर्दीत मिताली राज ह्यांनी हजारो, लाखो लोकांना प्रेरणा दिली आहे. त्यांचे कठोर परिश्रम आणि यशोगाथा, फक्त महिला क्रिकेटपटूंसाठीच प्रेरणा नव्हे, तर पुरुष क्रिकेटपटूंसाठीही प्रेरणा आहे.
मित्रांनो, हे चित्तवेधक आहे, ह्या मार्च महिन्यात,जेव्हा आम्ही महिला दिवस साजरा करत होतो तेव्हाच अनेक महिला खेळाडूंनी पदके मिळवली आहेत, विक्रम प्रस्थापित केले आहेत.
दिल्लीत आयोजित नेमबाजीच्या ‘आयएसएसएफ विश्वचषकात’ भारताने अव्वल स्थान मिळविले. सुवर्ण पदकांच्या संख्येच्या बाबतीतही भारत जिंकला. हे भारतातील महिला व पुरुष नेमबाजांच्या उत्तम कामगिरीमुळेच शक्य झाले.
ह्या दरम्यान, ‘बीडब्ल्यूएफ स्विस ओपन सुपर 300 स्पर्धेत’ पी.व्ही. सिंधू जी ह्यांनी रौप्यपदक जिंकले. आज शिक्षणापासून उद्योजकतेपर्यंत, सशस्त्र सैन्यापासून विज्ञान आणि तंत्रज्ञानापर्यंत, सर्वत्र..देशातील मुली स्वत: ची वेगळी ओळख निर्माण करीत आहेत. मला विशेष आनंद ह्यामुळे आहे की मुली, खेळात स्वत: साठी एक नवीन स्थान बनवत आहेत.
खेळ ही एक व्यावसायिक निवड म्हणून उदयास येत आहेत.
माझ्या प्रिय देशवासियांनो, काही काळापूर्वी झालेले मेरीटाईम इंडिया समिट तुम्हाला आठवते का? या शिखर परिषदेत मी काय बोललो हे तुम्हाला आठवते का? साहजिकच आहे, बरेच कार्यक्रम होत असतात, बर्याच गोष्टी घडत राहतात, प्रत्येक गोष्ट कुठे आपल्याला आठवते आणि तितके लक्ष तरी कुठे दिले जाते, – स्वाभाविक आहे.
पण मला हे आवडले की माझ्या एका विनंतीवर गुरु प्रसाद जी यांनी मनःपूर्वक अंमल केला. ह्या शिखर परिषदेत मी देशातील दीपगृह संकुलांच्या आसपास पर्यटन सुविधा विकसित करण्याविषयी बोललो होतो.
गुरु प्रसाद जी ह्यांनी तामिळनाडूमधील दोन दीपगृहांना, चेन्नई दीप गृह आणि महाबलीपुरम दीप गृह ह्यांना 2019 मध्ये भेट दिली होती, त्या प्रवासाचे अनुभव सांगितले आहेत. ज्या ऐकून मन की बात च्या श्रोत्यांनाही खूप आश्चर्य वाटेल अशा अतिशय मनोरंजक गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत.
चेन्नई दीपगृह हे जगातील, लिफ्ट असलेल्या काही मोजक्या दीपगृहांपैकी एक आहे. इतकेच नाही तर हे भारतातील एकमेव दीपगृह आहे जे शहरी भागात आहे. इथे विद्युत ऊर्जेसाठी सौर पॅनेल्स पण लावलेली आहेत. गुरु प्रसाद जी ह्यांनी दीपगृहाजवळ असलेल्या, सागरी सुचालनाचा इतिहास सांगणाऱ्या व वारसा जपणाऱ्या एका संग्रहालयाविषयी देखील सांगितले आहे. संग्रहालयात, तेलावर जळणारे मोठेमोठे दिवे, रॉकेलचे दिवे, पेट्रोलियमच्या गॅसबत्त्या व जुन्या काळी वापरले जाणारे विद्युत दिवे प्रदर्शित केलेले आहेत..
भारतातील सर्वात जुन्या दीपगृहाबद्दल- महाबलीपुरम दीपगृहाबद्दल देखील गुरु प्रसाद जी यांनी सविस्तर माहिती दिली. त्यांचे म्हणणे आहे की ह्या दीपगृहाजवळ शेकडो वर्षांपूर्वी, ‘पल्लव राजा महेंद्र वर्मन प्रथम’ यांनी बांधलेले ‘उलकनेश्वर’ मंदिर आहे.
मित्रांनो, ‘मन की बात’ दरम्यान, मी पर्यटनाच्या विविध पैलूंविषयी बर्याच वेळा बोललो आहे, परंतु ही दीपगृहे पर्यटनाच्या दृष्टीने अद्वितीय आहेत. त्याच्या भव्य रचनांमुळे दीपगृहे नेहमीच लोकांसाठी आकर्षण केंद्र असतात. पर्यटनाला चालना देण्यासाठी भारतातील एक्काहत्तर दीपगृहे चिन्हांकित केली गेली आहेत. या सर्व दीपगृहांमध्ये त्यांच्या क्षमतेनुसार वस्तूसंग्रहालय, अॅम्फी-थिएटर, खुला रंगमंच, उपाहार गृह, मुलांसाठी बाग , पर्यावरणस्नेही पर्णकुटी आणि landscaping केले जाईल.
तसेच, दीपगृहाबद्दलच चर्चा चालू आहे तर मी एका अद्वितीय दीपगृहाबद्दल तुम्हाला सांगू इच्छितो. हे दीपगृह गुजरातच्या सुरेंद्र नगर जिल्ह्यात जिन्झुवाडा नावाच्या ठिकाणी आहे.
आपणास माहित आहे का की हे दीपगृह विशेष का आहे? हे विशेष आहे कारण जिथे हे दीपगृह आहे, तेथून समुद्री किनारा सध्या शंभर किलोमीटरहून अधिक अंतरावर आहे. या गावात तुम्हाला असे दगडही सापडतील, जे सांगतील की, इथे, कधीकाळी , एक गजबजलेले बंदर असावे.
म्हणजे याचा अर्थ असा आहे की यापूर्वी किनारपट्टी जिन्झुवाड़ा पर्यंत होती. समुद्राची पातळी घटणे , वाढणे , मागे जाणे , एवढे दूर जाणे हे देखील त्याचे एक स्वरुप आहे. याच महिन्यात जपानमध्ये आलेल्या महाभयंकर सुनामीला 10 वर्ष पूर्ण होत आहेत. या सुनामीत हजारो लोकांचा मृत्यू झाला होता. अशीच एक सुनामी भारतात 2004 मध्ये आली होती. सुनामी दरम्यान आपण आपल्या लाईटहाऊसमध्ये काम करणारे आपले 14 कर्मचारी गमावले होते. अंदमान निकोबार मध्ये आणि तामिळनाडूत लाईटहाऊसवर ते आपले कर्तव्य बजावत होते. कठोर परिश्रम करणाऱ्या आपल्या या लाईट कीपर्सना मी आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो आणि लाईट कीपर्सच्या कामाची भरपूर प्रशंसा करतो.
प्रिय देशवासियांनो, जीवनातील प्रत्येक क्षेत्रात, नावीन्य, आधुनिकता, अनिवार्य असते नाहीतर, तोचतोचपणा कधी-कधी आपल्यासाठी ओझे बनते. भारताच्या कृषी जगात आधुनिकता, ही काळाची गरज आहे. खूप उशीर झाला आहे. आपण खूप वेळ दवडला आहे. कृषी क्षेत्रात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्यासाठी, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी, पारंपरिक शेतीबरोबरच नवीन पर्याय, नवनवीन संशोधने स्वीकारणे देखील तितकेच आवश्यक आहे. श्वेत क्रांती दरम्यान देशाने याचा अनुभव घेतला आहे. आता मधमाशी पालन देखील असाच एक पर्याय बनून समोर आला आहे. मधमाशी पालन देशात मध क्रांति किंवा मधुर क्रांतीचा पाया रचत आहे. शेतकरी मोठ्या संख्येने यात सहभागी होत आहेत, नवसंशोधन करत आहेत. उदा. पश्चिम बंगालच्या दार्जिलिंगमध्ये एक गाव आहे गुरदुम . उंच पर्वत, भौगोलिक अडचणी, मात्र इथल्या लोकांनी मधमाशी पालनाचे काम सुरु केले आणि आज, या ठिकाणी तयार होणाऱ्या मधाला चांगली मागणी आहे.यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न देखील वाढत आहे. पश्चिम बंगालच्या सुंदरबन परिसरातील नैसर्गिक सेंद्रिय मध देश विदेशात प्रसिद्ध आहे. असाच एक वैयक्तिक अनुभव माझा गुजरातमधील आहे. गुजरातच्या बनासकांठा इथं 2016 मध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमात मी लोकांना सांगितले की इथे इतक्या क्षमता आहेत, तर बनासकांठा आणि आपल्याकडचे शेतकरी यांनी मधुर क्रांतीचा नवीन अध्याय लिहिला तर ? तुम्हाला हे ऐकून आनंद होईल , एवढ्या कमी वेळेत बनासकांठा, मध उत्पादनाचे प्रमुख केंद्र बनले आहे. आज बनासकांठाचे शेतकरी मध निर्मितीतून वर्षाला लाखो रुपये कमवत आहेत. असेच एक उदाहरण हरियाणाच्या यमुना नगरचे देखील आहे.
यमुना नगरमध्ये शेतकरी मधमाशी पालन करून वर्षाला शंभर टन मध तयार करत आहेत, आपले उत्पन्न वाढवत आहेत. शेतकऱ्यांच्या या मेहनतीचा परिणाम आहे की देशात मधाचे उत्पादन सातत्याने वाढत आहे. आणि वर्षाला अंदाजे सव्वा लाख टनावर पोहचले आहे. यापैकी मोठ्या प्रमाणात मध परदेशात निर्यात देखील केला जात आहे.
मित्रानो, मधमाशी पालनात केवळ मधातूनच कमाई होत नाही, तर मधाच्या पोळ्यातले मेण हे देखील उत्पन्नाचे एक खूप मोठे माध्यम आहे. औषध निर्मिती उद्योग, खाद्यपदार्थ उद्योग , वस्त्रोद्योग आणि कॉस्मेटिक उद्योग , प्रत्येक ठिकाणी या मेणाला मागणी आहे. आपला देश सध्या या मेणाची आयात करतो , मात्र आपले शेतकरी आता वेगाने ही परिस्थिती बदलत आहेत. म्हणजेच एक प्रकारे आत्मनिर्भर भारत अभियानात मदत करत आहेत. आज तर संपूर्ण जग आयुर्वेद आणि नैसर्गिक आरोग्य उत्पादनांकडे वळत आहेत. या पार्श्वभूमीवर मधाची मागणी आणखी वेगाने वाढत आहे. माझी इच्छा आहे की देशातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या शेतीबरोबरच मधमाशी पालन देखील करावे. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न देखील वाढेल आणि त्यांचे जीवन देखील सुमधुर होईल.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, आता काही दिवसांपूर्वी, जागतिक चिमणी दिन साजरा करण्यात आला. स्पॅरो म्हणजे चिमणी. काही याला चकली म्हणतात, काही चिमणी म्हणतात , काही घान चिरिका म्हणतात. पूर्वी आपल्या घरांच्या भिंतींवर , आजूबाजूच्या झाडांवर चिमण्यांचा चिवचिवाट सुरु असायचा. मात्र आता लोक चिमण्यांची आठवण काढताना म्हणतात कि शेवटचे कितीतरी वर्षांपूर्वी चिमण्यांना पाहिले होते. आज त्यांना वाचवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागत आहेत. माझ्या बनारसचे एक मित्र इंद्रपाल सिंह बत्रा यांनी असे काम केले आहे जे मी ‘मन की बात’ च्या श्रोत्यांना जरूर सांगू इच्छितो. बत्रा यांनी आपल्या घरालाच चिमण्यांचे घर बनवले आहे. त्यांनी आपल्या घरात लाकडाची अशी घरटी बनवली आहेत, ज्यात चिमण्या आरामात राहू शकतील. आज बनारसमधली अनेक घरे या अभियानाशी जोडली गेली आहेत. यामुळे घरांमध्ये एक अद्भुत नैसर्गिक वातावरण देखील निर्माण झाले आहे. मला वाटते निसर्ग, पर्यावरण, प्राणी, पक्षी ज्यांच्यासाठी म्हणून शक्य आहे , कमी-अधिक प्रयत्न आपण देखील करायला हवेत. असेच एक मित्र आहेत बिजय कुमार काबी. बिजय हे ओदिशाच्या केंद्रपाड़ा इथले रहिवासी आहेत. केंद्रपाड़ा समुद्र किनारी आहे. म्हणूनच या जिल्ह्यातील अनेक गावे अशी आहेत ज्यांना समुद्राच्या उंच लाटा आणि चक्रीवादळाचा कायम धोका असतो. यामुळे अनेकदा मोठ्या प्रमाणात नुकसान देखील होते. बिजय यांना जाणवले की जर या नैसर्गिक आपत्तीला कुणी रोखू शकत असेल तर तो निसर्गच रोखू शकतो. मग काय , बिजय यांनी बड़ाकोट गावातून आपल्या मोहिमेला सुरुवात केली. त्यांनी 12 वर्षे, मित्रानो, 12 वर्ष, मेहनत करून , गावाबाहेर, समुद्राजवळ 25 एकरचे कांदळवन उभे केले.
आज हे जंगल गावाचे संरक्षण करत आहे. असेच काम ओदिशाच्याच पारादीप जिल्ह्यातले एक इंजीनियर अमरेश सामंत यांनी केलं आहे. अमरेश यांनी छोटी छोटी जंगल उभारली आहेत, ज्यामुळे आज अनेक गावांचा बचाव होत आहे. मित्रानो, अशा प्रकारच्या कामांमध्ये जर आपण समाजाला सहभागी करून घेतलं तर मोठे परिणाम दिसून येतात. जसे तामिळनाडूच्या कोईमतूरमध्ये बस कन्डक्टरचे काम करणारे मरिमुथु योगनाथन आहेत. योगनाथान हे आपल्या बसमधील प्रवाशांना तिकीट देतात, तेव्हा त्याबरोबर एक रोपटे देखील मोफत देतात. अशा प्रकारे योगनाथन यांनी कितीतरी झाडे लावली आहेत. योगनाथन आपल्या वेतनाचा मोठा हिस्सा याच कामावर खर्च करत आले आहेत. आता हे ऐकल्यानंतर असा कोणता नागरिक असेल जो मरिमुथु योगनाथन यांच्या कामाची प्रशंसा करणार नाही. त्यांच्या या प्रेरणादायी कार्यासाठी मी मनापासून त्यांच्या या प्रयत्नांचे खूप अभिनंदन करतो.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, Waste पासून Wealth म्हणजेच कचऱ्यापासून सोने बनवण्याबाबत आपण सर्वानी पाहिले देखील आहे, ऐकले देखील आहे, आणि आपणही इतरांना सांगत असतो. काहीसे अशाच प्रकारे कचऱ्याला मौल्यवान बनवण्याचे काम केले जात आहे. असेच एक उदाहरण केरळच्या कोच्चि मधील सेंट टेरेसा महाविद्यालयाचे आहे. मला आठवतंय कि 2017 मध्ये मी या महाविद्यालयाच्या संकुलात पुस्तक वाचनावरील एका कार्यक्रमात सहभागी झालो होतो. या महाविद्यालयाचे विद्यार्थी पुनर्वापर करता येईल अशी खेळणी सर्जनशील पद्धतीने बनवत आहेत. हे विद्यार्थी, जुने कपडे, टाकण्यात आलेले लाकडाचे तुकडे, बॅग आणि बॉक्सेसचा वापर खेळणी बनवण्यासाठी करत आहेत. काही विद्यार्थी कोडे तयार करत आहेत, तर काही कार आणि रेल्वेगाडी बनवत आहेत. इथे या गोष्टीबर विशेष लक्ष दिले जाते कि खेळणी सुरक्षित असण्याबरोबरच मुलांना खेळता येतील अशी असतील. आणि या संपूर्ण प्रयत्नांची एक चांगली गोष्ट ही देखील आहे की ही खेळणी अंगणवाडीतल्या मुलांना खेळण्यासाठी दिली जातात. आज जेव्हा भारत खेळणी उत्पादनात वेगाने पुढे जात असताना कचऱ्यातून मूल्य निर्मितीचे हे अभियान, हा अभिनव प्रयोग खूप महत्वाचा आहे. आंध्र प्रदेशच्या विजयवाडा इथं एक प्राध्यापक श्रीनिवास पदकांडला म्हणून आहेत. ते खूपच रंजक काम करत आहेत. त्यांनी ऑटोमोबाईल मेटल स्क्रॅपमधून शिल्प बनवली आहेत. त्यांनी बनवलेली ही भव्य शिल्पे सार्वजनिक उद्यानांमध्ये बसवण्यात आली आहेत आणि लोक त्याकडे खूप उत्साहाने पाहत आहेत. इलेक्ट्रॉनिक आणि ऑटोमोबाईल कचऱ्याच्या पुनर्वापराचा हा एक अभिनव प्रयोग आहे. मी पुन्हा एकदा कोच्चि आणि विजयवाड़ाच्या या प्रयत्नांची प्रशंसा करतो आणि आशा करतो की अशा प्रयत्नांमध्ये आणखी लोक पुढे येतील. |
माझ्या प्रिय देशबांधवांनो, भारतीय लोक जगाच्या कानाकोपऱ्यात जिथे कुठे जातात तिथे अभिमानाने सांगतात कि ते भारतीय आहेत. आपला योग, आयुर्वेद, तत्त्वज्ञान कायकाय नाही आपल्याकडे , ज्याचा आपल्याला अभिमान वाटतो , अभिमानाच्या गोष्टी करतो, त्याचबरोबर आपली स्थानिक भाषा, बोली, ओळख, पेहराव खाणे-पिणे याचाही अभिमान बाळगतो. आपल्याला नवे हवे असते आणि तेच तर जीवन असते, मात्र त्याचबरोबर जुने गमवायचे नाही. आपल्याला अतिशय परिश्रमपूर्वक आपल्या आजूबाजूला असलेल्या या सांस्कृतिक वारशाचे जतन करायचे आहे, नव्या पिढीपर्यंत पोचवायचे आहे. हेच काम, आज, आसाममध्ये राहणारे ‘सिकारी टिस्सौ’ अतिशय मनापासून करत आहेत. कार्बी अँग्लोन्ग जिल्ह्यातले ‘सिकारी टिस्सौ’ गेल्या 20 वर्षांपासून कार्बी भाषेचे दस्तऐवजीकरण करत आहेत . कोणे एके काळची एका युगातली ‘कार्बी आदिवासी’ बंधू-भगिनींची ‘कार्बी’ भाषा आज मुख्य प्रवाहातून गायब होत आहे.
‘सिकारी टिस्सौ’ यांनी हे ठरवले होते कि आपली ही ओळख ते कायम राखतील आणि आज त्यांच्या प्रयत्नांमुळे कार्बी भाषेच्या बऱ्याच माहितीचे दस्तऐवजीकरण झाले आहे. या प्रयत्नांबद्दल त्यांचे अनेक ठिकाणी कौतुक देखील झाले आहे आणि पुरस्कार देखील मिळाला आहे. ‘मन की बात’ च्या माध्यमातून ‘सिकारी टिस्सौ’ यांचे मी अभिनंदन तर करत आहेच मात्र देशाच्या अनेक भागात अशा प्रकारचे अनेक साधक असतील, जे एक काम हाती घेऊन मेहनत करत असतील , त्या सर्वांचे देखील मी अभिनंदन करतो.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, कोणतीही नवी सुरुवात , नवा प्रारंभ नेहमीच खूप खास असतो. नवीन सुरुवातीचा अर्थ आहे नवीन शक्यता-नवीन प्रयत्न नवीन प्रयत्नांचा अर्थ आहे – नवी ऊर्जा आणि नवा जोश. हेच कारण आहे कि विविध राज्ये आणि क्षेत्रांमध्ये तसेच विविधतेने नटलेल्या आपल्या संस्कृतीत कुठलीही सुरुवात उत्सव म्हणून साजरी करण्याची परंपरा आहे. आणि ही वेळ नवीन सुरुवात आणि नव्या उत्सवांच्या आगमनाची आहे. होळी देखील वसंत हा उत्सव म्हणून साजरी करण्याची एक परंपरा आहे. ज्यावेळी आपण रंगांबरोबर होळी साजरी करत असतो, त्यावेळी वसंत देखील आपल्या चहूबाजूला नवीन रंग पसरवत असतो.
याच वेळी फुले उमलायला लागतात आणि निसर्ग जिवंत होतो. देशाच्या विविध भागात लवकरच नवीन वर्ष देखील साजरे केले जाईल. मग ते उगादी असेल, किंवा पुथंडू, गुढी पाडवा असेल किंवा मग बिहू, नवरेह असेल, किंवा पोइला, किंवा मग बोईशाख असेल किंवा बैसाखी – संपूर्ण देश, उमंग, उत्साह आणि नव्या आशेच्या रंगात रंगलेला दिसेल. याच काळात केरळ देखील सुंदर विशु उत्सव साजरा करते. त्यानंतर लगेचच चैत्र नवरात्रीचे पवित्र पर्व देखील सुरु होईल. चैत्र महिन्याच्या नवव्या दिवशी आपल्याकडे रामनवमीचा सण असतो. भगवान रामाच्या जन्मोत्सवाबरोबरच न्याय आणि पराक्रमाच्या एका नव्या युगाची सुरुवात म्हणून देखील साजरा केला जातो. या काळात चोहोबाजूला उत्साहाबरोबरच भक्तिभावाने भारलेले वातावरण असते. जे लोकांना आणखी जवळ आणते, त्यांना कुटुंब आणि समाजाशी जोडते, परस्पर संबंध मजबूत करते. या सणांच्या निमित्ताने मी सर्व देशवासियांना शुभेच्छा देतो.
मित्रानो, याच दरम्यान 4 एप्रिलला देश ईस्टर देखील साजरा करेल. येशू ख्रिस्ताच्या पुनर्जीवनाचा उत्सव म्हणून ईस्टरचा सण साजरा केला जातो. प्रतीकात्मक दृष्ट्या सांगायचे तर ईस्टर आयुष्याच्या नवीन सुरुवातीशी निगडित आहे. ईस्टर आशा पुनर्जीवित होण्याचे प्रतीक आहे.
या पवित्र आणि शुभ प्रसंगी मी केवळ भारतातील ख्रिस्ती समुदायाला नव्हे तर जगभरातील ख्रिस्ती बांधवांना देखील शुभेच्छा देतो.
माझ्या प्रिय देशबांधवानो , आज ‘मन की बात’ मध्ये आपण ‘अमृत महोत्सव’ आणि देशाप्रति आपल्या कर्तव्यांबाबत बोललो. आपण अन्य पर्व आणि सण -उत्सवांबाबतही चर्चा केली. याच दरम्यान आणखी एक पर्व येणार आहे जे आपल्या घटनात्मक अधिकार आणि कर्तव्यांचे स्मरण करून देते. ते आहे 14 एप्रिल – डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जन्म जयंती. यावेळी ‘अमृत महोत्सव’ मध्ये तर हा दिवस आणखी खास बनला आहे. मला विश्वास आहे , बाबासाहेबांची ही जन्म जयंती आपण नक्कीच संस्मरणीय बनवू, आपल्या कर्तव्यांचा संकल्प करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करू. याच विश्वासासह तुम्हा सर्वाना सणांच्या पुन्हा एकदा शुभेच्छा. तुम्ही सर्व आनंदी रहा, निरोगी रहा, आणि उत्साहाने साजरे करा. याच कामनेसह पुन्हा एकदा आठवण करून देतो “दवाई भी – कड़ाई भी’ . खूप-खूप धन्यवाद .