मुक्तपीठ टीम
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील रुग्ण वाढीचा वेग हा तीव्र असल्याचे दिसत आहेत. यामुळे राज्यासह केंद्र सरकारच्या चिंतेत वाढ झाली आहे. सातत्याने वाढत असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ८ एप्रिलला सर्व राज्यातील मुख्यमंत्र्याशी चर्चा करणार आहेत. या बैठकीत पंतप्रधान मोदींकडून सर्व राज्यातील कोरोनाची स्थिती, संसर्ग रोखण्यासाठी राज्याकडून काय उपाययोजना केल्या जात आहेत, तसेच लसीकरण मोहिमेचा आढावा घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याआधी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन देशातील अशा राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत, ज्या राज्यात कोरोनाचे नवीन संसर्ग वेगाने वाढत आहेत. तसेच धक्कादायक बाब म्हणजे देशात गेल्या २५ दिवसांत कोरोनाची नवीन प्रकरणे २० हजारांवरून १ लाखांच्या वर पोहचली आहेत.
राज्य सरकारकडून कठोर निर्बंध लावले जात आहेत, तरीही संसर्ग आणि नवीन प्रकरणांची नोंद झपाट्यांनी होत आहे. पंतप्रधान मोदी सातत्यांने सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी वाढता संसर्ग आणि लसीकरणाबद्दल चर्चा करुन आढावा घेत असतात. याआधी १७ मार्च रोजी पंतप्रधान मोदींनी सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती.
१७ मार्चला झालेल्या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावासंदर्भात चिंता व्यक्त केली होती. तेव्हा त्यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर योग्य ते निर्बंध लावण्याच्या सूचना राज्य सरकारांना दिल्या होत्या.
दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाबद्दल बोलायचे झाल्यास, महाराष्ट्र, छत्तीसगड, कर्नाटक, उत्तर प्रदेश, दिल्ली, तमिळनाडू, मध्य प्रदेश आणि पंजाबमध्ये सातत्यांने नव्या प्रकरणांची नोंद होत आहेत. तथापि, कोरोनाच्या संसर्गाला रोखण्यासाठी महाराष्ट्रात आता विकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असून, इतर राज्यात नाईट कर्फ्यूसह कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. पण असे करूनही लोकांच्या हलगर्जीपणामुळे संसर्ग रोखण्यास सरकार अपयशी ठरत आहे.