मुक्तपीठ टीम
काँग्रेसचे जेष्ठ नेते खासदार गुलाम नबी आझाद यांचा आज राज्यसभेतील कार्यकाळ संपला. आझाद जम्मू काश्मिरचे प्रतिनिधित्व करत असून त्यांना सभागृहात निरोप देण्यात आला. राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुलाम नबी आझाद यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी आझाद यांचे कौतुक करताना पंतप्रधान मोदी काही आठवणींनी खूपच भावूक झाले. त्यांना आपल्या डोळ्यातील अश्रू आवरता आले नाही. मोदी ज्याबद्दल बोलत होते, ती घटना गुजरातमधील यात्रेकरूंवरील दहशतवादी हल्ल्याची होती…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्याच्या घटनांचा उल्लेख करत आपली आठवण सांगितली. “त्यावेळी मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो. गुजरातमधील यात्रेकरूंवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यावेळी मला गुलाम नबी यांचा सर्वात आधी फोन आला होता. त्यावेळी तो फोन फक्त माहिती देण्यासाठी नव्हता. त्यांचे अश्रू थांबत नव्हते. त्यानंतर मी तत्कालिन संरक्षणमंत्री प्रणव मुखर्जी यांना फोन केला. त्यांना मृतदेह आणण्यासाठी विमान उपलब्ध करून देण्याची मागणी केली. त्यांनी व्यवस्था करतो असं सांगितलं. त्यानंतर गुलाम नबी आझाद रात्रीही विमानतळावर होते. त्यांनी विमानतळावरून पुन्हा कॉल केला. त्यावेळी एखादा माणूस जसा कुटुंबातील माणसांची काळजी करतो, तशीच काळजी ते करत होते. माझ्यासाठी तो फार भावूक क्षण होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी पुन्हा फोन केला आणि विचारलं सगळे पोहोचलेत ना? त्यामुळे त्यांच्याविषयी माझ्या मनात आदर आहे,” असे सांगत असताना पंतप्रधान मोदींचे डोळे भरून आले.
#WATCH: PM Modi gets emotional while reminiscing an incident involving Congress leader Ghulam Nabi Azad, during farewell to retiring members in Rajya Sabha. pic.twitter.com/vXqzqAVXFT
— ANI (@ANI) February 9, 2021
आज गुलाम नबी आझाद यांच्यासहीत खासदार शमशेर सिंह, मोहम्मद फयाज, नाजिर अहमद यांचाही राज्यसभेतील कार्यकाळ संपुष्टात आल्याने त्यांनाही निरोप देण्यात आला आहे.