मुक्तपीठ टीम
मोदी सरकारच्या मंत्रिमंडळातील नव्या मंत्र्यांनी शपथविधीनंतर मुहूर्तासाठी जास्त शोधाशोध न करता कार्यभार स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. कारण पंतप्रधानांची त्यांना तंबीच तशी होती की तात्काळ काम सुरु करा. १५ ऑगस्टपर्यंत दिल्ली सोडू नका. पण नव्यानं मंत्री झालेल्यांना मोदींची शैली कळण्याची ही फक्त एक झलक होती. शपथ घेण्याआधी पंतप्रधान मोदी यांनी आपल्या नव्या मंत्र्यांना भेट दिली. त्याचवेळी त्यांना नव्या मंत्र्यांना मोदी कोड ऑफ कंडक्टची जाणीव झाली. मोदींच्या आचारसंहितेच्याबाहेर जाऊन जास्त काही केलं तर नावापुढे माजी लागण्यास वेळ लागणार नाही, याचीही त्यांना जाणीव झाली. मंत्र्यांसाठी अधिकृत जाहीर न झालेला ‘मोदी कोड ऑफ कंडक्ट’ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढील संकल्पाविषयी आणि त्यांच्याकडून कशा कामांची अपेक्षा आहे याविषयी चर्चा केली. पंतप्रधानानी आपल्या अधिकाऱ्यांपासून सामान्य कार्मचाऱ्यांच्या निवडीपर्यंत आपल्या जबाबदाऱ्यांबाबत अत्यंत संवेदनशील राहण्याचे निर्देश दिले आहे. पण त्यांनी आपल्या मंत्र्यांनी एक तीन कलमी आचार संहिताच घालून दिली आहे.
भ्रष्टाचाराकडे दुर्लक्ष करु नका!
• पंतप्रधान मोदी यांनी पहिल्या टप्प्यातच ‘ना खाएंगे और ना खाने देंगे’ अशी घोषणा केली होती. तरीही आरोप झाले. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात ते अधिक सजग आहेत.
• नव्या मंत्र्यांना त्यांनी स्पष्ट शब्दात बजावले की, भ्रष्टाचार मुळीच खपवून घेतला जाणार नाही.
जबाबदाऱ्या समजून घ्या, ध्येयाकडे दुर्लक्ष नको!
• १५ ऑगस्टच्या आधी दिल्ली सोडून जाऊ नये.
• मंत्र्यांनी सर्वप्रथम आपली कामे योग्य पद्धतीने समजून घ्यावी.
• कोणालाही बोट दाखविण्याची संधी मिळू नये.
• योजना जाहीर करतानाच पूर्ण करण्याची अंतिम तारीखही ठरवा, ती पाळा.
• ज्या डझनभर मंत्र्यांना घरी जावे लागले, त्यांच्यापैकी काहींसाठी केवळ कर्तृत्वाच्या अभावापेक्षाही हयगय सर्वात मोठं कारण ठरलं.
जल्लोष नको, अतिप्रसिद्धीच्या आहारी जाऊ नका!
• शपथ घेण्यापूर्वीच पंतप्रधानानी नव्या मंत्र्यांना बजावलं होतं की शपथ घेतल्यानंतरच्या जल्लोषात कोरोनाच्या नियमांचे भंग होणार नाही, याची काळजी घ्या.
• १५ ऑगस्टपर्यंत सर्व मंत्र्यांनी दिल्ली सोडून जाऊ नये.
• प्रसारमाध्यमांशी जेवढ्यास तेवढेच बोलावे. विनाकारण जास्त बोलून अडचणीत येऊ नये.