मुक्तपीठ टीम
महिला व्यावसायिकांना, बचत गटांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या सक्षमीकरणासाठी व्यासपीठ देण्याचा प्रयत्न ‘भैरव-२०२२’ दिवाळी महोत्सवातून केला जाणार आहे. सुरेंद्र पठारे फाउंडेशनतर्फे दि. १३ ते १६ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत खराडी येथील झेन्सार मैदानावर हा महोत्सव भरणार आहे, अशी माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष सुरेंद्र पठारे यांनी दिली.
सुरेंद्र पठारे म्हणाले, “या सांस्कृतिक आनंदोत्सवाच्या माध्यमातून महिला बचत गटाच्या महिला, अन्नपूर्णांना व्यासपीठ देण्याचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रातील खास खाद्यपदार्थ, रुचकर पाककृतींची प्रात्यक्षिके, हाताने बनवलेल्या वस्तूंची विस्तीर्ण बाजारपेठ, स्थानिक विशिष्ट चवीचे लोकप्रिय खाद्यपदार्थ, यासह लोककलांचे सादरीकरण, ऑर्केस्ट्रा, लोकनृत्य, कर्णमधुर संगीत, मुलांसाठी गेम्स, स्पर्धा, फॅशन शो आणि अनेक आकर्षक गोष्टी, हाताने बनवलेले दागिने, टाकाऊतून टिकाऊ बनवलेल्या गोष्टी, शंभर कौशल्यपूर्ण स्टॉल असणार आहेत.”
‘भैरव’चे हे दुसरे वर्ष आहे. दिवाळीच्या पार्शवभूमीवर होत असलेल्या महोत्सवात पुणेकरांना नाविन्यपूर्ण वस्तूंची खरेदी, खाद्यपदार्थ व मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. महिला उद्योजकांना उभारी देण्याबरोबरच दिवाळी सणातील परंपरांची आठवण जपली जाणार आहे. या महोत्सवाला सर्वाना विनामूल्य प्रवेश असणार आहे, असेही त्यांनी कळवले आहे.