मुक्तपीठ टीम
स्वदेशी तंत्रज्ञानाने निर्मित पिनाका रॉकेट सिस्टमचे डीआरडीओद्वारे यशस्वी परीक्षण करण्यात आले आहे. संरक्षण संशोधन व विकास संघटना म्हणजेच डीआरडीओने ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. ओडिशा येथील चांदीपूर एकीकृत चाचणी परिक्षेत्रात रॉकेट सिस्टमची चाचणी घेण्यात आली आहे. चाचणीदरम्यान २५ रॉकेट्स सोडण्यात आले आहेत. त्यांनी लक्ष्य साध्य करण्यात यश मिळाले आहे. पिनाका प्रणाली ४४ सेकंदात ७२ रॉकेट प्रक्षेपित करू शकते.
स्वदेशी बनावटीचे पिनाका ही गायडेड रॉकेट लॉन्च सिस्टमची अपग्रेड केलेली आवृत्ती आहे. जी पिनाका एमके-१ रॉकेटची जागा घेईल. या प्रणालीच्या मदतीने ४५ किमी अंतरावर असणारे लक्ष्य नष्ट केले जाऊ शकते.
सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड नाही
- लार्सन अँड टुब्रो डिफेन्स आणि टाटा पॉवर स्ट्रॅटेजिक इंजिनीअरिंग विभागाने पिनाका तयार केले.
- पिनाका प्रणालीच्या पथकात ६ प्रक्षेपण वाहने असतात.
- तसेच लोडर सिस्टम, रडार आणि लिंक विथ नेटवर्क सिस्टम आणि कमांड पोस्ट देखील असते.
- टेलिमेट्री, रडार आणि इलेक्ट्रो-ऑप्टिकल ट्रॅकिंग सिस्टम अशा अत्याधुनिक उपकरणांच्या मदतीने सर्व क्षेपणास्त्रांना ट्रॅक केले जाते.
- ही प्रणाली ४४ सेकंदात ७२ रॉकेट प्रक्षेपित करू शकते.
भगवान महादेवांचं शस्त्र म्हणजे ‘पिनाका’
- भगवान शंकराचे शस्त्र, त्यांचे धनुष्य ‘पिनाका’ या नावाने ही प्रणाली बनविली गेली आहे.
- राजस्थानातील पोखरण परिक्षेत्रात मार्च महिन्यात पिनाका रॉकेट सिस्टमच्याही यशस्वी चाचण्या झाल्या.
- आता ओडिशामधील यशस्वी चाचणी ही सैन्याला महाबळ देण्याच्या दिशेने एक निश्चित पाऊल म्हणून मानले जात आहे.
- ही संरक्षण यंत्रणा एलओसीवर तैनात करण्याच्या उद्देशाने विकसित केली गेली आहे.
देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओच्या पिनाका रॉकेटच्या यशस्वी चाचणीबद्दल अभिनंदन केले आहे. जी. सतीश रेड्डी, सचिव, संरक्षण संशोधन व विकास विभाग आणि अध्यक्ष, डीआरडीओ, यांनी चाचण्यांच्या यशाबद्दल प्रत्येकाच्या प्रयत्नांचे कौतुक केले.