मुक्तपीठ टीम
सरकारी तेल कंपन्यांनी आज सलग दुसर्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. आज डिझेल आणि पेट्रोलच्या किंमतीत २५ पैशांनी वाढ झाली आहे. यापूर्वी सोमवारी डिझेल २७ पैशांनी तर पेट्रोल २५ पैशांनी महागले होते. मुंबईत पेट्रोल ९१.८० तर डिझेल ८२.१३ रुपये प्रतिलिटरपर्यंत पोहोचले आहे.
जानेवारी महिन्यात सहाव्यांदा किमती वाढल्या. जानेवारी महिन्यात आतापर्यंत पेट्रोल-डिझेलच्या किमतीत ६ वेळा वाढ झाली आहे. ६ जानेवारी रोजी या महिन्यात पहिल्यांदा त्यांच्या किमती वाढवण्यात आल्या.
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींबाबत केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आधीच स्पष्ट केले आहे, “कोरोना साथीच्या काळात तेल उत्पादक देशांकडून कमी उत्पादन झाल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. कमी उत्पादनामुळे तेलाच्या मागणी आणि पुरवठ्यात असंतुलन निर्माण झाले आहे. काही महिन्यांपूर्वी कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल ३५ ते ३८ डॉलर होते, आता ते प्रति बॅरल ५४ ते ५५ डॉलर पर्यंत पोहोचले आहेत. यामुळे पेट्रोलच्या किमतीत वाढ झाली आहे.
कच्चे तेल स्वस्त तरी पेट्रोल-डिझेल महागच!
कच्च्या तेलाच्या किमती खाली आल्या तेव्हा सरकारने उत्पादन शुल्क वाढविले होते. गेल्या वर्षी कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी घसरण झाल्यानंतर सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात वाढ केली. जगभरातील लॉकडाऊनमुळे कच्च्या तेलाचे दर दोन दशकांच्या नीचांकावर पोहोचले. या काळात सरकारने एक लिटर पेट्रोलवर उत्पादन शुल्कात १३ रुपये आणि डिझेलवर १६ रुपये वाढ केली होती. आता ते दर पेट्रोलसाठी ३३ रुपये आणि डिझेलसाठी ३२ रुपयांवर पोहोचले आहेत.
कसे ठरतात इंधनाचे दर?
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे दर निश्चित केले जातात तेल विपणन कंपन्या दरांचा आढावा घेतल्यानंतर दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर निश्चित करतात. इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेल दरात बदल करतात.
एसएमएसद्वारे मिळवा इंधन दर
एसएमएसद्वारे आपण पेट्रोल आणि डिझेलचे दर देखील जाणून घेऊ शकतो. यासाठी इंडियन ऑईल ग्राहक आरएसपी स्पेस पेट्रोल पंपचा कोड लिहून ९२९२९९२२४९ आणि बीपीसीएल ग्राहक आरएसपी ९२२३११२२२२ वर पाठवून माहिती मिळवू शकता. त्याचबरोबर एचपीसीएल ग्राहकांना ‘एचपीप्राइस’ लिहून ते ९२२२२०११२२ क्रमांकावर पाठवून आजची किंमत जाणून घेऊ शकता.