मुक्तपीठ टीम
कृषी कायद्याविरोधात सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा एक भाग असणाऱ्या २६ जानेवारीच्या ट्रॅक्टर परेडला दिल्ली पोलिसांनी परवानगी दिल्याचं शेतकरी नेत्यांनी सांगितलं आहे. शनिवारी यासंदर्भात महत्वपूर्ण बैठक पार पडली. तर शेतकऱ्यांसोबत आमची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याची माहिती दिल्ली पोलिसांचे अतिरिक्त जनसंपर्क अधिकारी अनिल मित्तल यांनी दिली आहे. शेतकरी आंदोलक प्रजासत्ताक दिनी देशाच्या राष्ट्रध्वजासह ही परेड काढणार आहेत. शेतकरी आंदोलनाकडून पोलिसांना लेखी योजना देण्यात आली असून त्यावर आज अधिकृत निर्णय अपेक्षित आहे. सध्या पोलिसांनी तत्वत: मान्यता दिली आहे.
प्रजासत्ताक दिन परेडनंतर शेतकऱ्यांची ट्रॅक्टर परेड
दिल्लीत राजपथावर प्रजासत्ताक दिनाची परेड संपन्न झाल्यावर दुपारी १२ वाजता या ट्रॅक्टर परेडला सुरुवात होईल. ट्रॅक्टर परेड दिल्लीच्या वेगवेगळ्या परिसरातून जाणार असल्याने शेतकरी संघटनांकडून नियंत्रण कक्ष स्थापन केला जाणार आहे. या ट्रॅक्टर परेडमध्ये २ हजार ५०० स्वयंसेवक तैनात असतील. वाढणारी गर्दी लक्षात घेता स्वयंसेवकांचीही संख्या वाढवली जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे. या ट्रॅक्टर परेडनंतर आंदोलनाची पुढची रणनिती ठरवली जाईल, असे शेतकरी नेत्यांनी सांगितले आहे.
परेडमध्ये २ लाखाहून अधिक ट्रॅक्टरचा समावेश
शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडमध्ये २ लाखाहून अधिक ट्रॅक्टर सहभागी होणार असल्याचा दावा शेतकरी नेत्यांनी केला आहे. या परेडचे ५ मार्ग असतील. दिल्ली पोलिसांनी या ट्रॅक्टर परेडला परवानगी दिल्याचा दावा संयुक्त किसान मोर्चाचे नेते अभिमन्यू कोहाड यांनी केला आहे. ही ट्रॅक्टर परेड दिल्लीच्या गाजीपूर, सिंघू आणि टीकरी सीमांवरुन सुरु होईल, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
कसं असेल ट्रॅक्टर परेडचं नियोजन?
- प्रत्येक मार्गावर शेतकरी ट्रॅक्टरमधून १०० किमीचा प्रवास करतील.
- ७० ते ७८ टक्के मार्ग हे दिल्लीतले असतील तर उर्वरीत राजधानी दिल्लीच्या बाहेरचे असतील
- सिंघू सीमेवरुन सुरु होणाऱ्या ट्रॅक्टर परेडचा एक मार्ग गांधी ट्रान्सपोर्टनगर असेल
- याठिकाणाहून ही परेड कंझावाल आणि बवाना परिसरातून जाईल
- टीकरी सीमेवरुन सुरु होणाऱ्या परेडचा मार्ग हा नांगलोई, नजफगढ़, बादली आणि कुंडली-मानेसर-पलवल एक्सप्रेसवे असा असेल
- सीमांवर लावले गेलेले अडथळे २६ जानेवारीला हटवले जातील आणि शेतकऱ्यांना ट्रॅक्टर परेड काढता येईल