मुक्तपीठ टीम
“विशेष विद्यार्थ्यांकडून अशा प्रकारचे कार्यक्रम बसवून घेण्याचे काम जिकिरीचे असते. मात्र, शिक्षकांनी मेहनत घेऊन हे आव्हान लीलया पेलले आहे. त्यांच्या मेहनतीमुळेच हा समूहनृत्याचा कार्यक्रम सुरेख झाला. विशेष मुलांची जिद्द आणि शिक्षक व पालकांची मेहनत यामध्ये मोलाची आहे,” असे मत लायन्स क्लब इंटरनॅशनलचे माजी प्रांतपाल रमेश शहा यांनी व्यक्त केले.
लायन्स क्लब इंटरनॅशनल ३२३४ डी-२ मधील सहकारी क्लब आयोजित मतिमंद गट समूहनृत्य स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी शहा बोलत होते. स्पर्धेत १७ शाळेतून एकूण २५० विद्यार्थी सहभागी झाले होते. मतिमंद विद्यार्थ्यांच्या शाळा व कार्यशाळा अशा दोन गटासाठी स्पर्धा होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर सतीश राजहंस, सीमा दाबके, प्रतिभा खंडागळे, परिक्षक राजश्री नगरकर आणि मिथिला पंडित, कमल राजे, ललिता शिंदे, संध्या दहिवळे, ऋजुता पितळे, सुहास दाबके, माधुरी पंडीत, शमा गोयल उपस्थित होते.
समूहनृत्य स्पर्धेत कार्यशाळा गटात ‘सेवासदन दिलासा एरंडवणे’ या गटाने प्रथम क्रमांक, ओम साई ओम या गटाने व्दितीय क्रमांक, तर माधवी ओगले (व्यावसायिक विभाग) यांनी तृतीय क्रमांक पटकावला. उत्तेजनार्थ बक्षीस साई संस्कार निगडी व नव क्षितिज कार्यशाळा यांनी मिळवले. शाळा गटात कामायनी निगडी शाळेने प्रथम, सेवासदन दिलासा लक्ष्मीरोडने द्वितीय, तर साई संस्कार निगडीने तृतीय क्रमांक मिळवला. उत्तेजनार्थ बक्षीस सेवाधाम व छत्रपती प्रतिष्ठानचे निवासी विद्यालय यांनी मिळवला.
रमेश शहा म्हणाले, “समूहनृत्याचा हा इतका सुरेख कार्यक्रम बघताना भारावून गेलो. एकापेक्षा एक असे सरस कार्यक्रम या विशेष, दिव्यांग विद्यार्थ्यांनी सादर केले आहेत. सामाजिक बांधिलकी जपत शिक्षक वृंद आणि संस्था चालकांनी घेतलेली मेहनत विशेष कौतुक आणि अभिनंदनास पात्र आहे.भविष्यात पुण्यातील सर्व विशेष शाळांतील शिक्षकांची एकत्रित सभा घेऊन जिल्हा पातळीवर या विशेष मुलांसाठी जास्तीत जास्त मदत देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू.”
विशेष मुलांचे कलागुण दाखवण्यासाठी हक्काचे व्यासपीठ देण्यासह त्यांच्यातील आत्मविश्वास, सांघिक भावना, व्यक्तिमत्व विकास साध्य करण्यासाठी हा उपक्रम महत्वाचा ठरत असल्याचे सीमा दाबके यांनी प्रास्ताविकात सांगितले. अशाच कार्यक्रमातून ही विशेष मुले राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही चमकली आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.