मुक्तपीठ टीम
जम्मू-काश्मीरचे मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) हिरदेश कुमार यांनी एक मोठा निर्णय जाहीर केला आहे. आयोगाने काश्मीरबाहेरील म्हणजेच इतर राज्यातील भारतीयांनाही मतदानाचा अधिकार दिला आहे. यामध्ये सामान्यतः जम्मू-काश्मीरमध्ये राहणारे कर्मचारी, विद्यार्थी, मजूर किंवा देशातील इतर राज्यांतील व्यक्तींचा समावेश असेल. ते त्यांचे नाव मतदार यादीत नोंदवू शकतात. तसेच, जम्मू-काश्मीरमध्ये होणाऱ्या निवडणुकीत मतदान करू शकता.
कोण करू शकतात मतदान?
- बाहेरील लोकांना मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी अधिवासाची आवश्यकता नाहीय.
- जम्मू-काश्मीरमध्ये तैनात असलेले इतर राज्यांतील सशस्त्र दलाचे कर्मचारीही मतदार यादीत आपली नावं समाविष्ट करू शकतात, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.
- स्थानिक नसलेल्यांना मतदान करण्यास प्रतिबंध नसल्याचं निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे.
- जम्मू आणि काश्मीरमध्ये कोणी किती काळ राहतो हे महत्त्वाचं नाही.
- जम्मू-काश्मीरमध्ये स्थानिक नसलेले लोक राहतात की नाही याचा अंतिम निर्णय ईआरओ घेईल.
- इथं भाड्यानं राहणारेही मतदान करू शकतात.
२० ते २५ लाख मतदार वाढण्याची शक्यता
- ते म्हणाले की, मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी एकच अट आहे की, त्या व्यक्तीने त्याच्या मूळ राज्यातून मतदार नोंदणी रद्द केली असावी.
- आयोगाच्या या निर्णयामुळे सुमारे २० ते २५ लाख नवीन मतदारांचा मतदार यादीत समावेश होणार आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये सीमांकन आयोगाचा अहवाल लागू झाल्यानंतर विधानसभेच्या जागांची संख्या ९० झाली आहे. विधानसभेच्या जागांची संख्या वाढल्याने सध्याच्या मतदार याद्यांमध्ये आमूलाग्र बदल करण्यात आला आहे.
आता नव्या रचनेनुसार मतदार यादी तयार करण्यात येत आहे.संपूर्ण जम्मू-काश्मीरमध्ये मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे, मात्र जम्मू-काश्मीरमध्ये १५ ऑगस्टची तयारी पाहता ती स्थगित करण्यात आली होती.यापूर्वी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यासाठी ३१ ऑक्टोबर ही अंतिम मुदत होती, मात्र ती आता २५ दिवसांपर्यंत वाढवण्यात आली आहे.