मुक्तपीठ टीम
गोवा विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर झाली असून भाजपाविरोधात काँग्रेससह तृणमूल काँग्रेस, आप आणि मगोप असे पक्ष मैदानात उतरले आहेत. त्यात माजी केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांना तिकीट मिळणार का? असा संभ्रम निर्माण झाला आहे. भाजपाचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी केवळ दिवंगत मनोहर पर्रिकर यांचा मुलगा किंवा अन्य कुणाचा मुलगा म्हणून भाजपात तिकीट मिळू शकत नाही, असं विधान केलं होतं. यावर आता उत्पल पर्रिकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
माजी केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी गुरुवारी राज्यातील सत्ताधारी भाजपा नेतृत्वावर जोरदार निशाणा साधला. पणजी मतदारसंघातील विद्यमान आमदार अतानासिओ मोनसेरेट यांना पक्षाने तिकीट दिल्यास मी गप्प बसणार नाही असं ते म्हणाले. गोव्यात जे राजकारण सुरू आहे ते मी सहन करू शकत नाही. हे मला मान्य नाही. उमेदवाराच्या चारित्र्याचा काही अर्थ नाही, असे ते म्हणू पाहत आहेत का? गुन्हेगारी इतिहास असलेल्या व्यक्तीला तुम्ही तिकीट देणार आहात. आम्ही घरी शांत बसायचे का?, असा सवाल उत्पल पर्रीकरांनी केला आहे.
ते पुढे म्हणाले, “या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि ते फक्त पणजीपुरतेच नाही. गोव्याच्या राजकीय परिस्थितीत जे काही चालले आहे ते मान्य नाही. ते बदलावे लागेल. मी तेच करण्याचा प्रयत्न करत आहे.”
उत्पल यांचा विरोध अतानासियोंना आहे. अतानासियो हे काँग्रेसचे माजी सदस्य आहेत. २००८ पर्यंत त्यांच्यावर दंगल, बलात्कार यासह अनेक खटले होते. मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर २०१९ च्या विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने अतानासियो यांना उमेदवारी दिली होती. त्यांनी काँग्रेस उमेदवाराचा पराभव केला. पक्षाच्या तिकीटासाठी उत्पल यांच्या जागी भाजपाचे उमेदवार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांची निवड करण्यात आली.