मुक्तपीठ टीम
सोमवारपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु झालं आहे. अधिवेशन सुरु होण्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी लस घेताच कोरोनाविरोधातील लढाईत आपण बाहुबली बनतो असं सांगत लस घेण्याचं आवाहन केलं. पाऊस पडत असल्याने पंतप्रधान हातात छत्री घेऊन माध्यमांशी बोलले. त्या छत्रीनं पावसापासून त्यांना वाचवलं, पण सभागृहात गेल्यानंतर विरोधकांच्या आक्रमकतेमुळे त्यांना बोलताच आलं नाही. त्यांनी बोलण्याचा प्रयत्नही केला. मंत्रिमंडळातील नव्या सहकाऱ्यांचा परिचय करुन देण्यासाठी ते उभे राहिल्यावरही विरोधकांचा गोंधळ सुरुच राहिला. शेती कायदे, महागाई, नुकतंच उघड झालेलं सरकारी हेरगिरीचे गंभीर प्रकरण यामुद्द्यांवर विरोधकांनी सभागृह दणाणून सोडलं होतं.
काय म्हणले पंतप्रधान मोदी?
- मी आशा करत आहे की तुम्ही सगळ्यांनी लसीचा कमीत कमी एक डोस घेतला असेल.
- तरीही तुम्ही कोरोनाच्या प्रोटोकॉलचे पालन करा.
- लस ही हातावर देण्यात येते आणि जेव्हा लस हातावर देण्यात येते तेव्हा तुम्ही बाहुबली बनता.
- आतापर्यंत ४० कोटी पेक्षा जास्त लोकं कोरोनाविरुद्धच्या लढाईत बाहुबली बनले आहेत.
- पुढे ही हे काम जोरात सुरु राहिल.
कोरोनावर प्राधान्याने चर्चा व्हावी!
- संपूर्ण जगाला कोरोनाच्या साथीने विळखा घातला आहे.
- त्यामुळे या महामारीवर संसदेत चर्चा व्हायला हवी आणि या मुद्यावर प्राधान्याने चर्चा करायला हवी.
- तसेच सर्व सदस्यांकडून यावर सूचना केल्या जाव्यात.
- जेणेकरून कोरोनाची लढाई लढता येईल.
- जनतेला उत्तर हवं आहे, ते देण्यासाठी सरकारची तयारी आहे.
कठोर प्रश्न विचारा, पण उत्तरांचीही संधी द्या!
- त्यामुळे सर्व खासदारांनी आणि राजकीय पक्षांनी कठोर प्रश्न विचारावेत, प्रत्येक प्रश्न विचारावा.
- पण शांत वातावरणात प्रश्न विचारावे.
- तसेच सरकारला उत्तरं देण्याची संधीही द्यावी.
- कारण जनतेची प्रश्न सुटले पाहिजे, त्यामुळे लोकशाहीला चालना मिळेल आणि लोकांचा लोकशाहीवरचा विश्वासही बळकट होईल.