मुक्तपीठ टीम
राष्ट्रवादी काँग्रेस आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी येत्या १७ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. दरम्यान आघाडी मतदारसंघावरूनच पेच निर्माण होण्याची शक्यता आहे, कारण आघाडीचा घटक पक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ही पोटनिवडणूक स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला आहे.
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेची निवडणूक जाहीर झाली आहे. यामध्ये महाविकासआघाडी मधील घटक पक्ष राष्ट्रवादी आणि भाजप प्रमुख सामना रंगण्याची शक्यता असताना आता स्वाभिमानी शेतकरी संघटने उडी घातली आहे. स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांना उमेदवारी देण्याची मागणी आता कार्यकर्त्यातून होत आहे. त्यामुळं स्थानिक स्तरावर का होईना पण महाविकास आघाडीमध्ये संघर्षाची चिन्हे दिसत आहेत.
मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं राष्ट्रवादीला पाठिंबा दिला होता. मात्र आता राज्यात शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामुळं स्वाभिमानीनं महाविकास आघाडीच्या विरोधात पावलं टाकायला सुरुवात केली आहे. रविवारी अजित पवार यांच्या दौऱ्या दरम्यानही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं निदर्शने केली होती. याबाबत राजू शेट्टी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘मी सध्या दिल्लीत आहे. कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत. याबाबत कार्यकर्त्यांचा कौल घेऊन दोन दिवसांत निर्णय घेऊ.’