मुक्तपीठ टीम
पु.ल.देशपांडे कला महोत्सवाअंतर्गत आयोजित विविध कार्यक्रमांना रसिक प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. पद्मभूषण आणि महाराष्ट्र भूषण पु.ल.देशपांडे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील नवोदित आणि होतकरु कलाकारांना त्यांची कला सादर करण्यासाठी ही उत्तम संधी आहे. २० नोव्हेंबर पर्यंत महोत्सव सुरू राहणार आहे. विविध चित्रपट, नाटक आणि कलाकृती यावेळी सादर होत आहेत.
या सोहळ्यात अंध विद्यार्थ्यांचा संगीत सोहळा, महाराष्ट्रातील लोककलांचे सादरीकरण तसेच अन्य विविध कार्यक्रम असतील. महिला बचत गट, तृतीयपंथीय आणि दिव्यांगांकरिता विविध दालनेही येथे आहेत.
पु.लं. देशपांडे कला महोत्सवात नवोदितांना संधी देण्याचे धोरण आहे. तसेच ज्यांनी मागील तीन वर्षात एकाही महोत्सवात मानधन घेतलेले नाही, अशा कलाकारांना प्राधान्य देण्यात आले आहे.
उद्या “जोगवा”चे लेखक आणि दिग्दर्शक संजय पाटील यांच्यासह गप्पा गोष्टींचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच सकाळी योगेश सोमण लिखित आणि दिग्दर्शित “द प्लॅन” हे नाटक सादर होईल. याचबरोबर अंध मुलांचा संगीत कार्यक्रम “सूर दृष्टी” सादर होणार आहे. १६ नोव्हेंबर रोजी उत्तरा मोने प्रस्तुत आणि डॉ गिरीश ओक आणि स्पृहा जोशी यांचे कविता वाचन आणि सामायरा चित्रपटाचे दिग्दर्शक ऋषी देशपांडे यांच्यासह रसिकांना गप्पा मारता येणार आहे. याच दिवशी दशावतार कार्यक्रम सादर होईल. तर १७ नोव्हेंबर रोजी सिनियर सिटिझन्स चा “महाराष्ट्र दर्शन” कार्यक्रम होईल.याशिवाय शुभदा वराडकर यांचे मराठी अभंगांवर ओडिशी नृत्य कार्यक्रम “ओवी-अमृतघनू” हा कार्यक्रम सादर होईल.
१८ नोव्हेंबर रोजी जळगावच्या परिवर्तन संस्थेमार्फत आयोजित “आय आम पुंगळया शारूख्या आगी माहुल” आणि १९ नोव्हेंबर रोजी बीडच्या नाट्यवाडा संस्थेमार्फत पाझर हे नाटक सादर होणार आहे. १७ आणि १९ नोव्हेंबरला हलगी आणि संबळची जुगलबंदी होणार आहे. २० नोव्हेंबर ला आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रस्तुत केलेले तारपा नृत्य सादर करण्यात येईल.